जन्मभूमी करवीरनगरीतून कबनूर ग्रामे श्वसूरगृही जाण्यासाठी अस्मादिकांनी स्वयंचलित चारचाकीतून स्वतः सारथ्य करीत, रवी माझ्या चंद्राच्या बरोबर ऊर्ध्व दिशेला आला असताना, रामराया जन्मला त्या टळटळीत दुपारच्या वेळी प्रयाण केले. हनुमंताच्या नावाची आमची ती चाळीस अश्वशक्तीची चारचाकी, वातानुकूलित नसल्याने, तिच्या चारही काचा आम्ही तिच्या चाकाच्या दिशेने सरकावल्या, आणि बाहेरून येणारे विविध गंध नाकात साठवीत वेग वाढवला.
चारचाकीची आसने चामड्याची होती. त्यावरील तागाचीआवरणे अर्धांगिनीने "किती मळली आहेत ही" म्हणत आजच धुण्यास काढली होती. दुर्दैवाने आम्ही त्या दिवशी नेमकी जाड गोणपाटासारख्या तुमानी ऐवजी साधी सुती विजार परिधान केली होती. त्यामुळे पार्श्वभागाला लागणारे चटके सोसत , एकदा वाम भाग वर तर एकदा दक्षिण भाग वर असे करीत , हलत डुलत आमची मजल-दरमजल चालली होती...
करवीर नगरीत सोळंकी उपनामाच्या सद्गृहस्थानी जागोजागी तृषाशांतीसाठी ठेले मांडले आहेत. आमच्या चिरंजीवांना एकदा तिथे नेले होते, त्या दिवसापासून ते "सोळंकी" अशी पाटी दिसली की भोकांड पसरतात. बरं एकही सोळंकी दुकानासमोरून न जाता कोल्हापुरात क्ष ठिकाणापासून य ठिकाणापर्यंत नेणे हे गुगळे मावशींना पण जमणार नाही. (google म्हणायच आहे, उगाच गैरसमज नको). त्यामुळे व्हायचं ते झालंच. दसरा चौकात चिरंजीवानी षड्ज लावला, आणि आम्ही आमचा पाय वेग-वर्धक पट्टीवरून काढून वेग-रोधक पट्टीवर दाबला.
चिरंजीवांसाठी दुग्धशर्करायुक्त घनगोल गट्टू , तीर्थरूपांचे नेहमीचे कर्बवायू युक्त लिंबू पाणी, आणि माझ्यासाठी जलजीरा असे आम्ही मागवले. एका घटकेत नव्वद रुपयांचा चुराडा करून आम्ही बाहेर पडलो, आणि प्रवास पुन्हा चालू केला...
शिरोली पुलावरून पुढे आल्यावर चिरंजीव परत किंचाळले, "बाबा, खेळणं". मी विसरलोच होतो. मेहुण्याच्या कन्येला खेळणं न घेता गेलो असतो, तर तिच्या एकुलत्या एक आत्येने माझ्याशी अबोला धरला असता. आधीच ताटाखालच्या मांजराप्रमाणे मी, त्यात यू यू किंवा हाड हाड बंद झालेलं परवडणार नव्हतं.
चिरंजीवांना कापूस भरलेले तीन फुटी अस्वलाच्या बालरूपातील खेळणे दिसले होते, आणि ते घेण्यासाठी अट्टहास होता. अश्या वेळी नकारघंटा वाजवून चालत नाही. रक्तवर्णी घ्यावं का पितवर्णी यांत मी व वडील यांची जुगलबंदी चालू असताना चिरंजीवांनी एक शुभ्र रंगाचं धूड कवटाळल होतं.
पुढचा रणसंग्राम दिसत होता. हे पांढऱ्या रंगाच घेतलं नसत तर पठ्ठ्याने माझे डोळे पांढरे होईपर्यंत गोंधळ घातला असता, आणि हे घेतलं असतं तर "किती वेळा सांगायच , मळखावू घ्यायचं म्हणून" हे शब्द तप्त तेलाप्रमाने कर्णरंध्रात जाणार होते. शेवटी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने पांढरं धूड गाडीत घेऊन आम्ही तिथून काळं केलं.
चोकाक गाव ओलांडून इचलकरंजी फाट्यावरून गाडी उजवीकडे वळवली, आणि ज्याची अपेक्षा होती तेच झालं. अख्या महाराष्ट्राला पालथी घालणारी आमची कोल्हापूर ते गोंदिया जाणारी महाराष्ट्र जलदगती नुकतीच रुकडी स्थानकावरून सुटत असल्याने रस्तावर वाहनविरोधक खांब आडवा केला गेला होता.
बऱ्याच वेळाने स्थानकासमोर असणारी ती अग्निरथ- आगम-निर्गम-सूचक-लोह-ताम्र-धातूपट्टीका नव्वद अंशातून एकशे पस्तीस अंशात झाली, आणि नावात जलदगती असलेल्या त्या अग्निरथाने ठssठाक-ठुठुssक करत अत्यंत कूर्मगतीने आमच्यासमोरुन संत्र्याच्या नगरीत जाण्यासाठी प्रयाण केले.
त्या अग्निरथाचा शेवटचा डबा दिसेनासा होईपर्यंत वाहनविरोधक खांब वर घ्यायचा नाही हे बहुधा त्याच्या संचालकाला सांगितले असावे. कारण अग्निरथ समोरून जात असतानाच त्याने आपल्या चंचीतून गोमातेचे चित्र असलेली एक खाकी पुडी काढून त्यातील चूर्ण डाव्या हाताच्या तळहातावर घेऊन , त्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने चुना लावून, तो मर्द चूर्णाचे मर्दन करीत होता. शेवटचा डबा दिसेनासा झाल्यावर त्याने हळूहळू एक चक्र फिरवायला चालू केलं, आणि तो वाहनविरोधक खांब वर जाऊ लागला.
आपण एक क्षण जरी उशीरा गेलो तर जणू आपली वाट न पाहता चचलेल्या आपल्या नातेवाईकाला अग्नी देणार असल्याप्रमाणे इतर वाहनचालक पुढे जाण्याची लगबग करत होते. आपण कर्णकर्कश्श भोंगे वाजवले की रस्ता आपोआप मोकळा होतो असा त्यांचा समज असावा.
समोर एक वाहतूक नियंत्रण शाखेतील शिपाई उभा होता. पण जणू आपण त्या गावचेच नाही या हिशेबाने तो आपल्या दुचाकीवर बसून भ्रमणध्वनीवर संभाषण करत होता.
इतर वेळी या प्रवासास जेवढा वेळ लागतो, त्याच्या दुप्पट वेळ आज ती तृषाशांती, खेळणं आणि अग्निरथ यामुळे लागला होता. त्यामुळे प्रयाणस्थळातून मातोश्री आणि आगमनाच्या प्रतिक्षेतील अर्धांगिनीच्या मातोश्री यांनी भ्रमणध्वनिवरील "कसे काय, बरे आहे ना" विचारणाऱ्या एका प्रणालीवर संदेशावर संदेश देण्याचा झपाटा लावला होता.
"अहो ते बारालाच निघाले आहेत",
"हो का, अजून पोचले बरं नाहीत",
"असेल कुणी भेटला मित्र, याच ना असच असतं.....".
गाडीच चाक वायूरहीत झालं असेल, तेल संपल असेल इथपासून सगळे विचार करून झाले असावेत त्यांचे. तीर्थरूप आणि चिरंजीव गाडीत मस्त झोपले होते, आणि मी सारथ्यचक्रावरून हात काढू शकत नव्हतो. थांबायचीही इच्छा नव्हती संदेश देण्यासाठी. श्वशूरगृही असलेली वांग्याची झणझणीत भाजी आणि भाकरी डोळ्यासमोर दिसत होती आणि मी गाडी पुढे दामटत होतो.
जवळपास दोनच्या सुमारास आम्ही कबनूर ग्रामी पोचलो. पाऊण पर्यंत आम्ही येऊ अश्या अंदाजाने करून ठेवलेली भाकरी आता गारढोण झाली होती. अर्ध्याच तासापूर्वी सांगलीहून हिचे मामासाहेब अचानक आले होते आणि त्यांनी वांग्याच्या भाजीच पातेलं चाटून फुसून साफ केलं होतं. सासूबाईं अन्नपूर्णा, त्यांनी पटकन दुधीभोपळा चिरून फोडणीला टाकला होता. मुळात बेचव अश्या त्या भाजीसोबत गार भाकरी दाताखाली तोडताना मी एक पण केला, परत बाराला निघायचं नाही...
तुझ नाव वांग्यावर नव्हे तर दुधीवर लिहीलेल होतं. जरी दहा वाजता निघाला असतास तरीही तुझ्या ताटात वांग पडल नसतं!
ReplyDeleteतात्पर्य- कितीही वाजता वाजता निघालास तरी नशिब बदलत नाही, दुधीऐवजी वांग मिळत नाही.