गोग्रास

आमच्याकडे एक पद्धत होती. घरी काही सणवार असेल, किंवा काही कार्य असेल तर आपण जेवण्याआधी नैवेद्य दाखवून गाईला थोडा घास भरवून यायचा, त्याला गोग्रास म्हणतात.

मी दुसरीत असेन. आम्ही नवीन भाड्याच्या घरी आलो होतो. त्या घरातली पहिलं काहीतरी कार्य होतं, आणि आईने मला एका केळ्याच्या पानावर भात, पोळी, तूप वगैरे वाढून गोग्रास ठेऊन यायला सांगितलं.

कोल्हापुरात बाबूजमाल परिसरात त्यावेळी गोग्रास ठेवून येणं मोठी गोष्ट नव्हती. गाई शोधायला लागत नसत. जवळच कपिलतीर्थ किंवा सरस्वती सिनेमगृहाजवळ असणाऱ्या भाजी मार्केट मुळे आमच्या भागात गाई सारख्या फिरत असत.

मी दाराबाहेर आलो आणि समोरच्या कोंडाळ्याजवळ रवंथ करताना मी बघितलं. इथल्या इथंच काम झालं म्हणून मी पटकन जवळ गेलो, केळीच पान खाली ठेवलं आणि त्याला तोंड लागणार इतक्यात माझं लक्ष पोटाकडे गेलं. तिथं आचळ नव्हती, तो बैल होता...

गोग्रास तर गाईला द्यायचा असतो. मग काय, उचललं की मी ते पान आणि परत घराकडे येऊ लागलो. हे नंदी महाशय माझ्या पाठीमागे पळत येऊ लागले...मी ते लपलप करणारं केळीचं पान घेवून पुढे आणि घंटा घुंगरू वाजवत नंदी महाराज मागे अशी शोभायात्रा अख्ख्या राजोपाध्ये बोळात चालली होती.....कसाबसा घरी आलो, दार लोटलं. बाहेरून नंदीमहाराजानी भ्या$$$ चालू केलं....

आई बाहेर आली. मी घरात, हातात पान, दार लावलेलं, आणि बाहेरून हंबरडा ऐकून ती म्हणाली, अरे वा..गोमाता आज दारात आली आहे. मी आईला अडवलं , सगळं सांगितलं तेव्हा आई जोरात हसायला लागली..तिने समजावून सांगितलं गोग्रास नुसत्या गो वंशातल्या कुणीही नव्हे तर कुत्रा मांजर कावळा कुणीही घेतला तरी चालेल. आणि असा कोणाच्या तोंडासमोरचा घास काढून घेऊ नये....

पण माझी ही फजिती मी एवढा घोडा झालो , नव्हे माझं शिंगरू आता घोडा होईल , तरीही आई सगळ्यांना सांगते....😊




Comments

Post a Comment