राजा बढे यांनी १९५२ साली लिहिलेलं हे अजरामर काव्य. हृदयनाथांच्या हातात येतं, स्वरांचा साज आपल्या अंगावर चढवून घेतं, आणि ते आशाताईंच्या मधाळ आवाजात आपल्या कानावर ते येतं .. यासारखा योग नाही...
त्यावेळी आपली ही जर आपल्यासमोर गडबडीने अगदी घरातली कामं करतं धावपळ करत असेल, आपणही तिला मदतीचा हात म्हणून काही खुडूक मुडुक कामं करतं असू , आणि दोघांच्या कानावर बाहेर कुठंतरी लागलेलं गाणं कानावर यावं, आपण तिच्याकडे पाहून एक स्मितहास्य करावं, आणि तिने खुदकन हसावं.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हे माझं खूप दिवसापासून स्वप्न आहे.
.
.
.
स्वप्न म्हणालो, कारणे बरीच आहेत
१) हल्ली हे गाणं कुठून ऐकू येण्याची शक्यता कमीच.
२) आलंच जरी तरी तिच्याकडे बघून एक स्मितहास्य वगैरे देण्याचं डेरिंग माझ्यात नाही...का काय विचारता, पुढचा प्रश्न येईल, "अरे काळ वेळ काहीतरी बघ की, काय दुपारी डोळे मिचकवतोयस?"
३) बरं समजा, वेळ पण योग्य असली , आणि माझं डेरिंग झालं, तर ती लाजणार तर नक्की नाही..इश्श बिष्य काय नसत आमच्याकडे...एकतर रेड्या नाहीतर पेढ्या , बस्स...
.
.
.
.
. ( आता हा रिव्हर्स गियर आहे बरं, परत गाण्याकडे)
.
.
.
तर, अहाहा, काय ते सुंदर काव्य
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले,
ओंजळी उधळीत मोती, हासवी ताराफुले
बढे साहेबांना अभिप्रेत अर्थ मी त्यांना वर गेल्यावर नक्की विचारणार आहे. पण या काव्याच्या मूळ अर्थविषयी बरेच मतप्रवाह आहेत. बाळासाहेब छान सांगू शकतील, पण त्यांच्याकडे मी जायचा विचार करणं, म्हणजे मुंगी उडाली आकाशी सारखे आहे, तेवढी आध्यत्मिक पॉवर आपल्यात नाही. मग कायं, आपणच अर्थ शोधत बसायचं..
प्रियकर आपल्या प्रेयसी कडे ज्यावेळी पाहतो, त्यावेळी तिला तिच्या बारीक सारीक हालचाली, कटाक्ष, फेकलेले हास्य अगदी हा$$य करून सोडतात. ( 3 एडियट्स मधला करीना पिवळ्या स्कुटर वरून उतरून हेल्मेट काढून येते तो सीन आठवा, किंवा मधुबाला वा माधुरीची कुठलीही अदा आठवा आणि मग वरच्या ओळी वाचा.....अर्थ लागेल...
वाहते आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुजाची झळाळी तार पदरा गुंफीले
काही जण ती जणू आपली वसुंधरा, अंतरीक्षातून फिरत आहे अशी कल्पना करतात....मला मात्र ती संक्रांतसणात आभूषणांनी नटून आलेली आपली अर्धांगिनी दिसते....काळ्या साडीत, हलव्यांच्या दागिन्यांनी नटलेली ती आठवा ......अर्थ लागेल......
.
.
.
.
.
.
.
( हल्लीच्या तरुणांनी , शॉर्ट जीन्स , कंबरेवर एक सापाचा टॅटू, आणि टॉप वर घेतलेला, रस्ता झाडत जाणारी ओढणी अशी कल्पना केली तरी चालेल, अर्थ तोच लागेल.....)
.
.
.
.
.
.
पुढची ओळ.
गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी , बोलावरी नादावले
आता प्रत्येक रचनेत एकच कल्पना किंवा अर्थ धरावा ही सर्वसाधारणपणे गझलेची अपेक्षा..पण आपण का ती बंधने आपल्याला घालून घ्यायची???
या ओळी वाचल्यावर एक छोटंसं बाळ की ज्याच्या पायात पैंजण घातलं आहे, ते दुडू दुडू धावत, बोबडे बोलतं आपल्याकडे येत आहे, अशी कल्पना करा....अर्थ लागेल (मंजीर म्हणजे पैंजण)
नेक्स्ट,
गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे
उफ्फ करणारी ही ओळ....
समजा तुम्ही विमानात आहात, खाली पहात आहात पण ढग आहेत......
(ते ढगही सुंदर दिसतातचं, पण खाली एक नदी, धरण किंवा हिरवंगार शेत आहे...भूगोलाची आवड असणाऱ्यांना पुणे/मुंबई ते दिल्ली विमानप्रवास करताना नर्मदेवरून विमान गेलं तर खाली दिसणारं विहंगम दृश्य, किंवा पुणे/मुंबई ते चेन्नई जाताना जर फ्लाईंग रूट तिरुमलावरून असेल तर तिथलं दृश्य, किंवा पुणे/मुंबई ते कोची असेल तर कोचिमध्ये लँड होताना 20 मिनिटं दिसणारा केरळ, किंवा ब्रुसेल (बेल्जियम), लिल (फ्रांस), झुरिच (स्विस) यापैकी कोणत्याही (लंडन, पॅरिस, आम्सटरडॅम नव्हे) कुठल्याही विमानतळावर उतरताना दिसणारं विहंगम दृश्य, यापैकी कुठलही पकडा )
तर खालचं दृश्य जर ढग आडवे आले म्हणून दिसलं नाही, तर या वरच्या ओळी परत वाचा, ......अर्थ लागेल..
किंवा असं समजा की ती शांत झोपली आहे, आणि तिचे केस तिच्या मुखकमलावर आले आहेत....आणि ओळी परत वाचा...तोच अर्थ लागेल.....
किंवा असं समजा की आत्ताच तुम्ही शेतात मळणी चालू केली आहे, आणि धान्याचे टपोरे दाणे हळुहळू बाहेर येत आहेत....जवळपास तोच अर्थ लागेल....
तर असं हे माझ्या मनातल्या अनेक सुंदर सुंदर गाण्यांपैकी एक छान ठेवणीतलं गाणं, आज अचानक आठवण आली.....
आजचा दिवस हेच गुणगुणण्यात किंवा वाजवण्यात जाणार .......

छान विश्लेषण केलं आहे
ReplyDelete