दुकानातल्या गमती-जमती



    खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी चार-पाच वर्षांचा असेन 👱.  मामा कोल्हापूरला आमच्या घरी आला. बाबा आणि तो कुठेतरी गेले, काहीतरी घेऊन आले , बऱ्याच पिशव्यात बांधून 👜 आणि  मामा परत मिठबावला गेला.  नंतर मला कळलं की मामा दुकान टाकतोय.  सुरू करण्याला "टाकणं" म्हणतात ते नवीनच कळलं मला. नंतर सुट्टी लागल्यावर मी मिठबावला गेलो. मावशी-आजीच्या घराला रस्त्याला लागून एक जागा होती त्यात मामाने दुकान थाटलं होतं, त्याच्या पणजोबांच्या नावानं, “रामकृष्ण ट्रेडर्स”. त्यावेळी मला माझ्या खापर पणजोबांचे नाव माहीतच नव्हतं.  रामानंद सागर यांचे “रामायण” आणि नंतर चोप्रांचे “महाभारत” याचा काळ असल्याने कदाचित “रामकृष्ण” असेल असं मला वाटलं होतं. 


    माझा पूर्ण दिवस दुकानात जायला लागला. दुकानात गेल्यावर गल्ल्यावर बसायला खूप मजा यायची. गल्ल्यावर बसल्यावर  ‘बाबांपेक्षाही जास्त पैसे 💰आपल्याकडे आहेत’ असं मला वाटायचं.  गणित चांगले असल्याने बिलांची टोटल करणं हे माझ्या आवडीचं काम होतं. 


    सगळेजण दुकानातून सामान घेत, आणि पैसे देत.  मालाचा ट्रक🚚 आला की मामा हमालांना हमाली देत असे;  पण सगळ्याच  सामानाचे पैसे ट्रकवाल्याकडे देत नसे. (कोल्हापूरच्या व्यापाऱ्याचा माणूस नंतर येऊन पैसे घेऊन जात असे ते मला त्यावेळी माहित नव्हतं).  त्यामुळे ‘एकदा दुकान टाकलं की आपण फक्त हमालांना दोन-पांच  रुपये द्यायचे नि सगळा माल आपला. तो आपण विकायचा आणि भरपूर पैसे मिळतात’ हा माझा समज होता. येत आहेत तेवढ्या बेरजा-वजाबाक्या-गुणाकार करता आले की बस्स , आणि काय हवं ? ठरवूनच टाकलं होतं की दुकानदार व्हायचं. 


    शक्यतो दुपारची वेळ निवांत असायची . गिऱ्हाईकं क्वचितच. मामा माझ्यावर दुकान टाकून घरी किंवा इतर कोणाचे काही काम असेल तर बिनधास्त जाऊन येत असे. एकदा दुपारी मी दुकानात एकटाच होतो आणि कोणीतरी आले आणि म्हणाले “जरा वाईचं चार-पाच पाना दी !”.  मी बापडा चार आणि पाच नंबरचा पाना शोधू लागलो 🔧. मला काहीतरी शोधताना बघून ते म्हणाले, “अरे, ह्या काय पाना, माका दिसता ता बग समोर”, म्हणून ते एका ठिकाणी बोट दाखवु लागले. मला काही त्या ठिकाणी पाना दिसायला तयार नव्हता. मी त्यांना विचारत होतो “कुठे आहे?”. मी तिथेच घुटमळत आहे हे बघून त्यांनी मला सांगितले” अरे ह्या काय करंडीत”,🍚  पानांच्या करंडीकडे बोट दाखवत ते म्हणाले.  मी पडलो कोल्हापूरचा घाटी. “चार-पाच पाना” म्हटल्यावर मला चार आणि पाच नंबरचा पानाच आठवला होता. खायची पानं हवी होती त्यांना 🍃

    हातावरचे पोट असलेली बरीचशी गिऱ्हाइकं काही ठराविक वस्तू दररोज न्यायची.  “खाऊचे पान” ही त्यातली एक गोष्ट. ती मोजून देणे हे बाकीच्या गोष्टींपेक्षा सोपे असल्याने पानं मागायला कोणी आलं की मीच मध्ये लुडबुड करून पानं बांधून द्यायचो. बहुतेक आठ रुपये शेकडा पानं होती त्यावेळी, म्हणजे दोन रुपयाला पंचवीस. एक दिवस अशीच दुपारची वेळ होती. ग्राहकांची काहीही गर्दी नव्हती. “तू बस इथं, कोणी आलं तर थांबायला सांग,  मी आलोच दोन मिनिटात”, असं सांगून दहा मिनिटांपूर्वी मामा घरी गेला होता. एक आजोबा दुकानात आले. “ रे झीला, रुपयाची पाना दी माका”. असं सांगून दुकानाबाहेरच्या कट्ट्यावर आपली चंची काढून पान जमवू लागले . मी पद्धतशीर पानं मोजून,  एका कागदात लपेटून, दोरा वगैरे गुंडाळून अदबीने बाहेर नेऊन त्यांना दिली. आजोबा म्हणाले, “आता ह्येका दोरो कित्या बान्धलस? सरळ पिशीत ठेऊची हत माका” असं म्हणून त्यांनी दोरा आणि कागद सोडून टाकला. सगळ्यात वरती एक अर्ध फाडलेलं पान होतं. “अरे मेल्या$$ अर्धो पान तू खाल्लस की काय?”  असं ते म्हणताचं माझ्यातला गणिती जागा झाला. “आजोबा दोन रुपयात पंचवीस तर रुपयात किती? सांगा बरं .. साडेबारा… “ असा मी त्या आजोबांना भागाकार शिकवत असेपर्यंत मामा आला आणि आजोबा सुटले.  माझ्या भागाकारातून आणि त्यांच्या तोंडाने पण. काय काय बडबडत होते आत्ता आठवत नाही. आणि आठवलं तरी ते लिहिण्यासारखं असेलच असं वाटत नाही. मामाने आणखीन दोन पाने त्यांच्या हातात कोंबली. ते आपट्याच्या व्हाळापर्यंत जो भेटेल त्याला थांबवून अर्ध्या पानाची कथा सांगत होते. मामाने  मला समजावलं, “अरे,  एक दोन पानं जास्त द्यायची,  हजारी करंड्यात थोडी जास्त असतात”. मी नवीन करंडी फोडून त्याची खातरजमा करण्याच्या  तयारीत आहे हे बघून मामा म्हणाला, “बरं!  एकाला बारा दे आणि दुसऱ्याला तेरा दे, मात्र फाडू नको अर्धं”.  आता “बाराचा कोण आणि तेराचा कोण हे कसं ओळखायचं” हा प्रश्न ऐकून मामाने मला “आजी बोलावते आहे तुला”  हे सांगून पिटाळलं. 


    मुंबईच्या चाकरमान्याने पाठवलेल्या पैशांवर गुजराण करणारी बरीच माणसं होती वाडीत. अशा कुटुंबाला मामाचं दुकान हा आधार असे. मामाही माणुसकीला जागून या माणसांकडे पैसे नसले तरी उधारीवर वस्तू देऊन त्यांची नड भागवायचा. एका पॅडला क्लिप लावून अशाच बर्‍याच उधाऱ्यांची नोंद ठेवली होती. असेच  एका दुपारी मामा माझ्यावर दुकान सोडून गेला. आत्ता वेळ घालवण्यासाठी काही तरी करूया म्हणून इकडे तिकडे बघताना मला ते पॅड दिसलं. मग काय एक नवीन कागद घेऊन सगळ्या उधाऱ्यांची बेरीज त्याच्यावर लिहून ठेवली. त्या कागदावर “आतापर्यंची एकूण उधारी - येणे बाकी” असे मोठ्या अक्षरात लिहून तो कागद सगळ्यात वरती लावून ठेवला. अंदाजे  वीस-तीस हजारांच्या घरात आकडा आला असावा.  तोपर्यंत मामा आला आणि मी जेवायला घरी गेलो. काही वेळानं मामा घरी आला. गुपचूप जेवला. त्याला शांत चेहरा बघून आईने विचारलं,  “काय रे? काय झालं?” मामाने मी पॅडला लावलेला वरचा कागद तिला दाखवला. बहुतेक जरा टेन्शन आलं होतं त्याला तो आकडा बघून. कदाचित माझी टोटल बरोबर नसेल असं वाटून त्यांनी स्वतः सुद्धा खातरजमा करून घेण्यासाठी परत बेरीज केली असावी.  माझी टोटल नक्कीच बरोबर होती; पण तो आकडा मात्र त्याला घाबरवून गेला होता. नंतर आई मला म्हणाली, “असं परत करू नको, त्याला टेन्शन येईल.”   

    मी दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे जसे. दुकानात बसणे ही दर दिवशी पाच सहा तासाची गोष्ट होती.  त्यावेळी तागड्या इलेक्ट्रॉनिक नव्हत्या, तर एका बाजूला वजन आणि दुसऱ्या बाजूला सामान ठेवून मापले जात असे. माझ्यातला गणिती इथेपण लुडबुडायचा. शेंगदाणे वगैरे गोष्टी मापताना सामानाच्या बाजूचे पारडे थोडे तरी खाली गेले तरी एक एक दाणा काढून घ्यायचो, अगदी तंतोतंत वजन होईपर्यंत. पुढे काही वर्षांनी इलेक्ट्रॉनिक काटे आल्यावर पण एक किलो म्हणजे एकहजार ग्राम हे समीकरण मी शंभर वेळा दाखवून देत असे. मामा पुडी बांधताना थोडी जास्त दाणे घालून बांधत असे. मला वादात जिंकणे अवघड वाटत असेल मामाला; पण या त्याच्या दुकानातल्या कृतीनेच मला माणुसकी, सामाजिक जाणीव असे असंख्य धडे दिले आहेत. 


    पाव किलो साखर,  डाळ किंवा इतर काही गोष्टी कायमच लागत, आणि गर्दीच्या वेळी त्यांच्या पुड्या बांधताना वेळ जात असे. म्हणून गर्दी नसताना आम्ही त्या पुड्या बांधून ठेवत असू. त्यातल्या त्यात काबुली फुटाण्यांच्या आणि तिखट शेंगदाण्याच्या एक एक रुपयाच्या छोट्या छोट्या पुड्या बांधून एका तारेला लावून ठेवत असू. संध्याकाळ झाली की बरेचसे लोक त्या पुड्या घेऊन पुढे जात असतं. त्या वयात एवढ्या मोठ्या माणसांना ही इतके काय काबुली फुटाणे किंवा शेंगदाणे आवडतात हा प्रश्न मला पडत असे. आणि एखादीच पुडी त्यांना कशी पुरते? हा पण प्रश्न होताच. कोणीतरी मला असं समजावलं होतं कि त्या माणसांना खूप भूक लागलेली असते, आणि जास्त पैसे नसतात, त्यामुळे ते एकचं रुपयाचे फुटाणे खाऊन झोपतात. त्यांना एकचं रुपयाचे फुटाणे खाऊन इतकी शांत झोप कशी लागते, परत रात्री भूक लागत नाही का? हा प्रश्न अनुत्तरीतच होता त्या वेळी. “चकणा” हे त्या पुडीचं रूप कळायला लागेपर्यंत “शुभ्र-तृष्णा-शांती” गृहाच्या समोरच काबुली मिळायला लागली असावी बहुतेक. पण त्या पुड्या बांधणं हा पण एक कार्यक्रमचं असायचा. दुकानातल्या रिकाम्या झालेल्या फळ्यांवर नवीन सामानाच्या पुड्या करून रचून ठेवणे, माळ्यावरून साबण, बिस्किटे वगैरे खाली आणून लावून ठेवणे यात वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. महिना महिना तिथे राहून कंटाळा कधीही येत नसे.


    दुकानातली माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे दुकानाचा माळा.  कागदाची रद्दी,  जास्ती मागवलेले साबण,  कोपऱ्यांची बंडल, फटाके,बिस्कीट असा खजिना असायचा माळ्यावर. गावातल्या पोरापोरींच्या वापरलेल्या वह्या यायच्या रद्दीत. मे महिन्याच्या सुट्टीत पुढच्या इयत्तेतील काही वह्या मिळाल्या तर कौतुकाने वाचायचो मी ( खरंच सांगतोय ! ). थोडा मोठा झाल्यावर वह्यांपेक्षा मासिकात जास्त रमायला लागलो. त्या रद्दीतून आलेली कित्येक मासिकं मी माळ्याला लावलेल्या लाकडी शिडीवर बसून हातावेगळी केलेली आठवतात मला. 


    संध्याकाळच्या वेळी गावातील बरीचशी मंडळी दुकानासमोर गप्पांना येत.  त्यांच्या बसण्यासाठी एक खास बाक ठेवला होता.  त्या गप्पांच्या फडात प्रत्येक घराची खबरबात सर्वांना कळे. कुठे कोणाला काही मदत हवी असेल तर तिथे चर्चा होई. सर्व कार्यक्रमांचे नियोजन, कामाची विभागणी तिथेच होई. ठराविक वेळी न चुकता येणारे तीन-चार जण होते.  आमच्यापैकी एक आजोबा संध्याकाळी फरसाण खाण्यासाठी येत;  तर कोणी नुसत्या गप्पा मारायला.


गणपती-दिवाळीच्या वेळी तर दुकानात खूप लगबग असायची. लक्ष्मीपूजनासाठी संपूर्ण दुकानाची चकचकीत साफसफाई व्हायची. फक्त नातेवाईकच नव्हे तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असायचं पूजेला. मामा-मामीची पूजा करून झाली की आम्ही फटाके फोडायला मोकळे. पुढचे दोन-तीन दिवस येणाऱ्या सर्वांना मामा-मामी पूजेचा प्रसाद देत. खासकरून बरीचशी जेष्ठ मंडळी खास करून मामा-मामीवरच्या प्रेमापोटी येत, प्रसाद घेवून भरभराटीचा आशीर्वाद देऊन जात.


    दररोज दुकान बंद करणे हा सुद्धा एक कार्यक्रम होता. वडापाव वाला विनूमामा त्याचा गाळा बंद करून घरी जाताना बेसन-बटाटे न्यायला दुकानावर आला  की हळूहळू आवराआवरी चालू व्हायची. त्यांचे हिशेब होईपर्यंत दिन्यामामानी दुकानाचा परिसर स्वच्छ केलेला असायचा.  मी पैसे लावून ठेवलेले असायचे आणि मामा दहा-बारा वेळा तरी दुकानातल्या लक्ष्मीच्या तसबिरीपुढे नमस्कार करून आलेला असायचा.  मला वाटायचं झालं आता;  पण नाही. मामा बिलं, टपाल  काढायचा,  व्यवस्थित लावून घ्यायचा. मी एका हातात संध्याकाळी प्यायला दिलेल्या चहाचा  थर्मास आणि दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन घुटमळत असायचा. मामा बाहेरील मुख्य दाराला कुलूप लावून आठ-दहा वेळा ओढून बघायचा आणि मला पण ओढून बघायला सांगायचा.  मीसुद्धा पहिलवानाच्या जोरात कुलूप  ओढून बघायचो.  हा कार्यक्रम झाला की दुसर्‍या दरवाजाला कडी लावली जायची.  दोन क्षणात उघडली जायची.  मामा दुकानात आत जाऊन तेलाच्या डब्यांवर आधीच नीट ठेवलेले झाकण हलवून त्याच्या मते नीट लावून यायचा. कडी परत लावायचा, आणि परत एकदा काढायचा. कारण निघताना लक्ष्मीला परत एकदा नमस्कार. नमस्कार करण्याची पद्धत म्हणजे बॅटरी खाकेत, तिचा झोत लक्ष्मीच्या मुखकमलावर. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर काय सुंदर प्रभावळ दिसायची.  लक्ष्मीचा फोटो म्हटलं की मला ती तशीच दिसते मामाच्या बॅटरीच्या झोतामुळे  प्रभावळ असलेली.  ते झाल्यावर कुलूप लावता-लावता परत म्हणायला, “अरे निरांजन शांत केले ना?  उंदिर पळवतात रे वात”.  मी खात्री करून द्यायचो आणि पुढची बाजू बंद करून परत कुलुपांवर शक्ती-प्रयोग व्हायचे; आणि आम्ही मागच्या दाराकडे प्रयाण करायचो. तिथे असेच प्राणायाम झाल्यावर मामाचा “पुढंच दार नीट लावलं  आहे ना” हा प्रश्न आला की मात्र मी चिडायचो. कधी कधी वाटायचं हा उगाच मुद्दामून करतोय; पण आता कळतंय की तो त्याचा जीव की प्राण असलेल्या कर्मभूमीच्या चिंतेनेच असे करीत असे. रात्रीच्या जेवण झाल्यावर ही झोपण्याआधी आम्ही कुलुपे ओढून बघायला जात असू. 

 


    या दुकानात राहूनच मला अगदी लहानपणापासून खूप छान धडे मिळाले.  वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, अनुभवायला मिळाली. गावातल्या अत्यंत श्रीमंत माणसापासून अत्यंत गरीब माणूस दुकानात येत असे. त्या प्रत्येकाशी बोलून त्यांच्या कथा,व्यथा,अपेक्षा, सुखदुःख सर्व बघायला मिळालं. कर्मयोगी मामाकडून “कोणीही काहीही म्हणो, जर एखादी गोष्ट चांगली असेल तर ती करताना पुढे-मागे बघायचं नाही” या सोबत माणुसकी जपण्याचे धडे मिळाले.  आणि तेच शिक्षण मला माझ्या आजच्या जीवनात उपयोगी पडतात. 


    हल्ली मामाने दुकान चालवायला गावातल्या एकाला दिलंय, आणि मामा पूर्णवेळ शेतीमध्ये आहे. अजून गमतीची गोष्ट म्हणजे माझे सासरेबुवापण दुकानदारचं होते. त्यांच्या पश्चात आता मेहुणा दुकान चालवतोय. म्हणजे माझ्या मुलालापण "मामाचं दुकान आहे".

    

    हल्ली किराणा मालाच्या दुकानदारांवर काहीशी बिकट परिस्थिती आली आहे. भरपूर शारीरिक श्रम, उधाऱ्या, वाढती स्पर्धा या सर्वांमुळे दुकानदारांची परीक्षाच बघितली जाते. मॉल्सने तर त्यांचे कंबरडेच मोडले. एका दुकानात उधारी बाकी ठेवून नंतर दुसऱ्या दुकानात जाण्याची वृत्ती दिसायला लागली. या कोरोनाच्या काळात मॉल वगैरे बंद असताना मात्र हे दुकानदार देवदूत म्हणून धावून आले. सर्वाना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी खूप मोठा हातभार लावला. घरपोच सुविधा पुरवल्या, आणि आपल्या सर्वाना तगवलं. त्या सर्व दुकानदारांना प्रणाम करून ही साठा उत्तराची कहाणी संपवतो. 🙏





Comments

  1. छान! दुकान डोळ्यांसमोर उभे राहिले.

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय तेजस

    ReplyDelete
  3. Khup Chhaan...
    Pramod Mama Ani sagala parisar dolyasamor ala.

    ReplyDelete
  4. खुपच छान लेख....वाचताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले ......👌👌👌

    ReplyDelete
  5. छान निरिक्षण आणि वर्णन

    ReplyDelete
  6. मस्तच रे तेजस 👍👍

    ReplyDelete
  7. Sunder Limaye. Changali jamali katha.

    ReplyDelete

Post a Comment