अपघाती क्षेत्र



एकदा असंच कोकणातल्या एका रस्त्यावरून प्रवास करत असताना अपघाती क्षेत्र अशी पाटी दिसली. ती पाटी बघितल्यावर पटकन स्पीडोमीटर कडे लक्ष गेलं.  काटा साठ वर होता. ब्रेक दाबून स्पीड कमी केला. पाचशे मीटर हळू पुढे गेलो.  कुठेही वळण वगैरे  नव्हत.  रस्ता सुद्धा बर्‍यापैकी रुंद होता. धोकादायक असं काही नाही मग हे अपघाती क्षेत्र कसं असा विचार मनात आला.  कामाच्या गराड्यात ती घटना विसरून देखील गेलो. काही दिवसांपूर्वी परत एकदा त्याच रस्त्याने जाताना ती पाटी दिसली.  अगोदर पाहिलेली पाटी थोडीशी गंजलेली होती.  आज मात्र नवीन रंगवलेली. म्हणजे अजुनही अपघात होत होते तर.  परत तोच प्रश्न.  ही तर काही अपघाताची जागा वाटत नाही.  मग कसे काय होतात बर इथे अपघात? प्रश्न काही केल्या सुटत नव्हता.

माझ्या गावाकडचा एक मामा ST मध्ये कंडक्टर आहे.  त्याच्याबरोबर अशाच गप्पा मारत असताना त्याने त्याच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगितला. एकदा त्याची ड्युटी असलेली बस एका गावात बंद पडली होते. डेपोला फोन लावून मेकॅनिकला त्यांनी बोलावून घेतलं.  गाडी दुरुस्त होऊ करेपर्यंत खूप उशीर झाला. रात्री बारा-साडे बारा वाजून गेले होते. एकदाची गाडी चालू झाली आणि त्यांनी गाडी सुरू करून सर्व डेपोमध्ये येण्यासाठी निघाले.  थोड्या अंतरावर एका वडाच्या झाडाखाली एक बाईंनी गाडीला हात केला. आता ही बसची नियमित फेरी नव्हती , त्यामुळे ते प्रवासी घेतलेच पाहिजेत हे बंधन नव्हते. गाडीत ड्रायव्हर, मामा कंडक्टर आणि दोघे मेकॅनिक अशी चार पुरुष माणसं. रात्री साडेबारा ची वेळ आणि रस्त्यात ही बाई एकटी. ड्रायव्हरने मामाला विचारले, "काय करूया रे?" कारण हिला नाही गाडीत घेतलं तर  दुसरे कोण मागून येतील आणि काय होईल सांगता येत नव्हतं. माणसंच नव्हे तर जनावरांची पण भिती होती.  शेवटी त्या सर्वांनी त्या बाईला मदत करायचे ठरवले आणि गाडी थांबून तिला  कुठे जायचंय ते विचारलं.  तिने अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावाचं नाव सांगितलं. त्यांनी आणि थोडीशी विचारपूस केली की एवढ्या रात्री काय करत आहात? तेव्हा तिने तिची कर्मकहाणी सांगितली.

तिचा नवरा आज खुप दारु पिऊन घरी आला होता आणि दारूच्या नशेत त्याने तिला खूप मारले होते आणि तिला घराबाहेर काढले होते. इतकच नव्हे तर जोरात ओरडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, हे तिला अजिबात सहन झालं नाही. तिने ठरवलं की आत्ताच्या आत्ता तडक आपल्या माहेरी जायचं म्हणून तिने रस्ता धरला होता. तशी ती चालतच चालली होती पण मागून गाडी येते आहे हे पाहिल्यावर तिने हात दाखवला.

थोडे निरखून पाहिल्यावर तिच्या चेहर्‍यावर मारहाणीचे वळ दिसले आणि सगळ्यांना खात्री झाली की ही खरं बोलतीये.
मामाने तिला दिलासा देऊन सांगितले की ताई तू आम्हाला बहिणीसारखी आहेस. काही घाबरू नको. आम्ही चार पुरुष माणसं गाडीत असलो तरी आम्ही चांगली माणसं आहोत.  मी तुला खात्री देतो तुला काही होणार नाही आणि तुला सुखरूप घरापर्यंत पोहोचवू. असं म्हणून त्यांनी तिला गाडीमध्ये घेतलं. तिला आधार वाटावा म्हणून गाडीतील पाठीमागचे लाईट चालू ठेवले आणि मामा व ते इतर दोन मेकॅनिक हे पुढे ड्रायव्हर पाशी केबिनमध्ये जाऊन बसले,  जेणेकरून तिला अजिबात भीती वाटू नये.

अर्ध्या तासाने तिचे अपेक्षित गाव आलं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. मामा केबिनच दार उघडून  बाहेर आला आणि त्याचे डोळेच पांढरे झाले. गाडीत मागे कोणीही नव्हतं.  मामा लटलट कापायला लागला. डबल बेल अजून का  ऐकू येत नाही म्हणून ड्रायव्हरही मागे वळून बघू लागला. सगळ्यांची पाचावर धारण बसली.  ती बाई गाडीतून उतरून जाणं शक्य नव्हतं.  तिने चालत्या गाडीतून उडी मारली असावी म्हटलं तर दरवाजा आतून लॉक होता.   कुणाला काही कळलं नाही प्रत्येक जण थरथरत होता. देवाचं नाव घेत त्यांनी परत गाडी चालू केली आणि तडक डेपो गाठला.

ही गोष्ट ऐकून मी मामाला विचारलं, "कुठे घडलीय ही घटना?"  त्याने मला ज्या ठिकाणी बाई गाडीत चढली ते ठिकाण सांगितलं, आणि मी तीन ताड उडालो.  कारण ती जागा तीच होती जिथे मला ही अपघाताची पाटी दिसली होती. आता मला कधीच स्वस्थ बसवेना. त्या अपघात स्थळाची शहानिशा करायलाच हवी असा मनाशी चंग बांधला.

एका सुट्टीच्या दिवशी मुद्दाम त्या ठिकाणी गेलो. मामाच्या बोलण्यातून ती बाई कुठल्या गावातून आली होती हे समजलं होतं. त्यामुळे थोडासा आतल्या बाजूला जाऊन त्या गावी गेलो. मुळात विषय कसा सुरु करायचा, कोणाकडे करायचा काहीच कळत नव्हतं.  तेव्हा मनात एक कल्पना आली.  मी पारावरच्या आजोबांना दारूचा गुत्ता कुठे आहे ते विचारलं. माझ्याकडे किलकिल्या नजरेने पहात त्यांनी मला गुत्त्याचा पत्ता दिला. तडक तिथे गेलो आणि इकडे तिकडे बघून एका हवेत गेलेल्या माणसाला टिपलं.  त्याच्या समोर बसलो आणि त्याच्यासाठी एक बिर्याणी मागवली.  त्याला म्हणालो, "खा राजा खा, आज माझा वाढदिवस आहे. पाहिजे तेवढे खा. पाहिजे तेवढी पी". त्याला खिशात घालून प्रश्न चालू केले. "अरे काही महिन्यांपूर्वी एकाने दारूच्या नशेत एका बाईला रात्री मारून घराबाहेर काढली होती का?". हा प्रश्न ऐकताच त्याची प्यांट ओली झाली. आणि तो त त प प करायला लागला. आता याला काय झालं ते कळेना. तेवढ्यात गुत्त्याचा मालक आला, त्याने त्याच्या कानाखाली जाळ काढला, आणि म्हणाला "येड्या, बाहेर जाऊन मुतायचं की रे". तो मालकाला रडतच म्हणाला , "ह्यो रखमा बद्दल विचारत होता". ते ऐकून गुत्तेवाला जोरात हसू लागला, आणि म्हणाला "आणि तू फक्त मुतलास व्हय, नशीब चचला नाहीस इथं ऍटॅक येऊन". माझ्याकडे बघून म्हणाला, "जाऊद्याना साहेब, का बिचाऱ्याची खेचताय?". मला काहीच कळत नव्हतं.

मी मालकाला विचारलं, "ही रखमा कोण?". गुत्तेवाला सांगू लागला, "साहेब, साठ वर्ष झाली असतील बघा या गोष्टीला.  रखमाच्या नवऱ्यानं तिला नशेत मारली, घराबाहेर काढली आणि त्यानंतर तिला रस्त्यावर एका ट्रकवाल्याने पुढे सोडतो असं सांगून तिच्यावर बलात्कार केला, आणि तिला मारून रस्स्त्यावर फेकली, त्या वडाच्या झाडाखाली. त्यानंतर ती दिसते रात्री कुणाकुणाला. त्यांच्या गाडीत बसते. आणि कुणी जर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला तर त्याच्या गाडीला अपघात घडवते. कधी त्या वडाला धडकावेल, कधी एकदम ब्रेक लावून गाडी फिरवेल, काहीही करते, पण त्रास देणारा एकतर जखमांनी किंवा धक्क्याने मरतो. गेल्या साठ वर्षात महिन्याकाठी दोन-तीन जीव जातात, पण जे जातात ते आपल्या कर्माने. या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? सरकार पाट्या रंगवतं, अपघाती क्षेत्र म्हणून. तिच्यापरीने ती तांदळातले खडे काढतीये...".

त्या दिवसापासून अपघाती क्षेत्र अशी पाटी दिसली की मला रखमा आठवते. तिला एकच प्रार्थना आहे की माझ्या मामासारख्या सज्जन माणसांना गायब होऊन धक्के देऊ नको बाई🙏🙏

( पूर्णपणे काल्पनिक )


Comments

  1. काही गोष्टी वास्तव/तर्क या कसोट्यांवर आपण कल्पना विलास म्हणून सोडून देतो, पण सगळ्याच किं वदंती कल्पना विलास नसतात हे अनुभव घेतल्यावरच पटतं!

    ReplyDelete

Post a Comment