तहानेचं स्थानमहात्म्य

सर्वसाधारणपणे तहान पाण्याने भागते. पण काहीवेळा एका विशिष्ट पेयाची तहान लागते. आणि ती तहान भागवायला त्या स्थानी जावं लागतं. असत तहानेलाही स्थानमहात्म्य.

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात गेलं की मला आवारातील दत्ताच्या देवळातल्या तीर्थाची तहान लागते. थोडा कापूराची चव असलेलं ते दूधाच तीर्थ, एका आचमनाने मन शांत होतं. तशी माझी देवावर आंधळी भक्ती अजिबात नाही, पण त्या तीर्थसाठी मी अकरा प्रदक्षिणा, आणि प्रत्येक प्रदक्षणेनंतर तीर्थाला हात पुढे, असं खूप वेळा केलं आहे.

तसंच मंदिरातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाज्यातून बाहेर आलं की तहान लागते ती खोंद्रे यांच्या पाचक सोड्याची. लिंबू, आलं,  शिंदेंलोंन (सैंधव) आणि पादेलोण (याला हे नाव का आलंय माहीत नाही, पचनासंबंधी असल्याने असावं) घालून तयार केलेले पाचक, आणि dukes चा सोडा. स्ट्रॉंग आवडणार्यांनी यापेक्षा स्ट्रॉंग कुठे मिळत असेल तर सांगावं....मला तरी अजून नाही सापडलं...
तर या पाचक सोड्याची पण एक वेगळी तहान लागते.

कोकणातून गगनबावडा मार्गे कोल्हापूरमध्ये आलं की रंकाळा बसस्थानकापाशी आल्यावर एक वेगळी तहान लागते ती "सोळंकी" यांच्या दूध-कोल्ड्रिंक ची. मिल्क शेक वेगळा, आणि आमचं हे दूध कोल्ड्रिंक वेगळं. सोळंकीची दुकाने भरपूर आहेत, कुठंही जा, तीच चव.

तसेच सांगली, सोलापूर, पुणे भागातून लालपरी मधून कोल्हापूरला गेलं की तहान लागते ती कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील "यळगुड"च्या मसाला दुधाची.

साकोली कॉर्नर भागात गेलं की तिथल्या नवनाथ मधील ऊसाचा रस. दोन ग्लासच्या वर जातच नाही. वाकरे गावातल्या आमच्या गवळीमामांच्या गुऱ्हाळात तर एक ग्लासमध्ये काम तमाम....

टाऊन हॉल परिसरात गेलं की मोहकची
आणि महाद्वार रोड वर असेल तर तृषाशांती मधील लस्सी.

पुण्यात हल्ली लोकांना कोल्ड कॉफीची तहान लागते. दुर्गा, मुक्ताई अशी अनेक ठिकाण आहेत, की त्यांच्या दोनशे मीटर आसपास गेलं की ती विशिष्ट तहान लागतेच..

काही लोकांना सात नंतर तहान लागते, त्याविषयी अभ्यास कमी आहे, पण ती तहान सुद्धा वेगवेगळ्या रंगाने आणि ढंगाने भागवली जाते म्हणतात , असो ☺️

प्रत्येक गोष्टीची तहान वेगळी. ती इच्छा झाल्यावर पाणी पिऊन बघा, भागतच नाही ती तहान. दुधाची ताकावर भागत नाही, आणि ताकाची दुधाने...


Comments

  1. कोल्हापूर ला छान फिरून आल्यासारखे वाटले .
    मी कोल्हापूर लाअसताना बस स्थानकाच्या प्रवेश करताना yalgud च्या दुकानात नानकटाई नेहमी घ्यायचो, मसाला दूध माहीत नव्हते, रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारायला गेल्यावर सोळंकी ice-cream कधी चुकले नाही. आम्ही साळुंके नगर विद्यापीठाच्या जवळ राहत होतो. आठवड्यातून तीनचारदा तरी अंबाबाई दर्शन साठी जायचो. तेव्हा राजाभाऊ चि भेळ भवानी मंडपाच्या शेजारी आपसूक होती. सकाळी गेलो तर मिसळ ही चोरगे कडे खायची असा नेम च असायचा. भव्यदिव्य अशा करवीर नगरीचा फेरफटका करून दिलास जुन्या स्मृती ताज्या केल्या त्याबद्दल तेजस तुमचे खूप खूप आभार
    शिरीष पाटील

    ReplyDelete
  2. कोल्हापूर चि अजून एक आठवण म्हणजे बिंदू चौकात थोडे पुढे मिळणारे दूध...mhaishi घेऊन काही गवळी असतात धारोष्ण दूध तांब्याच्या /पितळी lotyamadhe ....सामान्य माणसाचे काम नव्हे...आम्ही हे जास्त स्थानिक पैलवानाला पिताना बघण्याची मजा घेतली...पिण्याची कमी

    ReplyDelete

Post a Comment