एक अवलिया


एक अवलिया 

खूप खूप वर्षांपूर्वीची घटना आहे.  मी बालवाडीत असेन. माझ्या आजोळी मिठबांवला कुठलातरी घरगुती कार्यक्रम होता. त्यावेळी अशा कार्यक्रमांच्या दिवशी संध्याकाळी भजन व नंतर गाण्यांचा कार्यक्रम ठरलेला असे. त्याप्रमाणे त्या दिवशीही गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला.आमच्या सग्या-सोयऱ्यांपैकीच गायक, पेटीवाले,  तबलासाथीला होते. गाणी म्हणजे अभंग, भजन, एखादं भावगीत किंवा नाट्यगीत. पोटातल्या कावळ्यांना लवकर झोपी घालून मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पेंगत होतो बहुतेक. माझ्या त्या वेळेच्या वयानुसार थोडासा कंटाळवाणाच वाटायला लागला होता मला तो कार्यक्रम. जवळपास सगळ्या हौशी मंडळींची गाणी म्हणून झाली होती.  तेवढ्यात कोणीतरी “तुम्ही पण एक गाणं म्हणा ना!”, अशी विनंती करून मागं खुर्चीत बसलेल्या एका वामनमूर्तीला पुढे आणलं आणि ‘काटा रुते कुणाला’  ही फर्माईश केली. हे गाणार म्हणून त्यांचे धाकटे बंधू पेटीवर बसले. त्या दिवशी ते गाणं असं कानातून मनात गेलं की अजूनही ‘काटा रुते कुणाला’ ऐकलं की तोच प्रसंग डोळ्यासमोर येतो. 

    हा गाणारा अवलिया पेशाने डॉक्टर. सुट्टीचा महिन्यात आजोळी सुट्टीवर असताना ताप वगैरे आल्यावर हे यायचे. ताप शंभरच्या पुढे असला तर आजीला पाणी उकळवत ठेवायला सांगायचे. ते पाणी इंजेक्शनच्या काचेच्या नळ्या निर्जंतुक करायला आहे हे ओळखून मी पातेल्यातल्या  पाण्यापेक्षा जास्त पाणी डोळ्यातून काढायचो.  त्यावेळी एक-दोनदा दंडात किंवा मांडीत खुपसून घेतलेले असल्याने त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजी होती. पण त्या दिवशी नाराजीची जागा आदराने घेतली होती. एखादी आवड निर्माण होण्यासाठी एक खास क्षण लागतो, आणि या अवलियाने त्या क्षणी मला संगीताची (आणि विशेषतः नाट्यसंगीताची) आवड लावली.       

    अख्ख्या मिठबाव पंचक्रोशीत  त्याकाळी मेडिसिन करून परत गावी येऊन सेवाधर्म बजावणारे ते कदाचित पहिलेच असावेत. अचूक निदान आणि त्यामुळे “हातगुणी” अशी पदवी मिळवलेला हा माणूस.  गावातल्या प्रत्येक घरातल्या एकाला तरी यमाच्या  रेड्यावरून उतरवून परत आणलेलं यांनी; अगदी माझ्या आजोबांना सुध्दा. यांना अवलिया म्हणायचं कारण म्हणजे एवढे प्रचंड विद्वान असून एखादी नवीन गोष्ट समोर आली की लहान मुलासारखी उत्सुकता दाखवून त्या विषयीची माहिती करून घ्यायचे. कुठला विषय  या माणसाला माहीत नाही किंवा आवडत नाही असं नाही.  अगदी प्राचीन वेदविद्या असो किंवा संगीत, कला, क्रीडा , विज्ञान कुठलंही क्षेत्र असो. मला आठवतंय की संगणक अभियंता झाल्यावर एक दिवस त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी संगणक शास्त्रातले इतके प्रश्न मला विचारले  की बस्स!  खरंच त्या प्रश्नांची सगळी उत्तरे देण्याइतपत अभ्यास केला असता तर आय आय टी मध्ये निवड झाली असती माझी.  प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात एक कुतूहल आणि जिज्ञासा होती.  मुळात संगीताचा पिंड त्यांच्या घरी. पायपेटी, हार्मोनियम, तबला सगळं हाताशी.  त्यांच्या लहानपणी कदाचित त्यांना संगीत क्षेत्रात काम करायचे असावे. बहुदा परिस्थितीने चटके दिल्यामुळे अर्थार्जनासाठी संगीताला त्यांनी “आवड” म्हणूनच स्थान दिलं असावं. मुलाला तबला आवडतो हे पाहून त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा देऊन तबला शिकण्यासाठी गुरुंकडे पाठवलं.  आता दोन्ही नातू,  एक पेटी मध्ये प्रवीण आणि दुसरा तर अष्टपैलू. पुतणी पण उत्कृष्ट गायिका.  या सगळ्यांचे जणू श्रद्धास्थानच हा अवलिया.  

    गप्पा मारणे हा यानंतरचा छंद. कितीतरी माणसं जोडली होती त्यांनी. आलेल्या पेशंटला तपासता-तपासता गप्पा चालू व्हायच्या. त्यांच्या आवडीच्या संगीत कला क्रीडा, शेती  असोत किंवा राजकारण , अर्थकारण.  यापैकी कुठल्याही विषयाचं मंथन चालू व्हायचं. गप्पा मारताना सारख्या टाळ्या मागण्याची सवय लागली होती हल्ली.  काही जण चेष्टा करायचे;  पण त्या गप्पांमध्ये सुद्धा स्पष्ट जाणवायचं अगदी पोटतिडकीने आणि पूर्ण झोकून देऊन असायचा  हा माणूस त्या गप्पाविश्वात.  माझी आजी असताना ती सकाळी दहा वाजता ब्लडप्रेशर चेक करायला यांच्याकडे जाते असं मामीला सांगून जायची. पुढं हे पण असायचं की, “वेळ झाला तर तू जेवून घे. डॉक्टरांच्या गप्पा चालू झाल्या कोणाशी तर तिथे जेवूनच येईन मी.”   त्यानी फक्त बीपी चेक केल्यावर आजीचं गरगरणं-थरमरणं  कमी होत असे. एवढी श्रद्धा आणि विश्वास डॉक्टरांवर. 

    आपल्याकडे एखादी “डॉक्टर प्लस इंजिनियर प्लस नट प्लस गायक प्लस तत्वज्ञ” अशी एखादी डिग्री असती तर या माणसाने गोल्डमेडल नक्की घेतलं असतं. माझी आई कॉलेजमध्ये असताना एक संगीत नाटक बसवलं होतं म्हणे , ‘संगीत मत्स्यगंधा’ बहुतेक. त्यांनीपण भूमिका केली होती, पराशर ऋषींची. त्यावेळी रेकॉर्डिंग असतं तर युट्युब वर नक्की मिलियन हिट्स मिळाल्या असत्या.  

    त्यांच्यातला इंजिनिअर तर काय कमालच. असंच लहानपणी एकदा त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी अंगणात M-50 पूर्ण खोलली होती. एका घमेल्यात लिटरभर  रॉकेल आणि त्यात सगळे पार्ट.  मी विचारलं, “काका,  हे सगळे परत तुम्ही जोडणार?”. ते हसुन म्हणाले होते “बघुया जमतंय का !  नाहीतर उद्याच्या गाडीने पोत्यात घालून देवगड !” त्याच दिवशी संध्याकाळी ती गाडी रस्त्यावर सुसाट फिरत होती. 

    वयाची साठी उलटून गेल्यावर तरी माणसाने शांत बसावं की नाही? पण अवलियांचं असंच असतं.  त्या वयात चीलेशन (chelation) शिकून लोकांना त्या पद्धतीने उपचार द्यायचे. त्या काळात त्यांच्या घरी गेलं की कोणीतरी नक्की टेबलावर आडवा असायचा, सलाईन लावून. मुंबई-कोल्हापूर पासून हे स्वतः ट्रीटमेंट द्यायला जायचे. त्यांचा अभ्यासच  असा की बरेचजण त्यांच्याकडूनच उपचार करून घेत. 

    असा हा अवलिया म्हणजे “डॉक्टर मधुसूदन परशुराम सोमण”.  परवाच अल्पशा आजाराचे  निमित्त होऊन ते स्वर्गवासी झाले 😞. वय जरी झालं असलं तरी त्यांचा काही महिन्यांपूर्वीचाच उत्साह पाहून ‘तरुणपणीच गेले’ असे म्हणावे लागेल.  त्यांचे धाकटे बंधू श्री. अरुण सोमण माझ्या मावशीचे यजमान.  पण त्या नात्यापेक्षा मला डॉक्टर त्यांच्या अवलियापणामुळेच जास्त जवळचे वाटतात. 

डॉक्टर, वरती तुम्हाला तुमचे आधीचे मित्र भेटले असतील. भरपूर गप्पा मारा.  इंद्राला ताकाची महती सांगून खिजवा, आणि तुमच्या विद्वत्तेचा एक तरी टक्का देवाला आम्हाला द्यायला सांगा ! 🙏 







🙏 🙏 भावपूर्ण श्रध्दांजली 🙏 🙏 

Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  2. Good blog Tejas. Just got that link on your whatsapp status. You wrote it precisely. I do not know the person. My condolences are with doctor's family. This is a good blog you have started.

    ReplyDelete
  3. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    ReplyDelete
  4. Thanks for this blog... Keep up the good work..

    ReplyDelete
  5. डॉक्टरांच्या बहश्रुत व्यक्तिमत्वाबद्दल ऐकून होतो पण कधि समक्ष भेट झाली नाही. त्यांच्या व्यक्तित्वाचं सहज दर्शन लेखात झालं!

    ReplyDelete

Post a Comment