कसा आलो? माहीत नाही
कुठे चाललो? माहीत नाही
काय घडले? कळलेच नाही
ठरवून काही केलेच नाही...
मुक्त मी, निर्बंध मी,
सुस्त मी, आश्वस्त मी,
तमा कशाची मला कशाला?
ठरवून काही केलेच नाही...
कोण कुणाचा, कधी कशाला
ध्यास कशाचा, अर्थ कशाला
प्रश्न मला तो पडलाच नाही
ठरवून काही केलेच नाही...
देतच गेलो, घेतही गेलो
नफा कुणाला,कोण बुडाले?
हिशेब कधी ठेवलाच नाही
ठरवून काही केलेच नाही...
फुले हुंगली, फळे चाखली
गीत गायलो, प्रीतही केली
पण रीत मला ती कळली नाही
ठरवून काही केलेच नाही...
दुःख पचवले, सुख भोगले
ठेच लागली, खेळ खेळले
हार जीत मी मानली नाही
ठरवून काही केलेच नाही...
वादळ आले, संकटे आली
जशी आली, तशी गेली
रात्र सरली, पहाट झाली
ठरवून काही केलेच नाही...
कठपुतळीचे जीणे आपुले
दोरी नाही आपुल्या हाती
नाटकातले एक पात्र मी
ठरवून काही केलेच नाही...
खूपच छान
ReplyDeleteKavi pan zhala
ReplyDelete