माझ्या पुष्पाआत्याच्या घरी एक खेळणं होतं. दुर्बिणीसारखं , पण दोन्ही बाजूनी आरसे, आणि आत बांगड्यांचे तुकडे घातलेले. सुरेश काकांनी सांगितलं होतं त्याचं नाव, कॅलिडोस्कोप. आपण थोडं फिरवलं की आतली आकृती बदलायची. मज्जा वाटायची तेव्हा ते बघताना. कोणाची आकृती जास्त छान आहे यावर मी आणि ताई भांडत बसायचो, पण आपली दुसऱ्याला दाखवेपर्यंत ती आकृती बदललेली असायची. खेळणं तेच, आरसे तेच, काचा त्याच, बघणाराही तोच, पण कसं बघतोय यावर आकृत्या वेगळ्या असायच्या, जरा फिरवलं की बदलायच्या.
दृष्टिकोनाच पण असंच काहीसं असतं. आपण एखाद्या घटनेकडे कसे बघतो त्यावर ते अवलंबून असतं. माझा नवरा असंच वागतो, बायको अशीच करते, मुलगा आपल्याच नादात असतो, सासुसासरे असेच आहेत, हे सगळे आपले दृष्टीकोनच नव्हेत का? आपली सासू ज्या गोष्टींसाठी खाष्ट वाटते, तीच गोष्ट आपल्या आईने केली की ती तिच्या सुनेची चूक असते. गोष्ट तिच, बघणारीही तिच, पण फरक पडला दृष्टिकोनामुळे.
ऑफिसमध्ये सहकारी सांगतो ते पहिल्यांदा चुकीचं वाटतं, पण तेच साहेबाने सांगितलं की आपल्याला साक्षात्कार होतो..कारण काय ? आपला दृष्टिकोन.
बातम्या ऐकताना एका चॅनेल वर तिचं बातमी एका पध्द्तीने , समजा सरकारविरुद्ध सांगितली, तर तिच बातमी दुसऱ्या चॅनेलवर सरकारच्या बाजूने सांगितली जाते, घटना तिच, दृष्टिकोन वेगळा ( हे दृष्टिकोन कदाचित विकले गेलेले असतात ही बाब जरा बाजूला ठेऊत)
डाव्यांचा दृष्टिकोन वेगळा, उजव्यांचा वेगळा. अमेरिकेचा वेगळा, रशियाचा वेगळा. नवऱ्याचा वेगळा, बायकोचा वेगळा. ह्याचा वेगळा, त्याचा वेगळा. मज्जाच आहे सगळी.पण खरं सांगू का? यामुळेच मज्जा आहे. सगळ्यांचे दृष्टिकोन सारखे असते तर जगण्यात मज्जाच उरली नसती. माणूस नव्हे तर माकडाच्या रूपातच राहिलो असतो आपण. म्हणूनच म्हणतो, देवा बरं केलंस बाबा, आम्हाला वेगवेगळे दृष्टिकोन दिलेस.
आपण आपल्या आयुष्याकडे कसे बघतो, आपला त्याविषयी दृष्टिकोन काय आहे ? काय साध्य करायचं आहे आपल्याला, यावरचं जगण्यातली मज्जा असते.मला विचाराल तर माझा दृष्टिकोन एकदम सोपा आहे. मी ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी मी एकटा रडत होतो, बाकी सगळे आनंदाने हसत होते. ज्यावेळी मी जाईन त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असलं पाहिजे, आणि बाकीच्यांच्या डोळ्यात अश्रू. हे मिळवण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते करायचं, बस्स !!

Very true. .छान लेख..
ReplyDeleteMasta...tejas..dolas drushtikon...
ReplyDeleteVery nice article tejas, reminded me of my childhood. Even I had a kaleidoscope, which I used to show off.
ReplyDeleteनिळा कॅलिडोस्कोप...
ReplyDelete