ड्रायव्हरचा पगार - (सत्यघटनेवरून प्रेरित)
मिठबांव, माझं आजोळ, मामाचं गांव. दरवर्षी मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत आमची स्वारी तिथे असायची. मामाचं दुकान असल्याने मी लहानपणापासून दुकानात लुडबुड करीत असे. कधी गल्ल्यावर तर कधी सामानाच्या पुड्या बांधायला. लहानपणीच नव्हे तर अगदी हल्लीपर्यंत हेच चालू होतं. मामा उद्योगी. दुकानाव्यतिरिक्त त्याने अनेक जोडधंदे चालू केले होते. “प्राथमिक उद्देश अर्थार्जन होतं का समाजसेवा?” हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. त्यामधील एक म्हणजे त्याच्याकडील ओमनी व्हॅन. गावी आलेले पाहुणे व पर्यटक यांना आजूबाजूची प्रेक्षणीय किंवा श्री श्रेत्र कुणकेश्वर या धार्मिक स्थळांना नेऊन आणणे हे व्हॅनचे काम. अर्थात भाडे घेऊन. पण व्हॅन सर्वाना सदैव उपलब्ध. कधी माझा मामेभाऊ तर कधी इतर कोणी सारथ्य करायचे.
एके दिवशी दुकानावर एक गृहस्थ “कुणकेश्वरला जाऊन येण्यासाठी व्हॅन मिळेल का?” असे विचारत दुकानात आले. मामाने होकार दिलाच. मामाने मला ऑर्डर दिली “ जा रे, भाडं मारून ये”. मामाच्या अश्या फर्मानांची तत्पर अंमलबजावणी करायला मी सदैव एका पायावर तयार असायचो. अंगावरचा तो मळलेला टी-शर्ट आणि बर्मुडा या वेषातच मी गाडीला स्टार्टर मारला.
फार नाही, चार पाच वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे ही. पुण्यातल्या एका संगणक कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करणारा असा मी, सारथी बनून श्री कुणकेश्वर क्षेत्री निघालो. आता थोडं स्थानमाहात्म्य. मिठबांव गाव तसं समुद्रकिनारी, पण चहूबाजूंनी डोंगरांच्या कुशीत वसलेलं. तात्पर्य काय? तर त्यावेळी गावात मोबाईलची रेंज नव्हती. व्हाट्सएप्प नुकतच बाळसं धरू लागलं होतं. कुणकेश्वरला जाताना एक छोटीशी घाटी चढून प्राथमिक आरोग्य केंद्रापुढील गणपतीपाशी आलं की मोबाईलवर रेंजची कांडी दिसायला लागायची, आणि मेसेजेसचं तुणतुणं वाजायला लागायचं.
आम्ही घाटी चढून माथ्यावर येताच गाडीतल्या सगळ्यांचे मोबाईल रुणुझुणु लागले. काकू चित्कारल्या, “थांब !”. मला वाटलं त्यांना मळमळत असेल, पण हुश्श, तसं काही नव्हतं. रेंज मिळाली म्हणून गाडी थांबवली होती त्यांनी. काकू, काका, त्यांच्या सूनबाई आणि इतर सर्वानी खिसा, पर्स, पिशवी जिथे जिथे ठेवले होते तिथून आपापले मोबाईल काढले आणि गाडीत भयानक आवाज येऊ लागले. कोणाच्या जोरात हसण्याचा, कोणाच्या त्राग्याचा, कोणाच्या आणि काही खुसफुसण्याचा.तब्बल पंधरा एक मिनिटं लागली त्यांना या समाधी अवस्थेतून बाहेर यायला.मग आम्हाला आज्ञा झाली, “चल रे आता पटकन”. म्हणजे पंधरा मिनिटं यांनी खाल्ली होती आणि आत्ता मला गडबड करीत होते.
आमची पुढची मार्गक्रमणा चालू झाली. आजूबाजूचा निसर्ग, पल्ल्याड दिसणारा दर्या, नदी-समुद्राच्या मीलनाचा तो डोळ्यांचं पारणं फेडणारा देखावा या, कशाकडेही न पाहता गाडीतल्या लोकांचं मिठबाव, टेलिफोन कंपन्या, कोकण, राज्य सरकार, केंद्र सरकार या सर्वाना दूषणं देणं चालू झालं. “आमच्या पुण्यात कात्रजचा बोगदा पार करून शहरात आलं की अगदी नाशिक फाट्यापर्यंत, आणि पिंपरीपासून हडपसर पर्यंत एक इंच सापडणार नाही जिथं रेंज नाही”, इति काकू. कोथरूडमधल्या माझ्या घरातल्या एका अख्ख्या दहा बाय बाराच्या खोलीतला इंच अन इंच मी रेंजसाठी पिसून काढला होता, हे मी मनातच ठेवलं.
त्यांचे बोलण्याचे विषय संपले.तीनेक मिनिटं शांततेत गेल्यावर “गाणी लाव की रे जरा”, काका वदले. पेनड्राईव कारटेपला लावलेला होताच. नेमकी त्यात कुठली गाणी आहेत याचा मला अंदाज नव्हता. याच्या आधीची फर्माईश कोणाची यावर तेअवलंबून होतं. मामा असेल तर स्वामींचं भजन, मामी असेल तर एखादं भावगीत, आणि आमचे बंधू-भगिनी असतील तर लेटेस्ट बॉलीवूड....काहीच अंदाज नव्हता. गाडीतील समर्थांच्या फोटोला मनोमन वंदन केलं आणि नॉब फिरवला. “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली” चालू झालं. भजनाच्या ठेक्याचं एक आवर्तन संपत नाही तोपर्यंत “शी बाई! अरिजितचं नाही का तुमच्याकडे?”...सूनबाईंनी आपली धार्मिक पातळी दाखवली. “किशोरचं आहे का बघ रे जरा”, हा काका कुरकुरले. “मी मनात हसता लाव”, काकूंनी मनातलं सांगितलं. आता त्या मनात कश्या हसत असतील, काकांनी त्यांना कधी रोमँटिक मूड मध्ये “पल पल दिल के पास तुम रहते हो” ऐकवलं का? आणि या बयेला अरिजीतचा षड्ज आणि पंचम कळत असेल का? हे माझे विचार संपतात तोपर्यंत कुणकेश्वर आलं.
हे सर्वजण “आम्ही येतो रे अर्ध्या पाऊण तासात, इथेच थांब, कुठे जाऊ नको” अशी आज्ञा देऊन श्रीदर्शनाला निघाले. मी गाडी पार्क केली, पटकन देवळात जाऊन नमस्कार केला आणि परत गाडीपाशी येऊन थांबलो. गावातला माझा दुसरा एक मामा त्याच्या रिक्षातून एक भाडं घेऊन आला होता आणि तो पार्किंगमध्ये भेटल्याने माझा वेळ जायचा प्रश्न नव्हता.
दिड-एक तासाने मंडळी परत आली. उन्हात समुद्रकिनारी फिरल्याने त्यांना सपाटून भूक लागली होती बहुतेक. काका माझ्याजवळ आले, दहा रुपयाची एक न माझ्या हातात कोंबून म्हणाले, “आम्ही काहीतरी खाऊन घेतो, तू पण चहा वगैरे पिऊन घे”. आता मात्र माझी सटकली. याचं कारण त्यांनी दहा रुपये टेकवले हे नव्हतं, तर त्यांनी मला आपुलकी न दाखवता , मला त्यांच्याबरोबर न बोलावता, तुच्छ लेखलं म्हणून. मला आठवतंय, माझ्या लहानपणापासून आम्ही कधीही गाडी ठरवून कुठे गेलो कि फक्त माझे आई बाबाच नव्हे, तर काका, मामा कोणीही असूदेत, त्या ड्रायव्हरला आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजूनच वागायचो. कुठं काही खायला गेलो कि त्यांना आपल्या बरोबरच बसवायचो. वस्ती करायची असेल तर त्यांची निवाऱ्याची सोय आम्हीच करायचो, त्यांना गाडीत झोपायला सांगायचो नाही. त्यामुळे “हे दहा रुपये घे आणि काहीतरी खाऊन घे”, हे खटकलं होतं. त्यांनी माझी काळजी करून दहा रुपये दिले होते हे पटत होतं, पण मग दहाच का? चांगले पन्नास तरी द्यायचे पोटभर खायला. या विचाराने माझी सटकली, आणि मी ठरवलं कि आता जरा मज्जा करायची.
मी ते सगळेजण ज्या हॉटेलमध्ये गेले त्यांच हॉटेल मध्ये शिरलो. आणि त्यांच्या समोरच्या टेबलावर बसलो. वेटर आल्यावर त्याला विचारलं , “दादा, सगळ्यात महाग डिश कुठली आहे हो?” त्यानं सांगितलेल्या चार डिश पार्सल सांगितल्या. समोरच्या टेबल कडे बघून त्यांचं बिल अंदाजे १२०-१५० रुपये येणार हा अंदाज होताच, आणि त्यांच्यापेक्षा जास्त बिल माझं व्हायला पाहिजे होतं. नेमकं तसाच झालं आणि मला २०० रुपये बिल आलं. मी क्रेडीट कार्ड वर पेमेंट केलं, आणि त्या काकांनी दिलेली १० रुपयाची नोट वेटरला टीप म्हणून ठेवून टेचात बाहेर आलो, आणि गाडीत जाऊन बसलो.
मागोमाग बाकीची मंडळी गाडीत येऊन बसली आणि मी गाडीला स्टार्टर मारला. पाच-सात मिनिटं कोणीच काहीच बोललं नाही. वातावरण गूढ झालं होतं. काकूंचा पेशन्स थोडा कमी पडला बहुतेक, त्यांनी विषयाला हात घातला. “बरेच पैसे मिळतात दिसतंय तुला”. “नाही काकू, मिळतात पोटापाण्यापुरते”, मी सांगितलं. “नक्की किती सुटतात रे महिन्याला?”. आता हा प्रश्न खरंच गरजेचा नव्हता, पण उत्तर देणं भाग होतं. मी माझी कंपनी मला महिना जेवढा पगार देते तो आकडा बोललो. “वर्षाला एवढे, खूप आहेत कि रे ड्रायव्हरला”, काकांनी चर्चेत भाग घेतला. मी पु लं च्या गोष्टीतल्या त्या पाताळविजयम मधील राक्षसासारखा उगाच “हा हा हा$$” हसलो, आणि म्हणालो “वर्षाचे नाही, महिन्याला एवढे मिळतात”. विषय तिथेच थांबला आणि आम्ही गावी पोचलो.
संध्याकाळी मामा तणतणत घरी आला, आणि म्हणाला “कुठे आहेत साहेब? अरे मज्जा कर, पण मला सांगत तरी जा काय झालय ते?”. मी विचारलं, “काय रे झालं मामा?”. त्याने नंतरचा किस्सा सांगितला. ते काका नंतर दुकानात आले होते आणि मामला सांगत होते. “अरे बाळ्या, तू कामाला माणसं ठेंवतोस ती जरा नीट चौकशी करून ठेव रे बाबा.”. मामाला संदर्भ लागायलाच खूप वेळ लागला होता. त्याने पहिल्यांदा विचार केला कि नंद्याने काही घोळ घातला का?, मग मयेकर काकांचा विचार करून झाला. मग मनातल्या मनात सचिन, दिनूमामा सगळयांचा त्याने उध्द्धार केला असावा. त्याला बिचाऱ्याला माझी शंका यायला वावच नव्हता. शेवटी खोदून खोदून विचारल्यावर काकांनी “तुझा तो रे माजूरडा ड्रायव्हर” असं सांगितलं, आणि मामाने त्यांना मी त्याचा भाचा, पुण्यातल्या एका कंपनीत नोकरी करतो ते सर्व सांगितलं आणि मला बोलवायला तो आला होता. त्याच्याबरोबर मी दुकानांत आलो, काकांची माफी मागितली आणि त्यांना मी असं का वागलो ते सांगितलं. त्यांना विनंतीसुध्दा केली कि ड्रायव्हरला आपुलकीने वागवा, आणि त्यांनीपण मोठ्या मनाने ते मान्य केलं.
सुट्टी संपली, मी पुण्याला आलो. कंपनीत गेलों, ई-मेल चेक केल्या आणि काकांच्या सुनेने तिच्या भावाचा बायोडाटा कुठे नोकरी आहे का हे विचारून पाठवला होता.

Nice 👍
ReplyDeleteमस्तच लेखनशैली आहे तुझी तेजस आणि फारच मजेदार अनुभवकथन केलायस 🏝️👍
ReplyDeleteखुप छान लेखन तेजस
ReplyDeleteChan!!
ReplyDelete🤣🤣🤣
ReplyDeleteखुप छान तेजस
ReplyDelete👌👌 मस्त लेखन वाचकाला पकडून ठेवतं.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteवाह रे पठ्ठ्या.
ReplyDelete