लहानपणी आपण ससा कासवाची गोष्ट ऐकली आहेच. कासव न थांबता हळूहळू चालत रहाते आणि ससा मात्र मऊ लुसलुशीत गवत पाहून, त्याचा मोहात पडला, गवत खाल्लं आणि क्षणभर विसावा घ्यावा म्हणून पहुडला. क्षणभर कसला, अगदी एक प्रहरभर झोपला तो, आणि उठून पाहतो तो काय? हरला होता शर्यत...
त्या सशाच्या वंशामध्ये या गोष्टीमुळे खूप अस्वस्थता होती. पुढच्या पिढीने यावरून बोध घेतलाच होता. आणि आपल्या प्रजातीवरचा कलंक फुसून टाकण्यासाठी त्यातील एका सश्याने परत एक शर्यत आयोजित केली. शर्यतीचे अंतर न थांबता पळायचा चांगला सराव करून घेतला.
आधीच्या शर्यतीतल्या कासवाचे वंशज यावेळी भाग घेणार होते. या वेळच्या सश्याने ठरवले, अजिबात थांबायचं नाही. कासवाला पण कुणकुण लागली होती, की ससा आता अजिबात थांबणार नाही. त्याने एक नवीन अट घातली. शर्यतीचे अंतर दुप्पट केले. सश्याला मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता.
शर्यत चालू झाली, ससा न थांबता पळू लागला. आधीच्या शर्यतीइतके अंतर त्याने एका दमात पार केले. तसाच पुढे जाऊ लागला. कासव हळू हळू चालत राहिले होतेच. सश्याने सराव आधीच्या शर्यतीच्या अंतराचा केला होता, मात्र या वेळी अंतर दुप्पट होते. ससा दमला, त्याची छाती जोरात वर खाली होऊ लागली. श्वास पुरत नाहीये असं वाटायला लागलं, आणि क्षणभर विसावा घ्यायला हवा अस वाटायला लागलं. पण क्षणभर विसावा घेण्याच्या नादात परत झोप लागली तर आपले आणखी हसे होईल, या भितीने तो थांबला नाही, पळत राहिला. शेवटी जे व्हायचे तेच झाले. अतीश्रमाने धाप लागली, चक्कर आली आणि बेशुद्ध होऊन पडला. कासवाने हळू हळू चालत परत शर्यत पूर्ण केली.
गरज असताना देखील क्षणभर विसावा न घेतल्याने सशाच्या जीवावर बेतलं होतं.
आपल्या जीवनातही असंच असत. आपण काम, पैसे, नोकरी, व्यवसाय याच्या इतक्या पाठमागे लागतो की आपले छंद, कुटुंब, मित्र यांच्या संगतीत मिळणारा विसावा पण नाकारतो. फार उशीर होतो आपल्याला काय गमावलं ते कळायला. त्यामुळे वेळीच बोध घ्यावा....
ही नवीन कथा कशी वाटली, आणि नक्की काय बोध घेतला हे जरूर सांगा 🙏
एकदम मस्त!!!
ReplyDeleteअति हव्यास घातकच. आपली मर्यादा ओळखून त्यातच आनंदाने जीवन व्यतीत करणे हेच श्रेयस्कर आहे. हेच यशस्वी जीवनााचे गमक आहे.
ReplyDeleteमस्त !!!
ReplyDelete