“अरे, त्या मामांना जरा चांगलं बारीक पीठ करायला सांग”. प्रत्येक वेळी दळणाचा डबा घेऊन मी गिरणीत निघाल्यावर आईचं हे वाक्य ठरलेलंच असायचं. डबा नंबरात ठेवून मी अर्धा-एक तास गिरणीतील सोहळा बघत बसायचो.
गिरणीचा कर्णमधुर(?) आवाज, पट्ट्याचा एकसुरी नाद, डब्यातील धान्य गिरणीत ओतताना होणारा खु$$$$श्श्श्शश असा आवाज, पट्टीच्या तबलजीने तिहाईचा तुकडा घेऊन समेवर यावं; तसं गिरणवाल्याने हातातील पाना गिरणीच्या पोटावर वाजवून गिरणीला दिलेली सूचनेवजा आज्ञा,धान्य संपल्यावर गिरणीतून येणारा एक वेगळाच आवाज, हायवेवरून जोरात जाणारी गाडी रम्बलर्स वरून गेल्यावर होतो तसा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा शंकर सर्वांगाला भस्म फासून असतो, तसा सर्वांग पीठाने माखलेला गिरणीवाला. त्याची पीठ डब्यात किंवा पिशवीत ओतायची लकब, हे सगळं सगळं आवडायचं मला. जगाच्या पाठीवर कुठल्याही गिरणीत जा. हे असंच दिसेल.
हे गिरणीवाले नसते तर दर रविवारी जात्यावर तेजाब मधलं एक-दोन-तीन किंवा राम-लखन मधील ए-जी,ओ-जी (हीच ती आमच्या वेळेची दोन सुपर डुपर हिट गाणी) म्हणत पीठ काढत राहिलो असतो आपण. आशीर्वाद आटा वाले सुद्धा नव्हते तेव्हा. पण असो, आयुष्यातले कंटाळा न येता घालवलेले क्षण गिरणीसमोरचे आहेत अर्थात ते लहानपणीचे. हल्ली आवडीने जात नाही मी गिरणीत.
लहानपणी कोल्हापूरच्या गिरणीतले मामा आणि आता पुण्यातल्या गिरणीतले मामा यात फारसा फरक झालेला वाटत नाही मला. पण मला आवडत नाहीत ती “भैया, पीठ एकदम स्मूथ करो हां, पॉंड्स पावडर के माफीक” हे गिरणवाल्याला सांगणारी भूतं. चांगला आठ-दहा किलोचा डब्बा काखोटीला घेऊन आणि दुसरा दोन -चार किलोचा डबा डोक्यावर ठेवून कोणी येत नाही आता गिरणीत. प्रत्येकजण फार फार तर एक किंवा दोन किलो, आणि तेही छोट्याश्या पिशवीत. असो!
या पीठाचे पण नखरे खूप असतात बरं. रवा वेगळा, कणिकेसाठी वेगळं, बेसनासाठी थोडं भरड, भाजणीची पध्द्त वेगळी. दळण घेऊन घरी आल्यावर आई चिमटीत घेऊन बघायची थोडं. बरोबर असेल तर तिच्या डोळ्यात समाधान दिसायचं. पीठ बरोबर नसेल तर, “पुढच्यावेळी जरा बारीक काढायला सांग”, ही सूचना असायची. आजचं “सेटिंग” मामांना पुढच्यावेळी कसं बरं लक्षात असेल? हा प्रश्न मी खूप वेळा ओठातून पोटात गिळला आहे. तरीपण पुढच्या वेळी मामांना तो निरोप (माझ्या लक्षात असला तर) सांगायचो, आणि गिरणवाले मामा पण डोळे थोडे बारीक करून, जरा आठवल्यासारखं करून, उगाच स्क्रू जरा जास्त ठोकल्यासारखा करायचे, आणि म्हणायचे आता लिमयेबाईंना हवं तसं येईल पीठ.
प्रत्येक ग्राहकाला हवं तसं पीठ देण्यासाठी धान्य ओतल्यावर, धान्याचा मालक समोर असला तर पान्याची ठोकाठोकी करून करून, स्वतः तपासून बरोबर असल्याची खात्री करणारा तो गिरणीवाला. यात त्याच गिर्हाईकाला खूश करण्याच चातुर्य होतंच; व्यवसायात हे असलंच पाहिजे!
याहूनही म्हणजे कशावर काय टाकायचं नाही याची गणितं वेगळी होती. विषेशतः दिवाळीआधीची भाजणी वगैरे प्रकार असले तर “हा डबा याच्यावरच टाकायला सांग, तू समोर उभा राहा” अशा जास्तीच्या सूचना मिळायच्या. कुठला डबा कुठल्यावर टाकायला सांगितला आहे, हे जाईपर्यंत मी विसरलो असलो, तरी मामाना “तो डबा त्याच्यावर टाकायला सांगितला आहे” हे मी डब्यांकडे बोट न दाखवता सांगायचो आणि त्यांना ते बरोब्बर समजायचं!
आपल्या आयुष्यात पण असच असतं. आपलं शरीर म्हणजे जणू गिरण, आणि मन म्हणजे गिरणवाले मामा. आपण काय बोलतो, काय करतो , कसे वागतो हे जसं की आपल्या शरीररूपी गिरणीतून येणारे पीठ, आणि याचे नियमन करणारे मन म्हणजे गिरणवाला. त्याच्याच हातात असतं पीठ कसं आलं पाहिजे ते. आपल्या आजूबाजूचे सर्वजण म्हणजे आपले कस्टमर.
आपलं काम काय? ज्याला जे हवंय त्याला ते, आणि तसंच द्यायचं. कोणाला बारीक, कुणाला भरड. कोणी म्हटलं “याच्यावर हे टाकू नको” , तर नाही टाकायचं. अशानेच आपले कस्टमर्स खूष होतील.
करतो का आपण तसं? बाबांनी सांगितलं असतं, “पासबुक भरून आणलं पाहिजे”. आपण म्हणतो, “कशाला? मिस कॉल द्या आणि बॅलन्स बघा ना. ऍप वर पण सगळे ट्रँजॅक्शन दिसतात.” पण खरच आपण जर शांतपणे पासबुक भरून आणून दिलं, फक्त त्यांनी सांगितलंय म्हणून, तर किती खूष होतील ते. हे फक्त उदाहरणादाखल. मला तर असं वाटतं की दिवसातून दहावेळा तरी आपण आई, बाबा ,नवरा-बायको, मुलं ,मित्र , सहकारी यांना पाहिजे तसं वागत नसू.
ठरवून बघूया का काही दिवस गिरणीवाल्या मामा सारखं होऊन?

सुंदर लेख, वास्तववादी वर्णन
ReplyDeleteधन्यवाद सर !
Delete“तो डबा त्याच्यावर टाकायला सांगितला आहे” हे मी डब्यांकडे बोट न दाखवता सांगायचो
ReplyDelete:-D :-D
😁
Deleteसुंदर,एकदम परफ़ेक्ट,लहानपण आठवलं,लिमये बाईंच्या जागी सूर्यवंशी घातलं की माझा ब्लॉग 👌👌😜
ReplyDelete😁
Deleteछान आहे गिरणी आणी मनाचे नाते
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDelete