लग्न म्हणजे आनंदाचा विषय. अगदी लहानपणापासून लग्नात सहभागी होण्याची कारणं वेगवेगळी होती. काही काही लग्नात खूप गमती पण झाल्या, त्यातल एक मजेशीर लग्न
(या कथेतील फक्त एक प्रसंग खरा असून बाकी सर्व पूर्णपणे काल्पनिक. हे लग्न अंदाजे 33 वर्षांपुर्वी झाले होते. मिठबाव भागातील लोकांनां त्या प्रसंगावरून कदाचित कळेल कोणते लग्न ते 😁😁)
मामाचं लग्न
हा मामा माझा सख्खा मामा नव्हे, तर माझ्या मामाच्या दुकानात काम करणा-या गावातल्या माझ्या अनेक मामांपैकी एक....
तर या मामाचं लग्न झालं त्यावेळी मी पहिलीत असेन..मामाचा शांत, कुणाच्या अध्यात मध्यात नसलेला स्वभाव बघता हे लग्न प्रेमविवाह नसून पद्धतशीर ठरवलेलं असावं बहुतेक (बहुतेक लिहावंच लागेल, कारण प्रेम कोण करेल, कसं करेल सांगता येत नाही..अजागळ बावळट वाटणारे प्रेम यशस्वी करतात हे मी स्वानुभववारून सांगतो), असो...
होणारी मामी आमच्या मिठबावच्या पलीकडील मिठमुंबरी गावातली होती, दोन डोंगर सोडून पलीकडचं गाव. चढ उताराचा वळणावळणाचा रस्ता असल्याने गाडीने अर्ध्या तास लागायचा. त्यावेळी गावाकडच्या माणसांना लग्नाला नेण्या आणण्याची व्यवस्था लग्नाघरातल्या लोकांनी करायची पध्द्त होती, आणि लग्नाला अख्खी वाडी यायची..मामाने त्यासाठी एक लॉरीची सोय केली होती. गावतालाच एकाची चिरे वाहतुकीची ती लॉरी...चिर्यांनी लालभडक झालेली...
लॉरी बघून अण्णा चित्कारले "रे येड## (गावात हा परवलीचा शब्द), लॉरीक धून आणूक सांगला नायस काय रे? आता हय बसलंय टेकान तर माझे कुल्ले रंगतील नाय रे लालभडक? मेल्यानू लग्नाक बोलावतास का मयताक?"
गावरान भाषा हा एक मस्त नमुना असतो. शिव्या असतात, पण तेवढीच जास्त आत्मीयता असते, आणि म्हणींचा बेसुमार वापर...
ते ऐकून राधेकाकी अण्णाला म्हणाली, "आण्णानू, ते मरांदे (जाऊदेत), माका आधी चढवा बघू लारियेत. ह्या काय ता माका झेपूचा नाय. केवढी मेली उंच आसा ही लॉरी, आपली यष्टी सांगूक काय शिरा पडली होती याच्या बापाशीक ते त्या रामेश्वरकच म्हाइत." ...अण्णांनी राधक्काला दंडाला घरून वर खेचली...."ओय ओय ओय ओय, उपळून काढल्यान मेल्यानी खांद्यातून" असं म्हणत राधक्काने चंची सोडली. तिने लिमलेटची गोळी काढून तोंडात टाकलेली बघताच पोर सगळी तिच्यापासून चार हात लांब....नेहमी राधक्काने चंची उघडली की पोर कावळ्यासारखी येत, आज लांब गेलेली बघताच राधक्का चवताळली, "मी काय रांगोळी काढतलय नाय हय, लांब पळतास ते"....
मी वाडीत सगळ्यांचा लाडका, म्हणून माझी रवानगी लॉरीच्या वर एक हौदा असायचा त्यात झाली होती....थोडी भीती वाटत होती, पण आणि एका मामाने मला घट्ट पकडून ठेवले होते. (गावातले सगळे पोट्टे माझे मामाचं की)
सगळे लॉरीत बसले. लग्नवाला मामा आणि त्याच्या घरातले लॉरीतच पुढच्या बाजूला, आणि सगळं गाव मागे..लॉरी चालू झाली आणि वेशीवर नारळ देऊन पुढे आयतन च्या घाटीत लोरीने गचके मारायला चालू केलं...स्पेशल टाक रे संत्या ( मागून नाना ओरडले, जणू त्यांनीच संत्याला शिकवले असावे). संत्या जवळपास त्या अक्सीलरेटरवर उभाच होता...गचके खात खात, आणि आम्हाला देत देत एकदा लॉरीने चढ पूर्ण केला, आणि मग कानात वार गेलेल्या वासरासारखी लॉरी उतारावरून वळणे उधळत जायला लागली, मागचे लोक एकदा उजवीकडे , एकदा डावीकडे असे झुलू लागले.....मिठमुंबरीत लग्न होत म्हणून बरं, जर दोन गावं पुढे जायचं असतं तर काय खरं नव्हतं...आम्ही एकदाचे पोचलो....
तरण्याबांड पोरांनी लोरीतून खाली उड्या टाकल्या आणि मांडवाकडे पळाले. अण्णा ओरडले, "अरे, ####नू, तुमका काय कधी कोनी लाडू कशे असतंत ते दाखवल्यानी नाय काय रे, गेले आपले कावळे पिंडाकडे"...आपण कुठल्या कार्यक्रमाला आलोय, काय बोलतोय, काहीच थांग नव्हता....मी पण त्या कावळ्यातलाच की, लग्नात मिळणारे ते खडखडे (कडक बुंदी) लाडू म्हणजे माझा जीव की प्राण. आणि मुलाकडून आलो असल्याने मान होता...चांगले पाच लाडू घेतले, दोन चड्डीच्या डाव्या खिशात, दोन उजव्या आणि एक तोंडात.....लग्नाला आल्याचं पाव सार्थक झालं होतं, पाऊण अजून बाकी होतं...
थोड्या वेळात सोलकढी आली....आणि पाव सार्थक झालं.
पुढचा पाव पदरात पाडून घेण्यासाठी लग्न लागेपर्यंत वाट बघावी लागणार होती...मी पिंटूमामाला शोधू लागलो आणि तो एकदाचा लांब दिसला....जवळ जाऊन त्याला हाक मारली, एक नाही की दोन नाही....आणि जोरात हाक मारली, तर तो आपला एकटक कुठेतरी बघत होता...माझी उंची पुरत नव्हती तो नक्की काय बघतोय ते बघायला. तेवढ्यात मागून संजूमामा आला आणि म्हणाला, "तुला आणखी एक मामी आजच मिळणार बहुतेक...पिंट्या करवलीला टापतोय..."
आता हे टापतोय म्हणजे काय मला त्या वयात कळत नव्हतं, आणि मी त्या दिवशी रात्री पिंट्यामामा करवलीला कसा टापत होता ते घरी साभिनय करून दाखवलं. त्यानंतर चार दिवस मला पिंट्यामामाने सायकल दिली नाही...
एकदाचं त्या मामाचं लग्न लागलं, तदैव लग्नं चा घोष झाला आणि सगळे मामा लोक पळाले म्हणून मीही मांडवाबाहेर पळालो...गठ्ठे (फटाक्यांचे बॉम्ब) लावायला...लग्न लागलंय हे गावाला कळावं म्हणून ही पद्धधत... प्रमोदमामाने नवीन शक्कल लढवली, गठ्ठ्यांची माळ करायची.. चांगले दहा बारा गठ्ठे एकत्र बांधले त्याने आणि दिले शिलगवून.. या गठ्ठा प्रकारची मला त्यावेळी थोडी भीती वाटायची. एकाचा आवाज आला तरी काळीज आतल्याआत हलायचं...दहा एकदम म्हटल्यावरच मी घाबरलो होतो, आणि ते शिलगावायच्या आधी लांब पळालो होतो...धडम धोम करून एक आवाज आला, आणि दोन तीन पेटंते गठ्ठे हवेत उसळले, आणि पलीकडच्या गवताच्या गंजीवर जाऊन फुटले....गंजीने पेट घेतला......जास्त मोठी नव्हती गंजी म्हणून बरं....सगळ्यांनी पटकन पाणी आणून आग विझवली....हा फटाके फोडण्याचा पाव पदरात पाडला आणि राहिलेल्या पावाच्या चिंतेत परत मांडवात आलो....
पंगत बसतच होती...राधक्काकडे वशिला लावून मी आधीच माझं पान धरायला सांगिलत होतं...जेवणाचा मेनू म्हणजे मसाले भात आणि जिलेबी ...बाकी काही नाही, खा की खा.....पैजा लावून जिलेबी खायचे लोक (आणि संध्याकाळी यायचे दुकानांत चूर्ण मागायला) ...त्या जिलबीत माझा राहिलेला पाव होता...मनसोक्त जिलब्या खाल्ल्या, हात धुतले आणि पैजेच्या पंगतीत गेलो...
पंगतीच्या एका बाजूला पैजा लावून जिलब्या खाणाऱ्यांची पाने असत...त्यांची नांदी म्हणजे वाढपी एका पानात दहा दहा जिलेब्या सारून जात.....यात कोण ढेपाळला तर त्याला अश्या शिव्या बसतं की त्याने त्यापेक्षा गाढवावरची धिंड बरी म्हणावे.....या खाली झाल्या की पाच पाच चा संच असे.....मग चालू होई खरी मजा.....आपल्याला जाणार नाहीयेत हे माहीत असताना शेजारचा रिचवतोय म्हणून वाढप्याला दोन जास्त घालायला सांगणारे महाभाग, त्यांच्या मठ्ट्यात पाणी घालण्याच्या सूचना (मठ्ठा जेवढा पातळ तेवढा त्यांना बरा असे).....शेवट दोघे तिघे उरायचे...
त्या मामाच्या लग्नात आमच्या गावातला गण्या आणि मुलीकडच्या गावातला एक कोणी असे दोघे उरले..."रे गण्या, ता बग ता या गावातलो अनि दोन मागता" अण्णांने म्हटल. गण्या लगेच जिलेबी तोंडात कोंबत "वावा वीव वेवुव वांव", तीन बोट दाखवत, म्हणजे "माका तीन देऊक सांग"...त्यावेळी डायबेटीस होत नव्हता बहुतेक....गण्या हरला त्या दिवशी आणि बिचारा "मोजल्यानी नाय बराबर, माका मोठयो जिल्ब्यो अन त्याका छोठ्यो वाढल्यानी" असं म्हणत पोटावर हात फिरवत बसला होता...
या लग्नात नवरा, नवरी, त्यांचा संसार , त्यांच्या भावना या सर्व माझ्यासाठी नगण्य असायचं ....हवं असायचं ते फिरणं, खडखडे लाडू, गठ्ठे आणि जिलब्या ......

ReplyDeleteछान👌👌
लवकरच मला कोकणी भाषा येणार असं वाटत👍
मस्त.. मज्जा आली.
ReplyDeleteMast sir
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे.प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. शिवाय मराठीतले काही आणि कोंकणी भाषेतले काही असे शब्द शिकायला मिळाले. भारी मज्जा.
ReplyDelete