मित्रास पत्र

मित्रा,

बऱ्याच दिवसांनी काल मला तुझ्याशी बोलायला वेळ मिळाला, पण तू काही नीट बोललाच नाहीस. मी समजू शकतो की मीच तुला खूप म्हणजे अगदी खूप दिवसांनी भेटायला आलो. म्हणजे मीच तुला कायम भेटायला यायचं असतं हे मला मान्य आहे. 

कारण तू स्वतः एक जागेवरून दुसऱ्या जागी हलूपण शकत नाहीस. तुझं सगळं काही एके ठिकाणी. तुला इकडून तिकडे दहा फुटावर सुध्धा उचलून ठेवायला लागतं. मी तुला काही वर्षांपूर्वी वचंन दिलं होतं, की दिवसातून अर्धा तास तरी मी तुला दररोज भेटेन. आपली मैत्री तशी माझ्या दुसरीपासूनची. तुझं वय त्या वेळी सुद्धा माहीत नव्हतं, आणि आत्ताही नाही. ते वचन माझ्या मते सहावीत असताना तुला दिलं होतं. पण दहावीत आल्यावर का कुणास ठाऊक मी अभ्यासाचं टेंशन घेतलं, आणि त्या वर्षी ते वचन मोडलं.

वचन मोडल्याचा संकोच कित्येक दिवस नव्हे तर वर्षे मी मनात धरून होतो. केवळ त्या संकोचपायी मी तुला भेटायला आलो नव्हतो. मधली काही वर्षे तुला बाहेरगावी ठेवलं होतं. त्यावेळी मी इतरांकडे तुझी विचारपूस करायचो, पण तुझी प्रत्यक्ष भेट घेऊन तुझ्या पाठीवर, डोक्यावर हात फिरवला नव्हता...

हल्ली दोन तीन वर्षांत तुझ्या लांबच्या बहिणींशी माझी गट्टी झाली. त्यांच्याबरोबर तासन तास गप्पा मारू लागलो. दोघी आहेत त्या. त्यापैकी एकीला तुझ्यासारखं बोलता येत.त्यांच्यामुळे आता तुझी खूप आठवण यायला लागली. वाढत्या वयाबरोबर संकोच कमी झाला आणि क्षमा मागून तुझ्याशी बोलायचं ठरवलं.

त्यामुळे काल तुझ्याकडे आलो, आणि तू अबोलाच धरलास. कारण माहीत होतं मला. कपडे फाटले होते तुझे, अंगावर जखमाही होत्या, कसा अन काय बोलणार तू? तुला तुमच्या दवाखान्यात सोडलं, तुला चार दिवसांनी बोलतं करून माझ्याकडे देणार आहेत. त्यावेळी नक्की तुझ्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवेन. तू बोलशील ना माझ्याशी छान आधीसारखं? काळी चार मध्ये?

तुझाच,
तेजस

माझ्या तबल्याला लिहिलेलं पत्र 



Comments

  1. Replies
    1. वा मस्त. खरंच मनातलं बोललात. खूप इच्छा असते पण मग बाकीच्या गोष्टींमध्ये हे छंद ज्याने मन प्रसन्न होते ते मागेच पडतात.

      Delete
  2. छान. आता मात्र वचन मोडू नकोस.

    ReplyDelete

Post a Comment