धाडस


  
 धाडसी व्यक्तिमत्वं तर बरीच असतात. काही जण पुरात पोहण्याचं धाडस करतात, तर काही बंजी जम्पिंग वगैरे प्रकार करतात. काही जण ऑफिस मध्ये आधी पूर्वकल्पना न देता दांडी मारण्याचं धाडस करतात. धाडशी माणसांचे हे नमुने पाहता मी तसा शेळपटच आहे असं म्हटलं पाहिजे. पण तरीही मी स्वतःला सगळ्यात धाडशी समजतो. का म्हणून काय विचारताय ? सांगतो वाचा…   

    असेच सणासुदीचे दिवस आहेत असं समजा. शनिवार किंवा रविवारची वेळ आहे, आणि तुम्ही मस्त पैकी ताणून पडला असाल. अपेक्षा नसताना नाश्ता किंवा चहा हातात येईल. तुम्ही हल्ल्याच्या भीतीने ढाल सावरू लागाल, पण लाडीकपणे आवाज येईल, “आज वातावरण किती छान आहे ना?”. तुम्ही फक्त “हो” म्हणाल, आणि मग कानावर येईल “आपल्याला आज शॉपिंगला जायचं आहे, पटकन तयार हो”. आहे तुमच्यात दम नाही म्हणण्याचा?  पण मी ते करून दाखवलयं.  घरात सासवा-सुनांची भांडण न होता त्या जर एकत्र प्लॅन्स करू लागल्या तर तुमची वाटच लागलेली असते, पण त्या दुधारी तलवारींचे हल्ले पण मी लीलया परतवले आहेत. त्यांच्यासमोर, “मी आज येणार नाही, तुम्ही दोघी जाऊन या”  असे सांगण्याचे धाडस म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून, त्याच्यासमोर त्याला वाकुल्या दाखवून परत येण्यासारखं नाही का? आणि ते मी केलय, आता बोला!  

    याहूनही कहर म्हणजे हा एक प्रसंग! 

    आमच्या घरी सगळ्यांना ( म्हणजे त्या दोघींना)  एक टीपॉय हवा झाला होता.  त्याची खरी गरज काय हे मला तर कधीच कळलं नव्हतं.  अगदी हल्लीचंच बघा. गोष्टीतला टीपॉय आम्ही घरी आणला, पण त्याचा वापर आम्ही घरात टेबल टेनिस टेनिस खेळण्यासाठी करतो. किंवा पाय ठेवण्यासाठी असतो तो टी-पॉय. =असो !!  तर तो हवा होता. आणि तो सुद्धा नळस्टॉप जवळच्या एका फेमस फर्निचरच्या दुकानातूनच.  तिथे एकदा जाऊन आलो;  पण “तुमच्याकडे व्हरायटी नाही” हे त्या दुकानदाराला सांगून पाऊण तासांनी आम्ही बाहेर पडलो. ते सांगण्याचं धाडस तिचं होतं. माझं नव्हे. पण आज माझ्या धाडसाचा किस्सा सांगायचा आहे ना, मुद्दयावर येतो. 

    त्या प्रसिद्ध फर्निचरच्या दुकानाचं खूळ डोक्यातून निघून गेल्यावर तिला कुठून तरी साक्षात्कार झाला की एका सेंट्रल मॉल नावाच्या ठिकाणी अगदी तिला (कदाचित स्वप्नात दिसला असेल) हवा होता तस्सा म्हणजे अगदी तस्साच टीपॉय होता म्हणे. आता ही काय भानगड मला समजेना. मॉल मध्ये टीपॉय?  जाताना तिला हजार वेळा विचारलं की आणखीन काही घ्यायचे का तर सांग,  पैसे घेतो. पण उत्तर आलं, “नाही!  फक्त टीपॉय घ्यायचा , आणखीन काही बघणार सुद्धा नाही”.  असं वचन देऊन तिने मला मॉलमध्ये यायला लावलं.  

    दोघे तिथे गेलो आणि फर्निचर सेक्शन तिसऱ्या मजल्यावर आहे हे पाहून मी सरळसोट तिसऱ्या मजल्या कडे निघालो.  तो सीन तर असा होता की मी भरभर पुढे चालत होतो आणि माझ्या पाठीमागून ती आमच्या दोघातील अंतर वाढू नये म्हणून जणू काही पळतच माझ्या पाठीमागे येत होती. तळमजल्यावरून पहिला मजला, त्याच्यानंतर दुसरा मजला. वर जायचं म्हणजे त्या मॉलची अख्खी लांबी पायाखाली घालायची होती.  मॉलचं स्ट्रक्चर मुद्दामून असं केलेलं असतं की तुम्ही खूप फिरावं, म्हणजेच फिरता फिरता बघता आणि बघता बघता घेता. पण मी मात्र डोळ्याला झापड लावलेल्या घोड्यासारखा एका रेषेत इकडेतिकडे न बघता पुढे चाललो होतो. अहो दुकानातलं सामान सोडा, इकडेतिकडे सजून-धजून फिरणार्‍या त्या लोकांकडे सुद्धा मी बघितलं नाही. शप्पथ! 

    पहिला वरून दुसऱ्यावर, परत लांबी पालथी घालून दुसऱ्या वरून तिसऱ्यावर असं करत करत करत शेवटी एकदा त्या फर्निचर सेक्शनमध्ये बरोबर तिसऱ्या मिनिटाला मी पोचलो होतो. पोचता क्षणी तिथल्या एका पोराला विचारलं, “टीपॉय आहेत का तुमच्याकडे?”.   त्याने “दोनच टीपॉय आहेत”  असं सांगितलं आणि ते दाखवले. ते  बघून आम्हाला कळलं की हे ह्यातला कुठलाही आपण घेतला तर टीपॉयच्या बाजूलापण पाय ठेवायची जागा राहणार नाही खोलीत. एवढे प्रचंड होते ते. त्याला परत विचारलं, “आणखीन नाहीयेत ना? एवढेच आहेत ना?”.   तो हो म्हणाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला; आणि अबाउट टर्न घेऊन परत माझा तीन मिनिटाचा खालच्यापातळीचा प्रवास (डिसेन्ट) चालू झाला.  बरोबर साडे-सहा मिनिटात मी परत गाडीकडे होतो आणि माझ्या पाठीमागे ती पळत पळत येत होती. गाडी स्टार्ट केली, तिला बस म्हणलं, गाडी बाहेर काढली आणि म्हणालो “बघ मी सांगत होतो कि नाही?  मॉलमध्ये टीपॉय नसतो”. 


याला म्हणतात धाडस !!! 


टीप: 

१)  प्रत्येक लेख लिहिण्याची एक वेळ असते आणि हा लेख मी आत्ताच का लिहिला याचं कारण तर तुम्ही सूज्ञ लोक जाणताच

२) हा लेख आहे. सत्यप्रसंग जरी असला तरी माझं त्यावेळचं धाडस तसंच राहील याची खात्री नाही. त्यामुळे घरी आल्यावर उगाच हा विषय काढून मला अनावस्था प्रसंग आणू नका. चहा मिळणार नाही

३) या वर्षी तुम्ही मला जर हिच्याबरोबर शॉपिंग करताना शोधलात तर उगाच पुणेरीपणा करून तिथेच मला खिजवू नका

४) मी दर शनिवारी लिहितो हे लक्षात असू द्या. 

५) ४ नंबरची टीप ही २ आणि ३ नंबरशी संबंधित असेलच असं नाही. ती फक्त एक विनंती आहे ! 

Comments

  1. Replies
    1. अमोल, आज फक्त तुम्हीच नावासहीत कंमेंट केली, बाकीच्यांनी ते धाडस नाही दाखवलं. आज बऱ्याच जणांनी पर्सनल मेसेज करून आवडल्याचे सांगितलं 😀

      Delete
  2. तेजस
    तू वर दर्शविलेल्या चित्रापेक्षाही हे मोठं धाडस केलंस
    असे बऱ्याच वेळा तू करू शकलास कि मग तुझी धाडसी गृहस्थ म्हणून ओळख होईल !!

    ReplyDelete
    Replies
    1. आपण एकदा तू एकदा मी करू, माझं झालं एकदा 🤓

      Delete

Post a Comment