या दिवसात दुनियादारी शिकलो....त्या अनुभवांना चांगल्या वाईटाची फुटपट्टी नाही लावता येणार, पण आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शक असे अनुभव आहेत ते...
तसा मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीत आजोळी पडीक असायचो, पण त्याला घरापासून दूर नाही म्हणवत...आई-बाबांचं घर असलं तर आजोळच माझं "राज्य" किंवा "साम्राज्य" होतं... त्यामुळे कधी आईची आठवण आलीच तर गुपचूप बाथरूम मध्ये किंवा पांघरुणात जाऊन रडायचं.....
दुनियादारीची शिकवणी चालू झाली आठवीत असताना NCC कॅम्प मध्ये....खरचं नालायक कार्ट्यांचा कॅम्प म्हणावा अशी आमची गॅंग होती.... मी आणि माझा एक मित्र आठवीतला, बाकी सगळे नववीतले....काही काही गोष्टी नुकत्याच कळू लागलेल्या....☺️....
दहावीत NTS ला निवड झाली, आणि मुलाखतीची तयारी करण्यासाठी अस्मादिकांना पुण्यनगरीत महिनाभर ठेवलं गेलं. त्या महिनाभराच्या वास्तव्यात दुनियदारीचे अनेक अनुभव आले..जेवणासाठी खानावळ होती. तेथे आठवड्यातून चार वेळा "कलिंगड खाऊन राहिलेल्या सालीतल्या पांढऱ्या गराची भाजी" हा एक अत्यंत चवहीन पदार्थ खाऊन समोर असेल ते गपचूप गिळायची सवय लागली... याचा फायदा लग्नांनंतर हिने केलेले एक दोन पाककलेतले प्रयोग ज्यावेळी फसले, त्यावेळी तिचे मन न मोडता आहे ते सगळे फस्त करून तिला खुश करण्यासाठी झाला.
पुण्यनगरीत बर्म्युडा ट्रँगल भागातील एका मित्राने दुपारी जेवायला त्याच्या घरी बोलावले. दोन किलोमीटर चालत , त्याचे घर शोधत..(पुण्यात दुपारी 1 ते 2 या वेळेत या भागात घर शोधा म्हणजे कळेल), आम्ही कसेतरी त्याच्या घरी पोचलो...घंटा वाजवली...तो घरी नव्हता (नसायचाचं.), त्याच्या मातूश्रीनी "कोण कडमडलं" असं म्हटलेलं आम्ही ऐकलं, आणि दार उघडून त्या खेकसल्या "काही उदबत्ती वगैरे नक्को.."...आम्ही माऊलींना आमची ओळख करून दिली, आणि त्यांच्या सुपुत्राने आम्हास भोजनाचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले. त्या माऊलीने अत्यंत करुण भाव डोळ्यात आणले, आणि "तो आता घरात नाहीये, आल्यावर या" असे म्हणून धाडकन दार आमच्या तोंडावर लावून घेतले..... कोल्हापूरमध्ये राहिलेला मी...अनोळखी माणूस जरी दुपारी घरी आला तरी त्याला भिक्षालिंगामधील दत्तमहाराज समजून जेवू घालणारे गाव आमचे..आणि इथे जे अनुभवलं ते पाहून रक्त इतकं सळसळलं, की तो मित्र ज्यावेळी परत भेटला, त्यावेळी त्याला कोल्हापुरी भाषेतील "च्या" विभक्ती प्रत्ययाची चांगली ओळख करून दिली.....
असो,
आपले दिवस मागे गेले...एवढंच सांगेन की मुलांना योग्य वेळी घराबाहेर काही दिवस राहण्याची संधी द्या....अनुभव घेऊदेत जगाचा..... 💐
Short and sweet.
ReplyDeleteवाह फार छान लिहिलेस
ReplyDeleteखुप सुंदर मांडणी
ReplyDelete