दादला नको ग बाई



काल एकनाथ षष्ठी झाली. त्यानिमित्ताने संत एकनाथ महाराजांच्या या प्रसिद्ध भारुडाविषयी लिहीत आहे.

सर्वप्रथम भारुड म्हणजे काय त्याविषयी थोडेसे. अगदी वेदोत्तर काळात यज्ञ किंवा कुठलाही उत्सव असेल तर करमणुकीसाठी "जानपद" म्हणून प्रकार असायचा. करमणूक हा मूळ उद्देश असल्याने विनोदी रचना असायच्या. पुढे प्राकृत भाषेमध्ये त्या रचना देवस्तुती किंवा राजस्तुती करत तत्कालीन परिस्थितीवर विनोदी पण उद्बोधिक भाष्य अश्या स्वरूपात होत असाव्यात.

ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनीसुद्धा भारुडे लिहिली, पण संत एकनाथ महाराजांनी केवळ संख्येने जास्त नाही तर त्यातील वैविध्य, खोचकपणा आणि उद्बोधन या सर्वांचा खूप सुंदर ताळमेळ घातला. ही भारुडे एके जागी बसून म्हणायची नव्हेत , तर त्यात कायिक अभिनय, नर्तन आणि काही गद्य ओळी असा अंतर्भाव करून ती एक नाट्यछटा स्वरूपात सादर करायची असत. 

एकनाथ महाराजांची अनेक प्रसिद्ध भारुडे आहेत.
विंचू चावला, जाब चिठ्ठी, महालक्ष्मी दार उघड, सटवाई, शकुन, जोगवा अशी अनेक भारुडे लिहिली, त्यातील एक म्हणजे दादला

दादला नको ग बाई,
मला नवरा नको ग बाई !!!

वर पाहता एक युवती आपल्याला नवरा नको, हे तिने आतापर्यंत पाहिलेल्या काही घटनांवरून म्हणत आहे असे वाटते.

मोडकच घर, तुटकच छप्पर,
पण ऱ्हायला जागा न्हाई,

इथे थोडं अध्यात्म आणि बाकी समाजाला करमणूक आहे. आत्म्याला रहायला काय लागतं? तर ते शरीर म्हणजे घर.  आता हे शरीर जर मोडक असेल तर आत्मा खुश राहील का ? इथे महाराज फिटनेस मंत्रा देत असावेत. नीट खा, व्यायाम करा, तंदुरुस्त रहा...

छप्पर हे तुमची समाजात प्रतिष्ठा दाखवते. गरीबाच्या झोपडीला पत्रा किंवा मेणकापड असेल, तर श्रीमंताच्या घराला कौले, स्लॅब असेल. आजकाल फ्लॅट संस्कृती मध्ये पण ही आब दाखवण्यासाठी false ceailing करतात. 

 
आत्म्याला लागणार छप्पर ते ज्ञानाच. तुटके छप्पर म्हणजे अर्धवट ज्ञान. एकवेळ पूर्ण अज्ञान बरे, पण अर्धवट नको. असे जर असेल, तर आत्मा कसा बरं सुखी होईल, तो म्हणेलच ना मग, हा असा दादला नको ग बाई.

फाटकच लुगडं, तुटकीचं चोळी,
पण शिवायला दोरा नाही

लुगडं आणि चोळी हे फक्त स्त्रीची लाज राखत नाही, तर  प्रेसेंटबल पण ठेवतात. या भारुडातल फाटकं लुगडं म्हणजे अनिष्ट कर्मकांडाच्या प्रथा, चुकीच्या समजुती. एकनाथ पूजेला पाणी भरत असताना त्यांनी तहानलेल्या गाढवाला पाजलं, कारण त्यांचं लुगडं (धोतर म्हणा) फाटलं नव्हतं. काय योग्य, काय अयोग्य याची जाण होती. आणि ही तुटकी चोळी म्हणजे आपल्या इंद्रियांचा गेलेला ताबा. तो एकदा गेला की परत मिळवणं कर्मकठीण. आणि म्हणूनच शिवायला दोरा नाही. याचा अर्थ असा घ्यावा की इंद्रिये ताब्यातून जाण्याआधी त्यावर अंकुश ठेवावा. भौतिक सुखे मग ते जेवण असो किंवा इतर काही, गरजेपुरती उपभोगावीत, अतिरेक नको, नाहीतर अनावस्था प्रसंग !

कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी,
वर तेलाची धारच नाही

कळण म्हणजे नाचणी किंवा बाजरी वगैरेच कणीदार पीठ. अंबाड्याची भाजी माहीत आहेच, आंबट. कोरड्या भाकरीबरोबर अंबाड्याची भाजी खाल्ली की पित्त वाढू शकतं, म्हणून त्यावर तेलाची धार हवी, त्रास कमी करण्यासाठी...(तेलाची धार हा प्रकार आजकाल कमी झालाय. Oil नको रे जास्त, कोलेस्टेरॉल वाढेल अश्याने खाण्यातून तेल इतकं हद्दपार केलं लोकांनी की सकाळी पंधरा वीस मिनिट लागतात आणि कुंथल्याशिवाय होतं नाही.)

या रुपकातून एकनाथ महाराज सांगतात , आपली भाकरी, म्हणजे दैनंदिन व्यवहार करून आपण धनसंचय करतो. अंबाड्याची भाजी चवदार, म्हणजे मिळकत. पण त्याच्या हव्यासाने आपण इतकं मागे लागतो, की इतर गोष्टीना वेळच नसतो. काम काम काम, पैसा पैसा पैसा करत बसायचं, आणि घरातल्यांशी प्रेमाचे चार शब्द पण बोलायला वेळ नाही (तेलाची धार). म्हणून असला दादला नको ग बाई

एका जनार्दनीं समरस झाले
पण रस तो येथे नाही
आज मी जिवंत आहे म्हणजे माझा आत्मा आणि शरीर समरस झाले आहेत. ते नसते तर मी दिसलोच नसतो, तरीही हे शरीर व्याधीग्रस्त आहे, मनामध्ये अपूर्ण ज्ञान आहे, चित्त भौतिक सुखाच्या मागे आहे, आणि प्रपंचाच्या अनेक काळज्या आहेत. त्यामुळे एकनाथ महाराज जसे भक्तीमार्गात समरस झाले, तसे मला होता येत नाही. त्या मार्गाची गोडी (रस) इथे नाही..

अशी ही भारुडे, वरून वरून साधी सोपी विनोदी, पण आत खूप गहन अर्थ...

मोबाईलच भारुड वाचलं का? नाही अजून? इथेच आहे, शोधा म्हणजे सापडेल ☺️☺️

Comments

  1. एका जनार्दनीं समरस झाले
    पण रस तो येथे नाही
    मोबाईलचं भारुड?
    खुप छान विवेचन

    ReplyDelete

Post a Comment