अनंत अमुची ध्येयासक्ती


आपण ज्या ज्या वेळी संकटात असतो, त्या त्या वेळी काहीच मार्ग सापडत नाही म्हणून आपण देवाला पाण्यात बुडवून ठेवतो, किंवा त्याला काही प्रलोभने दाखवतो. मला वाचव, मी तुला हे देईन, ते देईन. अहो, देव काही भिकारी नाही आहे आपल्याकडून काही घ्यायला. त्याला भूक असते ती फक्त भक्तीची. आणि ती संकटसमयीच नाही तर सदोदित करावी लागते.

मी नास्तिक आहे का? मुळीच नाही. मी देव मानतो. पण मला त्याचे अवडंबर मान्य नाही. मंदिरात काही विशिष्ट लहरी असतात, हे सगळे मान्य करायला हरकत नाही, पण त्यासाठी मंदिरात शांतता नको का? गर्दीत रांग लावून ओंगळपणाने आजूबाजूच्याना ढुश्या मारत देवाला नमस्कार करायला मला आवडत नाही.

मुळ मुद्दा काय, तर संकटे आली की देवाचा धावा करावा, हरकत नाही. पण तो क्षणभर. त्याची महानता मान्य करून आपण आपल्या समोर जे वाढून ठेवलं आहे, त्या संकटाचे आपल्याला निवारण कसे करता येईल, ते पहावे.

हे मी सांगितलं तर कुणी ऐकणार नाही, पण मी असं म्हटलं की कुसुमाग्रजांनी पण त्यांच्या एका कवितेत अगदी हेच सांगितलं आहे, तर? कसे ते पहा...

कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात..

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे
ढळु दे दिशा कोन सारे

कविता मोठी आहे, बरीच कडवी आहेत, आणि मला पाठही नाहीत (लज्जास्पद आहे, पण सत्य आहे, मान्य करावे लागेल)

कुसुमाग्रज म्हणतात, समुद्रा तुझ्या अवाढव्य लाटा असुदेत, किंवा वादळे येऊन आम्हाला दिशाहीन करुदेत, पण आम्ही डगमगणार नाही, आम्ही तुला पार करणारच....

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!

गर्वाने शिडे कुठली उभारायची, तर मी असं मानतो की ही शिडे आपल्या आतापर्यत कमावलेल्या ज्ञानाची, आणि धनाची (मैत्रीधन) उभारायची, तीही गर्वाने. म्हणजे आपल्याला हा आत्मविश्वास हवा की आपण या संकटावर आपले ज्ञान, मित्र यांच्या साहाय्याने मात करू शकतो. मी तर मानतो की देवाला हाक मारण्यापेक्षा मित्राला हाक मारा. सच्चा मित्र येईलच. आणि आपणही मित्राच्या हाकेला धावून जायचं बरं, नाहीतर आपण कायम हाक मारायची, आणि इतर वेळी आपले कान बंद, असे उपयोगाचे नाही..

म्हणून म्हणतो, दिसू दे मज किनारा, पेक्षा शोधीन मीच तो किनारा म्हणावे, आणि तडफदारपणे आलेल्या संकटाला सामोरे जावे...


Comments