ज्योत

ज्योत 





नुकतीच दिवाळी सुरु झाली होती. संध्याकाळी आईने घराभोवती पणत्या लावल्या. त्यांच्या प्रकाशमान ज्योतींनी सारं आवार उजळवून टाकलं. 


  त्यातलीच एक ज्योत समाधानानं तेवत होती. अगदी शांतपणे. तेवढ्यात छोटा पिंटू फटाके पेटवण्यासाठी उदबत्ती घेऊन पणतीजवळ आला; आणि त्याने उदबत्ती पणतीला भिडवली. तिचं ते काळं, शिडशिडीत रूप बघून पणतीला शिसारीच आली . उदबत्ती ज्योतीइतकी प्रकाशमान नव्हती.  ठिणगीच्या स्वरूपात जळत होती ती.  तिचं ते अधुरंस जळणं पाहून ज्योतीला स्वतःबद्दल गर्व वाटू लागला . उदबत्तीला तुच्छ लेखलं तिनं ! 


            थोड्या वेळाने पिंटू फुलबाजी  घेऊन आला. त्यानं ती ज्योतीला धरून पेटवली.  फुलबाजीतून ज्योतीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक प्रकाश बाहेर पडत होता .  ज्योत जळू लागली फुलबाजीवर; स्वतः पहिल्यापासून जळत असताना .  ज्योत जळत राहिली फुलबाजीवर; स्वतःच्या जळण्यापेक्षा अधिक जोरानं , त्वेषानं .  पण दोनचं मिनिटात फुलबाजीचं आयुष्य संपलं ! ज्योतीच्या त्या पिवळ्या चेहऱ्यावर एक समाधानाची निळसर झाक आली. फुलबाजीपेक्षा जास्त प्रकाश नसला म्हणून काय झालं? आयुष्य जास्त मिळालं होतं तिला फुलबाजीपेक्षा.


           पण थोड्याच  वेळात  ज्योतीचीही  शक्ती  कमी  होऊ  लागली .  तिचं  तेज  कमी  झालं , तिच्यातून बाहेर  पडणारा प्रकाश कमी झाला; कारण पणतीतल  तेल संपल  होतं .  शेवटचे काही क्षण !  ज्योतीच्या अखेरचे काही सेकंद . उदबत्ती मात्र अर्ध्याहून जास्त शिल्लक होती. 


आता ज्योतीला कळून चुकलं .  आपण तेवत असताना  ‘आपलं  सामर्थ्य ‘ आपण फक्त प्रकाशाच्या स्वरूपात विचारात घेत  होतो; पण  खरं तर आपल्याला प्रकाशमान ठेवणारं तेल  हेच  आपलं सामर्थ्य आहे , आपल्यासाठी  ऊर्जा  आहे .  आयुष्यभर  आपणं  त्याचा  कधी  विचारच  केला  नाही.  आपण  जर थोडसं  मंद तेवलो  असतो तर  आणखी जास्त  वेळ  जगलो  असतो .  असा  विचार  पूर्ण  होतोय  ना  होतोय  तोच तेल संपलं , ज्योत शांत  झाली.


Comments

  1. खुप अप्रतीम ...सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. छान सुचत तुला... लिहित रहा

    ReplyDelete
  3. व्यक्त होण्याची ऊर्मी हीच तुझी ऊर्जा आहे ,सदैव प्रकाशमान रहा !!

    ReplyDelete

Post a Comment