मराठीमध्ये किंवा त्याहूनही आधी संस्कृतपासून गाणी किंवा गेयता हा विषय अगदी पुरातन म्हणावा इतका जुना आहे. अगदी वेदातल्या ऋचा सुद्धा संथा घेऊन सुरात म्हटल्या जातात. याविषयी एक वेगळाच दीर्घ लेख लिहीन नंतर. मुद्दा असा आहे, की आपण आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत भावविभोर अश्या रचना ऐकत घडत असतो..
आपण आईच्या पोटात असताना तिच्या डोहाळेजेवणापासून आपण काही ना काही ऐकत असतो. त्या दिवशीच्या बागेतल्या किंवा सजवलेल्या झोपाळ्यावर आपली आई लाजून बसली आहे, आणि आपल्या आज्या, मावश्या, काकू सगळ्या "कुणीतरी येणार येणार ग" म्हणत आहेत, ते आपण समजत नसलं तरी आईच्या कानाने ऐकलेलं असतंच. हल्लीच्या काळात आपण गर्भात असताना आपल्याला गर्भसंस्कारच्या MP3 ऐकूनच झोप लागते. त्यावेळी आपल्या छोट्याश्या हृदयात कशी छान धडधड होते ते आठवतंय ना. "आल इज वेल" ऐकत ऐकत आपण नऊ महिने नऊ दिवस मोजत असतो.
नंतर आपला जन्म होतो, आणि अंगाई गीतांच्या रूपाने आपली आजी आणि आई आपल्यावर प्रेमभावनेचे संस्कार करतात. आईपण आलं की गळा आपोआप खुलतो आपल्या तान्ह्याला झोपवताना. क्वचित माझ्यासारखा एखादा बाप सुद्धा आपल्या गळ्याची नजाकत पोराला ऐकवत असतो..☺️
नंतर आपण थोडे मोठे होतो, आणि बडबडगीते ,बालगीते यातून मजा मस्तीचे भाव आपल्याला दिसू लागतात. "सांग सांग भोलानाथ" म्हणत आपण आपल्याला हवं ते व्हावं अशी गळ घालत असतो.
थोडे मोठे झाल्यावर शाळेत कविता ऐकतो. प्रार्थना आणि राष्ट्रगीत यातून भक्ती, देशप्रेम हे भाव आपल्यापर्यंत पोचतात...
पुढे आपल्याला "कळायला" लागतं, आणि भावगीत हा प्रकार आपल्या आयुष्यात येतो..."त्या तिथे पलीकडे", "तू तेव्हा तशी", "डोळे कशासाठी" वगैरे ऐकत, म्हणत आपण दिनक्रमण करतो. उत्कट असा प्रेमभाव आपल्या जीवनात येतो.
चुकून बाण नीट लागला नाही तर "भातुकलीच्या खेळामधली", "सांग कधी कळणार तुला" वगैरे विरहभाव निर्माण करणारी गाणी दिमतीला असतातच..
पुढे लग्न होताना, मुलगी असलो तर आपले बाबा "गंगा यमुना डोळ्यात" आणून आपली पाठवणी करतात. संसार चालू झाला की आधी काही दिवस "चंद्र आहे साक्षीला" म्हणत नव्याचे नऊ दिवस जातात.
नंतर "तरुण आहे रात्र अजुनी", किंवा "मल्मली तारुण्य" वगैरे गाणी आपल्याला दर्द दाखवून देतात. कालपरत्वे आपण "अरे संसार संसार", "एक धागा सुखाचा" किंवा "दैव किती अविचारी" म्हणू लागतो.
पुढे मुलंबाळं होतात, नोकरी धंद्यात थोडे स्थैर्य येते आणि "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश" म्हणत आपण थोडे भक्तिमार्गाला लागतो आणि शेवटी "आता विश्वात्मकें देवे", "देहाची तिजोरी" वगैरे अध्यात्मिक भावाची गाणी जवळ करतो , आणि शेवटी "आम्ही जातो आमुच्या गावा" म्हणत आपण मुक्तीमार्गाला लागतो.
अशी ही भावपूर्ण गाणी जणू आपल्या आयुष्याचा एक घटक बनून जातात. आपण मात्र कायम "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" म्हणत "जीवनगाणे, गातच रहावे"..
छान
ReplyDeleteमस्त सुंदर
ReplyDelete