क ची करामत (अनुप्रास)

 


कोल्हापूरचे कोल्हटकर काका  कायमचे कावलेले.  काका कोपिष्ट. काकू कायम कपिलेप्रमाणे. काका कामसू.  कोणाचेही कोणतेही काम कधीही, केव्हाही, कसेही,  कुठेही काकांनी केलेच. कोरोना काळात काका-काकूंचे काळीज काळजीने काळवंडलेले. कामानिमित्त केदार कलकत्त्यात. कोणा कोणाची काळजी करायची? 


काळजी करणारे काका  कसले? काकूच कायम कासावीस.  काळजी करणाऱ्या काकूंचा कासावीसपणा कमी करण्यासाठी काकांनी काकूंना कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप करण्याची कार्याज्ञा केली. काकूंनी केळ्याची कापे  करण्याच्या कामात कसूर करून कापे करपवली.  काकांनी कुरकुर करीत करपलेली कापे कवळीखाली कुस्करली.  करपलेल्या कापांच्या काजळीने काकांची कोरी करकरीत कवळी काळवंडली.  काकू कचरल्या.  काका काळ्या कापांवरून कचकच करणार की काय? 


काका काकूंच्या कानात काहीसे कुजबुजले, “करपलेली काळी कापे कशाला? कुरकुरीत काकडीचा कीस कर”. काकूंनी किसणी काढली.  कोरी करकरीत किसणी.  कोवळी काकडी कर-कर किसली.  कढईत काकडीच्या किसात किस्मिस कुस्करले.  कपाटातून काजू काढले. काकांच्या किस्मतीच्या  कोट्यातल्या काकडीचा कीस कल्हईच्या कढईतून काकांपुढे कढवला. किसासोबत काजू-कतली काढली.  काजू-किस्मिसयुक्त कोवळ्या काकडीच्या किसाने काकांचा क्रोध कमी केला.  काकूंची काळजीही कमी केली. किमानपक्षी कलकत्त्यातल्या केदारची काळजी करण्यापेक्षा काकूंची काकडी, केळ्याची कापे,  काजुकतलीची काळजी केव्हाही कौतुकास्पद!  


काल काकांनी कठीण काम करण्याचे कष्ट केले. काम करता करता काकांना कोपराला कापले. काकांची काया कणकणली. कण्हणाऱ्या काकांनी काकूंना कावरंबावरं केलं. काकूंनी कडू काढा केला. कसनुसं करून काकानी काळपट काढा कंठस्थ केला. काढ्याने कणकणीची कसर कमी केली.


काकू कविता करत.  कवितेसाठी कोरे कागद कपाटातून काका काढत.  कधीतरी कपाटातून कागद काढताना काकांनी काकूंचे कोरे करकरीत कागद काजळाने काळे केले.  का केले? कशासाठी केले? कोणी काही कल्पनाच का करेल ? काकूंनी काळ्या कागदाची कस्पटे करून कल्ला केला. काकांनी कुठूनतरी कुंकवाची कोयरी काढली.  कपाळाच्या कुंकवाने कोयरीतले कुंकू काढल्याने काकूंचा क्रोध कोमेजला.  काकूंचे कष्ट कमी करण्यासाठी काकानी काकूंना कुर्निसात केला.  काकांनी केलेल्या कदरीचे काकुनीसुध्दा कौतुक केले.  काकांनी काकूंना कधीही कुरापत काढताना काळजीपूर्वक करण्याचे कबूल केले.


काका-काकूंची कौतुकाची कहाणी कायमच करामत करील !!



Comments

Post a Comment