आपल्या पणजी-खापर पणजीच्या काळात हम दो - हमारे दो वगैरे काही नव्हतं. मुलामुलींची लग्नही अगदी कोवळ्या वयात व्हायची. त्यामुळे मी अशी बरीच उदाहरणं पाहिली आहेत की आई आणि मुलगी, किंवा सासू आणि सून एकदम पोटूश्या अशायच्या. आता हसू येत, पण खरंच अस व्हायचं. मावशी आणि भाची एका पाळण्यात असे प्रकार व्हायचे...
काही वेळा पहिली बायको गेल्यानंतर तोपर्यंत झालेल्या पोरांना सांभाळायला म्हणून चाळिशीतला पुरुष विशीतल्या मुलीशी लग्न करायचा. त्या नवीन नवरीचा सावत्र मुलगा जेमतेम दोन तीन वर्षांनी लहान असेल तिच्यापेक्षा😢
शीर्षक मजेदार नात्याचं आहे, आणि मी काय लिहीत बसलोय ? 🤦
तर, अश्याच काही प्रसंगातून आणि पिढीतल्या अंतरातून माझी काही मजेशीर जपलेली नाती आहेत.
माझी नात्याने असलेली एक बहीण आज नव्वदीला आहे, तिची मुलगी साठीला, आणि मुलगा पंचावन्न वगैरे असेल.
रुढ अर्थाने असलेलं नातं आणि आमच्या वयातला फरक, यामुळे का कुणास ठाऊक पण मी त्या नव्वदीच्या माझ्या बहिणीला आत्या म्हणतो, साठीच्या तिच्या मुलीला (म्हणजे माझ्या भाचीला) ताई म्हणतो, आणि पंचावन्न वयाच्या माझ्या भाच्याला मी मामा म्हणतो...आणि हे इतकं सहज बोलतो आम्ही की आमच्या लक्षात येत नाही की इतरांचा किती गोंधळ उडत असेल. पुढे मज्जा म्हणजे हा माझा पंचावन्न वर्षाचा माझा भाचा , ज्याला मी मामा म्हणतो, तो माझ्या बाबांना मामा म्हणतो, आणि आईला मामी...
जेव्हा बायकोला पहिल्यांदा त्यांना भेटवायला घेऊन गेलो त्यावेळी विचार करा तिची बिचारीची काय अवस्था झाली असेल???☺️☺️
तसेच माझा आणखी एक मामा आहे. MD आयर्वेद झालेला. दोनेक वर्षापूर्वी त्याच्या दवाखान्याच्या उद्घाटन सोहळ्याला सहकुटुंब गेलो असता, माझ्या मुलाला नातं समजावलं आणि सांगितलं, "हे तुझे आजोबा". बिचारा माझा तिशीच्या आतला मामा, त्याच्या मित्रमैत्रिणी सगळ्या त्याला आजोबा म्हणून चिडवत होत्या, असो.
नात्यांना नाव काहीही द्या, त्यातला भाव कायम जपला पाहिजे 💐
वाह ! व्वा ! माझ्या भाचा नात्यांचा गंमतीशीर गुंता छान मांडलास , तुला यात अजून एक गंमत सांगतो ,तुझ्या आजीला मी मावशी म्हणायचो आणि तुझ्या बाबांना "मामा "
ReplyDeleteया मजेशीर नात्यांमूळे मला प्रपौत्र दर्शनाच भाग्य लाभलं!
ReplyDeleteमजेशीर आहे....
ReplyDelete