बॅडमिंटन

बॅडमिंटन





    खेळ अगदी रंगात आला होता. शटल खाली पडू न देण्यासाठी दोघंही आपलं कौशल्य पणाला लावत होते. दोघांच्याही रॅकेट्स शटलवर लयबद्ध गतीत येत होत्या. शटल हवेत विहार करत होतं ! इकडून -तिकडे . तिकडून -इकडे !


    कोर्टच्या बाजूला आणखीही काही शटल्स पडली होती. काही अजून न वापरली गेलेली शटल्स आपला नंबर येणाच्यी वाट बघत होती कंटेनर मध्ये. काही अगणित आडवे -तिडवे फटके बसल्यामुळे पिसं गळून जीर्ण झालेली शटल्स उसासे टाकतं वाट बघत होती स्वतःला कचऱ्याच्या पेटीपर्यंत पोहोचवणाऱ्या मुलाच्या येण्याची. 


    कंटेनर मधील शटल्स त्यांचं जीवनकार्य करायला उत्सुक होती. सध्या वापरलं जाणारं शटल जीवनकार्य निभावत होतं; आणि बाद झालेली शटल्स जीवनकार्य संपवून वाट बघत होती, मुक्तीची ! 


    आपलं जीवनकार्य काय? ते आपण नीट करतोय का? कधी करू शकू आपण ते? असे अनेक प्रश्न विचारतात कंटेनरमधील शटल्स. पण स्वतः असतात कोणत्याही त्रासाशिवाय , चैनीत, सुखात !


    वापरलं जाणारं शटल जीवनकार्य करत असतं. अगदी पहिल्यांदा हवेत उडवल्यावर, उंचावरून खाली बघताना खूप छान वाटतं त्याला. पण लगेच त्याला फटकावलं जायला लागतं. अनेक यातना भोगाव्या लागतात त्याला . जेव्हा त्याला त्या असह्य होतात ; त्यावेळी ते प्रतिकार चालू करतं. पिसं गळू लागतात त्याची. आणि शेवटी त्याला निरुपयोगी समजून टाकून दिलं जातं. जीवनकार्य पूर्ण केल्यामुळे समाधानी असतात ती. त्यापैकी काही आनंद घेत असतात उडणाऱ्या शटल्स ना बघून, प्रोत्साहित करत राहतात त्यांना. उडणारी शटल्स पण त्यांच्याकडे बघत असतात मार्गदर्शक म्हणून. पण इतर काही शटल्स मात्र अत्यंत दुर्लक्षित असतात. सारखी आपल्या नशिबाला दोष देत कुढत राहतात ती.  कोणाच्याही आधाराशिवाय; कसल्याही सहानुभुतीशिवाय. मग टाकून दिलेल्या शटल्स कडे फक्त रहात वाट बघणं; त्या कचऱ्याच्या पेटीपर्यंत पोहोचवणाऱ्या मुलाची! 


    आपलंही काहीसं असच असतं ! बाल्य,तारुण्य दर्शवितात कंटेनरमधील शटल्स .प्रौढत्वाचं प्रतिक आहे वापरलं जाणार शटल. आणि नंतरच शटल दर्शवतं  विरक्ती, वैराग्य. आपलंच प्रतिरूप जणू !  


    मग खेळवतं कोण आपल्याला? भरपूर खेळाडू आहेत इथं. देव, दैव , नशिब, परिस्थिती, वैचारिक क्षमता, आर्थिक कुवत, सामाजिक प्रतिष्ठा असे अनेक खेळाडू आहेत . स्पर्धेचं नावं आहे “संतुष्ट जीवन प्रतियोगिता“. जो पुरेसा वेळ कंटेनरमध्ये राहील, जास्तीत जास्त वेळ खेळत राहील , उडणं बंद झाल्यावर इतरांना मार्गदर्शन करीत राहील आणि कमीत कमी वेळ नशिबाला दोष देत कुढत राहील तोच खरा समाधानी !


    जीवन सार्थ आहे का निरर्थक याचं उत्तरच देत होती ती तिन्ही प्रकारची शटल्स .   

 


 



  


  



Comments

Post a Comment