आजोळच्या ओव्या (मिठबाव)

निसर्गाच्या कुशीत
सागराच्या कवेत
डोंगराच्या छायेत
आजोळ माझे


आजीची माया
आजोबांचे प्रेम
मामा-मावशीचे लाड
माझ्या आजोळी

कौलारू घर
समोर अंगण
माडा पोफळीची शान
आजोळी माझ्या

आमराईची सावली
करवंदाची जाळी
वाघोबाची वस्ती
आजोळी माझ्या

आजोळचा लळा
खेचतो या बाळा
प्रीतीचा सोहळा
आजोळी माझ्या

मामी सुगरण
पोळी आणि पुरण
काकडीचे घावन
आजोळी मिळे

कुणकेश्वर उत्तरी
गजबाई टेकडीवरी
रामेश्वर कैवारी
आजोळचा माझा



आठवडी बाजार
बुधवार शनिवार
जीवाभावाचे मैतर
आजोळी माझ्या

फणसातला गर
कोकमाचे सार
माणसे चतुर
आजोळची माझ्या

जीवा जीव लावती
भातशेती पिकवती
कष्ट बहू जन करती
आजोळची माझ्या

झालो मोठा आता
तरी तिथे जाता
असतो बागडता
आजोळी माझ्या

पंचक्रोशीचे ठिकाण
स्वामी समर्थ पूजन
पालखीचे आमंत्रण
आजोळी माझ्या

रया आता बदलली
विकासाची हवा आली
तरीही आत्मीयता जपली
आजोळाने माझ्या

देवगड तालुक्यात
मिठबाव गावात
जादू असे निसर्गात
आजोळच्या माझ्या



Comments

Post a Comment