सुट्टीतले क्वारंटाईन आणि आयसोलेशन - मनाचे !

    कोरोना रुपी संकटाने यावर्षी माणसाला खूप गोष्टी शिकवल्या.  माणुसकीची नितांत सुंदर उदाहरणे बघायला मिळाली. मानवी स्वभावाचे विविध कंगोरेही पहावयास मिळाले. विलगीकरण (क्वारंटाईन) आणि अलगीकरण (आयसोलेशन)  हे शब्द बहुश्रुत झाले.

 

    कोरोना काळाआधी आपण सर्वजण आठवड्यातून एक तरी सुट्टी घेत होतो.  कोरोनाकाळ सुरू झाला आणि आपण सुट्टी विसरलो.  नेमकं काय झालं बरं?  ज्यांच्यावर या संकटाचा खूप जास्त परिणाम झाला, ज्यांना कामावर, उद्योगाच्या जागी किंवा  नोकरीसाठी कार्यालयात जाता आलं नाही त्यांच्यासाठी सगळे दिवस सारखेच होते.  ज्यांचे घरातून काम सुरू होते ते सुट्टीच्या दिवशीपण कामच करत राहिले; कारण सुट्टीच्या दिवशी करण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं!  सगळ्यांच्या आयुष्यातली सुट्टी संपून गेली. अगदी कोणाला अलग किंवा विलग केलं तरी त्यांना सुट्टी उपभोगण्याचा विचार सुद्धा येत नसेल.  सुट्ट्या संपल्या सगळ्यांच्या.  


    पण एक मिनिट..... कोरोनाच्या आधी कुठे सुट्ट्यांची मजा घ्यायचो आपण ? 


    या प्रश्नावर उहापोह करण्यासाठी आपल्याला खूप पाठीमागे जावे लागेल. कुणी बरं  ही सुट्ट्यांची कल्पना निर्माण केली?  माझ्या मते अगदी पौराणिक काळात ज्यावेळी प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या अशी कालगणना होती,  त्यावेळी कदाचित महिन्यात एकच सुट्टी असावी.  कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ना,  की अमावास्येला काम करू नये!  दर महिन्यातून एकदा काम न केल्याने शरीराला आवश्यक विश्रांती मिळत असावी बहुधा. नंतर धकाधकीचे जीवन वाढले असावे. माणसाला महिन्यातून नव्हे तर सप्ताहातून एकदा कामाचा कंटाळा येऊ लागला असावा.आणि “न कर्त्याचा वार शनिवार” झाला असावा.


    हल्ली मात्र सुट्टीचे दोन दिवस असूनही बहुतेक लोकांना पुरे पडत नाहीत. कारण त्यांचा सुट्टीतला दिनक्रम सुद्धा वेळापत्रकाप्रमाणे आखला असतो. घरातील इतर कामे करा,  शॉपिंग करा,  हॉटेलमध्ये जावा , सिनेमा बघा..  बहुविध प्रकार असले तरी तोच-तो पणा येतो; आणि सुट्टीची मजा जाते. कोरोनाच्या काळात या सुट्टीच्या दिवशी करण्याच्या गोष्टी बंद झाल्या; आणि सुट्टीच्या दिवशीपण कंटाळा येऊ लागला. वर्क फ्रॉम होम करणारे सुट्टी दिवशी सुद्धा कंटाळा आला म्हणून काम करू लागले. कोरोनाने त्यांच्या सुट्ट्या काढून घेतल्या. या अतिकामाचा ताण सर्व ठिकाणी दिसू लागला. मग जाणवलं की किती सुट्ट्या घेतल्या तरी ये रे माझ्या मागल्या. मग लक्षात आलं की आपण मनाला सुट्टी द्यायचं विसरतोय.


    आज खरी गरज आहे ती विचारांच्या आणि मनाच्या विलगीकरणाची आणि अलगीकरणाची. लिहायला-वाचायला हे सोपं आहे ; पण करायचं कसं ? त्यासाठी पहिल्यांदा विलगीकरण आणि अलगीकरण म्हणजे काय, आणि त्यातील फरक समजून घेऊ. विलगीकरण म्हणजे क्वारंटाईन. विलग करायचं ते विचारांना. विचारांना ओळख देता आली पाहिजे. हा विचार चांगला आहे आणि हा वाईट आहे; किंवा या विषयाचा मला विचार करायचा आहे आणि याचा आता अजिबात नाही असे निष्कर्ष लावले की विचारांचे विलगीकरण सहज करता येईल.


    या प्रक्रियेत कायम बघायचं  की आत्ता करत असलेला विचार योग्य आहे का नाही?  आणि नसला तर त्याला विलगीकरणाचा शिक्का मारून ठेवायचा. येऊदेत  त्याला सारखं सारखं तुमच्या मनात. पण त्याच्यावरचा शिक्का तुम्हाला त्याच्या विलगीकरणाची आठवण करून देईल. या विलगीकरण प्रक्रियेची सवय झाली की चालू करायचं अलगीकरण.  


    सुट्टीच्या दिवशी कामाच्या विचारांवर विलगीकरणाचे शिक्के असले पाहिजेत. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी मनाचे कामाच्या विचारांपासून अलगीकरण होईल. सुट्टीनंतरच्या दिवशी त्याच कामाच्या विचारावरचे विलगीकरणाचे शिक्के पुसून इतर विचारांना विलगीकरणाचे शिक्के मारायचे. घरात असताना सुद्धा , “कामाच्या वेळचा मी” आणि “सूट्टीच्या वेळचा मी”  यामध्ये फरक पाहिजेच. विचारांच्या विलगीकरण आणि अलगीकरणाने हे साध्य करता येईल. 


    “विलगीकरणाचे शिक्के असलेले विचार मनात येऊ द्यायचे नाहीत”, हे तसं थोडं अवघड आहेच.पण  त्यासाठी आपल्या एका श्रद्धास्थानाची ( स्वतःवरील विश्वास हे सुध्दा श्रद्धास्थान असू शकते !)  प्रार्थना केली तरी चालेल.  


    हे एकदा जमू लागले बघा सुट्टीची मज्जा काही औरच असेल. नवीन छंद जोपासता येतील. भरपूर वाचन करता येईल.नवीन काही शिकता येईल, आणि कामातसुध्दा मज्जा येईल !

 



Comments

  1. “कामाच्या वेळचा मी” आणि “सूट्टीच्या वेळचा मी"....... ... हे अगदी विसरलोच होतो. अप्रतिम.
    - विवेक

    ReplyDelete

Post a Comment