असे खूप कमी विषय आहेत, की ज्यांची आठवण आली की मला धडकीच भरते, आणि त्यातला एक विषय म्हणजे चित्रकला. मला चित्र बघायला खूप आवडतात. अगदी तैलचित्र, जलरंगात काढलेले चित्र, abstract चित्र, किंवा आणखी कुठलही चित्र असेल तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी लागणारी नजर, आणि मन माझ्याकडे नक्कीच आहे. पण माशी शिंकते ज्यावेळी मी स्वतः चित्र काढायचा विचीत्रपणा करतो.
मी चित्रकलेचा धसका घेतला तो पाचवी मध्ये असताना. चौथी पर्यंत आमची चित्रकला म्हणजे चौकोन, वर्तुळ, त्रिकोण आणि फारफारतर डोंगर, नदी, एक घर , त्यावर झेंडा, आकाशात ढग, आणि ४,४ करत काढलेले कावळे यापुढे कधी गेलीच नव्हती. पाचवीत असताना मात्र चित्रकलेला जे गुरुजी होते, त्यांनी पहिल्याच तासाला "मुलानो, आपल्या आवडत्या प्राण्याचं चित्र काढा" असे फर्मान आम्हाला सोडले, आणि मास्तर सकाळ पेपर मधील चित्र पाहत बसले.
आपला आवडता प्राणी कुठला ते ठरवण्यात आधी पाचेक मिनिटं गेली. मांजर आणि हत्ती यात हत्ती जिंकला, माझ्या इवल्याश्या बोटातून चित्र चितारण चालू झालं. चित्र काढता काढता असा विचार आला की हत्तीचच चित्र काढतो आहे, तर ऐरावत काढू. आणि अस म्हणून दहा सोंडेचा तो ऐरावत माझ्या कागदावर अवतार घेऊ लागला.
चित्र पूर्ण झालं, आणि मी काढलेल्या ऐरावताकडे पाहिलं, आणि स्वतःलाच "भले शाब्बास!", अशी शाबासकीची थाप दिली. मास्तरांनी एकेकाला पुढे बोलावून त्यांचं चित्र बघायला सुरुवात केली. चिद्या, अभ्या, केद्या, साऱ्या (या सगळ्या मित्रांची नावे अशीच तोंडात आहेत, आणि तशीच लिहिली जातात) यांची चित्र मास्तरांनी पाहिली, आणि त्यांचे कौतुक केले. माझा नंबर आला, आणि मी चित्र घेऊन सरांकडे गेलो. त्यांनी ते निरखून बघितलं, आणि दोन मिनिटांनी त्या कागदाला 180 अंशातून खाली डोक वर पाय करूनही बघितलं. कागद निरखून पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर असे काही भाव होते की जणू ते राजा रविवर्मा याने काढलेले चित्र पाहून भारावून गेले आहेत. मग त्यांनी विचारलं, "लिमया, लेका, काय काढलायस रे हे". मी म्हटलं , "ऐरावत". मास्तर खो खो हसले आणि म्हणाले, "अरे लिहायचं मग खाली ऐरावत म्हणून, मी मघापासन ऑक्टोपस म्हणून बघत होतो". त्या दहा सोंडाना मी अशी काही वळणे दिली होती, की नंतर मला पण तो ऑक्टोपसच जास्त वाटायला लागला.
या एका प्रसंगाने माझ्यातला चित्रकार मेला, आणि भारत एका पिकासोला मुकला.
पण या माझ्या चित्रकलेने माझ्या आयुष्यात मला एकदा वाचवलं पण आहे. त्याच काय झालं, दहावी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अकरावी मध्ये मी जास्त अभ्यास करणार नाहीये, काय तो बारावीत करतो, अस आधीच घरी सांगितलं होत. मला मेडिकलला जायचं नव्हतच, त्यामुळे जीवशास्त्र हा विषय नकोच होता. पण आम्हाला अकरावीत जीवशास्त्र विषय सोडता येत नव्हता. बारावीत त्या ऐवजी भूगोल घेता येत असे. अकरावीत कुठल्याच विषयाचा अभ्यास वर्षभर केला नाही, आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी त्या त्या विषयाचे वाचून जाऊन पेपर लिहिले. आता गणित, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र हे एका दिवसात वाचून चांगले मार्क मिळवण्याचे विषय नक्कीच नाहीयेत. पण माझ्या एकपाठीपणा मुळे अख्खं पुस्तक एका दिवसात वाचून पेपर लिहिले. आणि जीवशात्रात कॉलेज मध्ये टॉपर आलो. झालं, बारावीत मला जीवशास्त्र सोडायला बाई परवानगी देत नव्हत्या. त्यांना खूप समजावून सांगितलं, तरी काही उपयोग होत नव्हता. मला तर काहीही करून जीवशास्त्र नको होत. केवळ मेडिकलला जायचं नाही म्हणून नव्हे, तर त्यात कान, हृदय , त्यातल्या जवनिका वगैरे चित्र काढायला लागायची. त्यातल्या त्यात एकच चित्र मला यायचं ते म्हणजे अमिबा. बाकी सगळी बोंबाबोंब होती. पण त्या टॉपर येण्याने मला संकटात टाकलं होत.
बारावीचा फॉर्म भरायचा काही दिवस आधी एक चाचणी परीक्षा होती, आणि त्यात जीवशास्त्रात एक प्रश्न होता, हृदयाची आकृती काढा. तेव्हा मला एक कल्पना सुचली, आणि चक्क प्रेमभंग झालेल्या कवीच हृदय ( टिपिकल दील शेप, त्यात घुसलेला एक बाण, आणि अश्रू रुपी रक्त...) आणि खाली टीप, "आतातरी मला जीवशात्र सोडू द्या, प्लीज".
अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी जीवशास्त्र शिकवणाऱ्या बाईंनी स्टाफरूम मध्ये बोलावून घेतल, आणि काही न बोलता माझ्या फॉर्म वर "भूगोल" लिहिलं. माझ्या चित्रकलेनेच तारल मला.
त्यानंतर कित्येक वर्ष मी चित्र काढलच नव्हत. इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये ग्राफिक्सच्या प्रोफेसरनी तर अख्य्या वर्गासमोर मी ड्राफ्टर वापरून काढलेला क्यूब आणि त्यांनी फक्त हाताने काढलेला क्यूब यात त्यांचा क्यूब खुप उजवा होता, हे दाखवल होत.
काही वर्षांपूर्वी मात्र कुंडलिनी जागृत व्हावी तशी माझी चित्रकला बाळस धरू लागली. निमित्त होत ते आमच्या चिरंजीवानी भित्तीचित्र काढायला सुरुवात केली तो दिवस. बालपण हिरावून घ्यायचं नाही म्हणून मी मुलाला घरातल्या एका आतल्या खोलीतल्या भिंतीवर चित्र काढायची मुभा दिली (तो मोठा झाल्यावर स्वतः भिंत रंगवून देईन या वचनाच्या बदल्यात). तो काही दिवसांनी त्यांच्या friends ना आमच्या घरी घेऊन येऊ लागला. त्यांना चित्र काढायला दिलं की याला एक वेळ जास्त बॅटिंग असते हे नंतर समजलं. आणि बाळगोपालांची ती चित्रकला पाहून मलाही स्फुरण चढल. चांगले पोस्टर कलर आणून मी भिंतीवर चित्र काढायला घेतल. सुरुवात गणपतीने केली, मात्र त्याचा मुकुट आणि चेहरा काढत असताना, सोंड काढायच्या आधी सहज बघितलं, आणि वाटलं की याचा हनुमान भारी होईल. मग गणपतीची जागा मारुतीने घेतली. बलदंड काढावा अश्या विचाराने माझ्याकडून त्या मारुतीरायाला दंडावर सुजल्यासारखी एक बेडकुळी आली होती. सिक्स पॅक दाखवण्याचा प्रयत्न इतका फसला की नंतर मी मारुतरायाला सबंध अंगभर पिवळ उपरण घ्यायला लावलं. महत्प्रयासाने खूप डागडुजी केल्यावर चित्र येवढतरी जमलं की "हा मारुती आहे", अस खाली लिहिण्याची वेळ आली नव्हती.
त्यानंतर मात्र मला एक नवीन उमेद आली की आपण चित्र काढू शकतो, आणि मग रामाने जसा अहील्येचा उद्धार केला, तसाच मी एका जुन्या वहीमध्ये माझ्या चित्रकलेचे नमुने काढून त्या वहीचा उद्धार केला. असंख्य माणसे चितारली. फक्त प्रत्येकात एकच प्रॉब्लेम होता, की सरळ नाकाच कुणी नव्हत. नाकपुडी हा विषयच अवघड. नंतर नंतर नाक, डोळे यांचा नाद सोडून मी प्रोफाईल व्ह्यू मधली चित्र काढू लागलो. ती वही एकदाची भरली, आणि तिच्यासोबत माझ्या चित्रकलेचेही दिवस भरले.
हल्ली मी फक्त ही अशी शब्दचित्र काढतो, आणि ती चार पाच जणांना आवडतात म्हणून काढत राहतो.🤣
Balpanamadhe gheun gelas mitra
ReplyDelete👌
ReplyDeleteखूप छान .. one pic is worth of 100 words ..but your one story is worth of 1000 pics . Super
ReplyDelete👌खुप छान
ReplyDeleteखूप छान तेजस...
ReplyDeleteशब्द चित्र तर छानच असतात.आणि ती तू काढतच रहा
ReplyDelete