बंधन

बंधन



एक  होती बाहुली, कठपुतळीच्या खेळातली.  हातापायांना दोऱ्या बांधलेली . सूत्रधाराच्या तालाबरहुकूम नाचणारी. त्या विशिष्ट  खेळातली मुख्य बाहुली, राणीच म्हणा नं. इतर  सगळया बाहुल्या तिच्या आज्ञेत असायच्या, स्वभावानंही खूप चांगली होती ती,  सर्वांना समजून घेणारी, सगळयांशी गोड बोलणारी, कठपुतळीच्या खेळातली राणी!  सदैव आनंदी; परंतु एकच दुःख होतं तिला.  ती नाचायची सूत्रधाराच्या आवाजात. तिचं अस्तित्व होतं दोऱ्यांच्या आधारावर, दोऱ्या सूत्रधाराच्या मर्जीत.  या दोऱ्याना तोडून स्वतःच्या मर्जीनं जगायचं होतं  तिला. 

खेळाचा सूत्रधार होता एक विदूषक, सर्कशीतला. आकर्षण  होता तो त्या सर्कशीचं !  विदुषकाचं काम होतं लोकांना हसवायचं, त्यांना रमवायचं.  कसरतपटूच्या  चित्तथरारक करामती, वाघ -सिंहाच्या काळीज थरकापवणाऱ्या डरकाळ्या यांमध्ये दर्शकांच्या मनाला  रिझवण्याचं !  विदुषक म्हणजे सर्कशीतला एक महत्वाचा घटक, त्याच्यावाचून  सर्कस अधुरीच !


पण, त्यालादेखील  एक खंत होती, त्याचं खरं मनच  कोणी समजून घेत नव्हत, खरच जरी  तो पाय घसरुन पडला; तरी कोणी त्याला “ लागलं का?” विचारत नव्हतं, तर त्याचीच करामत समजून हसायचे सगळे.  तेच  तेच खेळ दाखूवन, स्वतःच हस करून घेण्याला तो वैतागला होता. त्यालादेखील जगायचं होतं एक स्वछंद जीवन जिथं त्याच्यातल्या मनाला कोणी समजून घेईल; काही किंमत देईल. 


ही सर्कस बघायला दररोज याचया एक मानव, स्वतःच अस्तित्व असलेला, अत्यंत विचारी, व्यवहारी, दिलदार.  चांगलं हृदय होतं त्याच्याकडे; पण त्याहीपेक्षा तल्लख होता त्याचा मेंदू.  अभियंता होता तो, समाजात चांगलं नाव असलेला, सगळं होतं त्याचाकडे. घर, गाडी, पैसा, प्रेम  - सगळं  ….  पण कुठतरी होता तो असंतुष्ट.  कळतंच नव्हतं त्याला की  का करतोय आपण सगळं?  घेतोय ते कष्ट कोणासाठी?  जीवनाचं मर्म, त्यातला गभितार्थ कळत नव्हता त्याला. असच एकदा विरंगुळा म्हणून तो सर्कस बघायला आला आणि कठपुतळीच्या खेळाकडे बघून स्वतःला हरवून बसला. कठपुतळीच्या  खेळातली राणी त्याला विचार करायला  भाग पाडत होती.  तिच्याशी तुलना केली त्यानं स्वतःची, आणि कळून चुकलं त्याला !  पण स्वतःला नाचवणाऱ्या दोऱ्या काही त्याला सापडत नव्हत्या.   त्या जाणून घेण्यासाठी दररोज यायचा तो सर्कस बघायला, न  चुकता, पहिल्या रांगेत, कायम !


विदुषकही त्याला दररोज पाहायचा . आश्चर्य वाटायचं त्याला याच्या दररोज येण्याचं. विदुषकानं  पाहिलं त्याच्याकडे बरेच दिवस आणि ओळखलं,इतर वेळी अनुत्सूकपणे इकडे -तिकडे बघणारा तो, कठपुतळीचा खेळ चालू झाला की अगदी रंगून जात होता. मन एकाग्र करून बघतं होता कठपुतळ्यांचा  खेळ तो !  वेडाच ठरवून टाकलं विदूषकांन मानवाला. 


इकडे विदूषकालाही दररोज तोच तोच खेळ दाखवून कंटाळा आला होता.  एक दिवस सर्कशीचा मालक खूप आजारी पडला, यमराजाची चाहुल लागली त्याला. वारसही कोणी नव्हता, विदुषकावर खूप प्रेम होतं त्याचं.  त्यानं विदुषकाच्या नावे सर्कस केली अन अखेरचा श्वास  घेतला. आता विदुषक मालक झाला होता !  या व्यापात त्याला कठपुतळीचा खेळ दाखवणं शक्य न्हवतं.  त्यानं तो बंद केला आणि दुसऱ्या मनोरंजक खेळाचा विचार करू लागला. 


मानवाला चैन पडेना.  तो सरळ आला सर्कशीच्या नवीन मालकाकडे, कठपुतळीच्या खेळाबद्दल विचारायला.  विदुषकानंही ओळखलं त्याला.   भरपूर चर्चा झाली त्यांच्यामध्ये, साक्षीदार होती कठपुतळ्याची राणी. ऐकत होती ती तिच्या लाकडी कानांनी, बघत होती लाकडी डोळ्यांनी. मानवाच्या सल्ल्यानुसार विदुषकानं कठपुतळीच्या खेळात थोडा बदल करायचा ठरवला.  राणीच्या दोऱ्या कापल्या गेल्या, राणी मुक्त झाली.  मानवानं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर बाहुलीला चालतं बनवलं.  ती आता नाचू शकत होती, स्वतःच्या पायांनी, दोऱ्यांशिवाय. मुक्त वाटलं तिला.  एकचं खंत होती, ती सुध्दा निघून गेली. 


 विदूषकही आता मालक झाला होता !  त्याला सर्वजण मान देत होते.   त्याचं अस्तित्व महत्वपूर्ण झालं होतं.  त्याला उगाचच हसण्याची, त्याची चेष्टा करण्याची आता कोणाची हिंमतच  नव्हती.   त्याच्या मनातला सल देखील निघून गेला होता. 


एकंदर सर्व घडामोडीतून मानवाला देखील स्वतःला बांधल्या गेलेल्या दोऱ्या सापडल्या होत्या, अदृष्य स्वरूपातल्या.  एक दोरी होती नातेवाईकांची आणि मित्रांची, दुसरी प्रेमाची, तिसरी पैशाची, चौथी वेळेची, एक नशिबाची, एक कामाची …. या सगळ्या दोऱ्या त्यानं जाणून घेतल्या. आता या सर्व दोऱ्यांमुळे जरी त्याची कुतरओढ झाली, तरी तो समजून घेऊ शकत होता, कारण तो विचारी होता, आणि त्याला दोऱ्या सापडल्या होत्या. 


पण आता बाहुलीला कळून चुकलं की ती पूर्णपणे मुक्त नाहीये झालेली.   तिला वागावं लागत होतं अशा तऱ्हेने की लोक कंटाळणार नाहीत.  लोकांना खुश करण्याचं फक्त काम दिलं गेलं होतं तिला.  आणि तिला माहित होतं की जर तिनं हे केलं नाही तर तिला कोणी चालूच देणार नाहीत.  दुसऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणं नाचावं लागत होतं तिला, दोऱ्या  गेल्या, पण विदुषकचं झाला होता तिचा. 


विदूषकाला  आता स्वतःच्या  मर्जीत जगता येत होतं, मान देत होते त्याला सगळे.  “दुसऱ्याला वाटतंय किंवा पाहिजे म्हणून असं कर”  अशी काही बंधनं नव्हती त्याच्यावर.  सर्व काही होतं त्याच्याकडे.  मान, सन्मान, कीर्ती, पैसा.  पण तरीही तो समाधानी नव्हता; कारण त्याला उमजत नव्हतं की का करतोय आपण हे सगळं?  नवीन खंत प्रवेशली त्याच्या मनात.  अगदी या गोष्टीतल्या मानवासारखा झाला तो. 


आणि मानव?  त्याला दोऱ्या सापडल्या होत्या त्याला नाचवणाऱ्या !  आधी त्याला कळत नव्हतं, आता कळून चुकल की का करतोय तो हे सगळं.  पण त्याचा तल्लख मेंदू त्याला स्वस्थ बसू देईना.  सारखा विचार करू लागला तो या बंधनांचा.   असं बंधयुक्त अस्तित्व नको होतं त्याला.  जे कळतं नव्हतं ते कळलं ; पण जे कळलं ते पटत नव्हतं.  कठपुतळीच्या खेळातल्या बाहुलीसारखं झालं होतं त्याचं जीवन.  नवीन दुःख निर्माण झालं त्याच्या मनात. 


हे चक्र असंच चालू राहणार ! अखेरपर्यंत  !  बाहुली, विदुषक, मानव  ! बंधनं, अस्तित्व  अन अनाकलनीय विचार आणि वर्तणूक. हेच युद्ध चालू असतं आपल्या मनात ! आपल्याला हवी असतात उत्तरं काही प्रश्नांची, पण ती मिळाली कि नावेच प्रश्न निर्माण होतात -----  चक्र चालूच रहात  !


यावर उपाय काय ?  अजून कोणालाही सापडला नाहीये तो.  देवालासुद्धा.   कारण  तो सुद्धा अडकून आहे बंधनात भक्तीच्या, प्रेमाच्या आणि दयेच्या ! 


Comments

  1. अगदी खरं, कितीही try केला तरी यातून सुटू शकत नाही

    ReplyDelete
  2. सुंदर बोधकथा ! हा प्रवास अधिक गूढतेकडे जाईल तेव्हाची कथा जी.एं ची उंची नक्की गाठील.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. मस्त लिहिलंय, असं वाटतंय कि स्वतःचीच कथा वाचतोय.
    बंधन असतात म्हणून माणूस जगात असतो, त्याच्या जगण्याला अर्थ असतो, ज्यावेळी माणूस हे सर्व बंधने तोडतो, त्यावेळी त्याच्या जीवनातला अर्थ निघून जातो, आणि तो आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागतो, ज्यावेळी त्याला जे वाटते त्यावेळी तो ते करतो, आणि आपण अशा माणसाला वेडा माणूस म्हणतो, त्यामुळे आपल्या जीवनात काहींना काही बंधने असावीतच असे मला वाटते.

    ReplyDelete

Post a Comment