कोकण निघाले केरळला




    दरवर्षी कुणीतरी आपल्या कुटुंबासह कुठेतरी सहलीला जाऊन यायचे. तिथल्या गोष्टी सांगायचे. फोटो दाखवायचे.  भेटवस्तू पण घेऊन यायचे. आम्ही फारच थोड्या वेळेला असे कुठेतरी फिरायला गेलो होतो त्याचं काही विशेष दुःख ही वाटत नसे, कारण प्रत्येक सुट्टीत माझं मामाचं  दुकान ठरलेलेचं असायचं.  

    नंतर कंपनीच्या कामानिमित्त बरेचदा परदेश प्रवास घडले. अशाच एका प्रवासात विमानातून ढगांची सुंदर दुलई पाहत असताना पटकन एक विचार आला की मिठबावच्या मामा-मावशी पैकी कोणीही अजून विमान प्रवास केला नाहीये. कोणी तो करू शकत नव्हतं असं मुळीच नव्हतं. ठरवलं असतं तर कोणीही विमान प्रवास करून आलो असतो.  पण योग जुळत नव्हते बहुतेक.  त्याच क्षणी ठरवलं की आपण सगळ्यांना घेऊन विमानातून सफर घडवून आणायची.  


    घरी परत आल्यावर अगदी ध्यास घेऊन त्या नियोजनाला सुरुवात केली. फेब्रुवारी-मार्चच्या सुमार असे नियोजन चालू केल्याचा. ऑफिस मधल्या काही मित्रांशी चर्चा केली आणि केरळवारी करायचं नक्की केलं. 


    मग सगळ्यांना फोन लावून झाले. कोकणातल्या कोणालाही एप्रिल-मे मध्ये वेळ असण्याचा प्रश्नच नव्हता.  अहो आमच्याकडे एप्रिल-मे मध्ये आंब्याची इतकी गडबड असते की मामाकडे गेलात तर तो त्याच्या बागेतले आंबे टेम्पोतून घरी आणायला किंवा कॅनिंगचे आंबे कुणकेश्वरला पोहोचवायला पिटाळतो. मावशीकडे गेलात त्यांचीपण तोबा गडबड. या गडबडीत सहल कुठली? जून-जुलै म्हणजे एकतर तुफान पाऊस किंवा इतर शेतीची वगैरे कामे.  नंतर गणपती, मग दिवाळी. नंतर हे - मग ते. मला तर वाटायला लागलं होतं की कोकानातल्यांना केरळला नेण्यापेक्षा  केरळ उचलून मिठबावला आणणं सोपं असेल. पण उद्देश केरळचा नव्हता तर विमान प्रवासाचा होता.  “केरळमध्ये नवीन काय बघायचं, इथं आहे कि सगळं”, हा प्रश्न अपेक्षित होताच.  पण मी माझ्या ध्येयाला चिकटून होतो. 


    नेहमीप्रमाणे मातोश्री मदतीला धावल्या आणि त्यांनी सल्ला दिला,  “महाळाच्या दिवसात सगळे मोकळे असतील!”.  तो धागा पकडून सगळ्यांना फोन केले आणि त्या पितरांना तृप्त करण्याच्या पंधरवड्यातले  पाच दिवस ( ते ही शनिवार-रविवार धरून , म्हणजे मला तीनच दिवस रजा घ्यावी लागेल) असे राखून ठेवायला सांगितले. ठरलं तर मग,  २१ ते २५ सप्टेंबर २०१६, विमानातून केरळची सहल! 


    आता प्लॅनिंग चालू केलं. ऑफिस मध्ये  ट्रॅव्हल एजंट होतांच. लगेच नियोजन चालू झालं. आमच्या माँसाहेब,  मुख्याध्यापक काका या शिक्षक लोकांना घेऊन प्रवास करायचा असल्याने नियोजनात कुठलीही कसर पडून चालणारच नव्हती. त्यामुळे सहलीचे वेळापत्रक आखल्याप्रमाणे कुठल्या दिवशी किती वाजता काय बघायचं, कुठे विश्रांती घायची,  कुठे पोटपूजा करायची, कुठे वस्ती सगळं घड्याळ्याच्या काट्यांच्या हिशोबात लिहून ठेवलं.      


    सगळ्यात पहिलं काम होतं विमानाची तिकीट बुक करणे. जितक्या लवकर करावी तितकी स्वस्त मिळतात,  म्हणून जूनमध्येच  तिकीट बुक करायला सुरुवात केली आणि पुढच्या दोन-तीन दिवसात तिकीट बुक झाली.  एकूण पंधरा जण होतो आम्ही. पाच लिमये, पाच सोमण, दोन गोगटे, दोन भिडे आणि एक जोशी

 

    तिकीट बुक झाली आणि मग पुढच्या गोष्टी डोळ्यासमोर यायला लागल्या. सगळ्यांना मुंबई विमानतळावर यायला सांगणे म्हणजे टेंशनच होतं मला. मग फर्मान सोडलं, “आपली सहल माझ्या घरातून चालू होईल आणि माझ्या घरात संपेल, सगळ्यांनी एक दिवस आधी इथेच या!”. मुंबईहून दुपारी पावणेदोन ची फ्लाईट होती.  सकाळी सातला एक अठरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर मागवून घ्यायचे ठरवले. मुन्नार-टेक्काडी-अलेप्पीमध्ये एक दिवस हाऊसबोट मध्ये वस्ती, हत्तीच्या सोबत मज्जा, कथकली आणि कल्लरीपट्टू, मसाल्याच्या बागेत फेरफटका, आयुर्वेदिक मसाज आणि खूप खरेदी असा जंगी प्लान केला. आणि ही सगळी तयारी करुन झाल्यावरच डोक्याला शांतता आली


    जुलै-ऑगस्ट कसा गेला कळलाच नाही. सप्टेंबरची दहा तारीख आली आणि सहलीचे वारे सगळ्यांच्या अंगात घुमायला लागले. “विमानातून नेता येणाऱ्या सामानाचे वजन” याची काळजी सगळ्यांना आपल्या वजनापेक्षा जास्त झाली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी मे महिन्यात काही कार्यक्रमानिमित्त आईने सर्वांना एकाच प्रकारच्या बॅग्स गिफ्ट केल्या होत्या, केवढी ही दूरदृष्टी!  त्या बॅग्स आपल्याबरोबर विमानात नसणार म्हणून त्यांच्यावर आयडेंटिफिकेशन मार्क काय असावा यावरही सगळ्यांची बरीच चर्चा झाली. हे घेतलं तर चालतं का नाही? यावर काका-मावशी-मामा-मामी यांची बरीच चर्चा व्हायची आणि निकाल माझ्या कोर्टात व्हायचा.


    मी पण आता या सगळ्याची तयारी केली होती.काय-काय चुकू शकेल? असं झालं तर काय करायचं?  तसं झालं तर काय करायचं? अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला. हॉटेलचे बुकिंग, तिकीट, प्रत्येकाचे मोबाईल नंबर लिहिलेला एक कागद या सगळ्यांच्या प्रतींचे पाचसहा संच काढले आणि वीस तारखेची वाट बघायला चालू केलं.


    आणि तो दिवस उजाडला!  संध्याकाळपासून एक-एक कुटुंब आमच्या घरी येऊन धडकायला सुरुवात झाली. सगळे आल्यावर मी एक छोटीशी नियमावली सर्वांना सांगितली. हिशेब ठेवणे एकांकडे, हॉटेल मध्ये गेल्यावर ऑर्डर कुणी द्यायची वगैरे जबाबदाऱ्या सर्वांना वाटून दिल्या. (माझ्याकडे कुठलीच ठेवली नाही , हे सूज्ञास सांगणे न लगे).


एकवीस तारखेला सकाळी सातला आम्ही देवाला नमस्कार वगैरे करून गाडीत आसनस्थ झालो, आणि साडेदहाच्या सुमाराला विमानतळावर. विमान पावणेदोन चं. तीन तास देशांतर्गत विमानतळावर काढणे हे किती शिक्षा असते हे बऱ्याच जाणकारांना माहीत असेलच.पण आम्ही सगळे एकत्र होतो आणि मुख्य म्हणजे विमानतळावर आमचे सगळे पहिल्यांदाच आले होते.  चेकिन सेक्युरिटी वगैरे सोपस्कार पार पडले आणि आम्ही बोर्ड झालो. 


    खिडकीकडे कोण बसणार यावरून हमरातुमरी होते की काय अशी परिस्थिती होती.  पण मी “थोडं  शांत बसा , भांडू नका” असे सल्ले दिले आणि सगळे एकदाचे स्थानापन्न झाले. थोड्या वेळात हवाई सुंदरींने सुरक्षानिवेदन चालू केलं. ऑक्सिजन कमी झाला तर वरून नळी येईल किंवा विमान पाण्यात पडलं तर लाईफ जॅकेट सीटच्या खाली आहे असे ती सांगत होती. ते ऐकून सगळे “काय काय होऊ शकतं?” याचा विचार करू लागले असावेत.  काहींच्या  पोटात गोळा आला आहे मी ओळखलं आणि “विमान उडताना मोठा गोळा येतो पोटात” असं  मुद्दामून जोरात म्हटलं.  विमान धावपट्टीवर आलं.  इंजिनचा आवाज आला आणि एक जोरात पुढे ओढल्यासारखा धक्का देऊन विमान धावपट्टीवरून वेगात पळू लागलं. त्यावेळी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. आनंद, भीती, आश्चर्य, कुतूहल सगळे भाव मुखकमलांवर होते. विमानाने  नाक वर वरून पाय जमिनीवरून पोटात ओढून घेतले आणि मी समाधानानं तृप्त झालो. केरळच्या या सहलीत खूप धमाल झाली,  खूप किस्से झाले. पण आता आवरतं घेतो.  ते नंतर कधीतरी. पण हे मात्र नक्की की विमानातून उतरताना हवाई सुंदरींने काकांना आणि त्यांनी तिला दिलेल्या स्माईल्स बघून मावशीच्या नाकाचा शेंडा मात्र लाल झाला होता.


Comments

  1. Wah khup mala aali vachtana 😄

    ReplyDelete
  2. Masta, i know of this event. Very beautifully articulated and well woven story

    ReplyDelete
  3. छान, यशस्वी प्लॅंनिंग,👍

    ReplyDelete
  4. Hya satyakatha ahet ki kalpanik?

    ReplyDelete
    Replies
    1. केरळची व इतर बऱ्याच (धाडस वगैरे ☺️) सत्यकथाच आहेत 👍

      Delete

Post a Comment