धुके
मला आठवतीये ती पहाट अजूनही, पाहिलेल्या पहिल्या धुक्याची, कदाचित अनुभवलेल्या पहिल्या धुक्याची ! आईने पहाटेचं हाक मारली. आजोळी जायचं होतं आम्हाला पहाटेची गाडी पकडून. तोंड धुण्यासाठी नळावर गेलो आणि धुकं बघितलं. दोन-पांच मिनीटं नुसतंच बघत राहिलो. जणू ढगच आले होते खाली. नेहमी समोर दिसणारा रस्ता, ती दूरवरची टेकडी काहीही दिसत नव्हते. बाहेर पडणाऱ्या उच्छवासाची वाफ होताना बघूनही खूप मजा वाटली. आईनं समजावलं, धुकं का पडत, कसं तयार होतं, आणि कसं निघून जातं. सर्व काही ! धुकं बघणं, धुक्यातून चालणं, सगळं खूप आवडत आलं आहे मला.
खूप वर्ष निघून गेली. शिक्षण संपलं. संसार चालू झाला. नोकरीत वरच्या पदावर पोहोचलो. कामाला वाहून घेतलं होतं मी स्वतःला. आयूष्यात खूप संकटं आली. बरीचशी पचवली. संकटाकडे शिक्षक म्हणून बघायला शिकलो. कामाच्या रगाड्यात जीवनशैली बदलली. पहाटेऐवजी “सकाळी” उठायला लागलो. अचानक एक दिवस बायकोचा आवाज कानी आला, मुलाला सांगतानाच, “हे बघ धुकं”. तसाच ताडकन उठून गॅलरीत गेलो. धुकं दिसलं; पण काहीतरी वेगळं जाणवलं धुक्यात.
लहानपणी सारखं पांढरशुभ्र नव्हतं तें. एक पिवळसर, काळपट झालर होती त्याला. धुक्यात आल्हाददायक वाटलंच नाही; तर थोडसं कंटाळवाणच वाटायला लागलं. वैज्ञानिक दृष्टिकोनांनं प्रदूषण, शहरीकरणाचे दाखले देऊन मनांचं समाधान चालवलं होतं. मन मात्र वेगळ्याच विचारांत गढून गेलं होतं. ते बालपणी पाहिलेलं धुकं! किती स्वच्छ आणि निरागस होतं! आणि आत्ता पाहिलेलं धुके होतं कळकट्ट उग्र दर्पाचं ! मन उदास करणारं !
एकदम कळून चुकलं. या धुक्यात आपल्याच मनाचं प्रतिबिंब तर नसेल ना? लहानपणीचं निरागस मन. एखाद्या फुलपाखरासारखं स्वच्छंद विहरणारं ! कुठल्याही अपेक्षांचं ओझं नसलेलं. हेवेदावे, स्पर्धा, काळजी यांचा स्पर्शसुद्धा नव्हता झाला त्याला. आणि आत्ताच मन? सदैव काळजीत गढलेलं. विचार आणि निर्णय यांचे द्वंद्व सारखं चालू असणारं. कदाचित त्याचंच प्रतिबिंब उमटलं नसेल ना त्या धुक्यात??
मग ठरवलं, मन स्वछ करायचं. आपल्या वैयक्तिक कर्तव्यांना पूर्ण करतांना घरातल्याना आणि बरोबरच्यांना त्रास न होऊ देण्याचं . यांत्रिकपणे कमी करून सहज सुलभ जीवन जगण्याचं. कुठल्याही परिणामांची भीती न बाळगता. असं जर का जमलं तर माझं मन स्वच्छ राहिल आणि कदाचित मला उद्याचं धुकं परत पांढरशुभ्र अल्हाददायकं वाटेल .

खूपच सुंदर
ReplyDeleteखंरय!!छान लिहीले आहेस.भाषा पण प्रगल्भ!!..डोळ्या समोरुन लहानपण सरकले अलगद...
ReplyDeleteमनाचे प्रतिबिंब खुपच सुंदर मांडले आहे...
ReplyDeleteनकळत बालपणाची अठवण झाली खरी.लघुकथेत वस्तुस्थिती आहे खरी..
ReplyDeleteछानच लिहितोस वाचताना धुक्यात हरवून गेलो
ReplyDelete