आता गुलमोहर कसा बरं बोलेल? अहो, हा गुलमोहर म्हणजे आमचं "गुलमोहर हस्तलिखित मासिक". कोथरूडमधील वृंदावन हौसिंग सोसायटीमधील आदरणीय श्री. उपाध्ये गुरुजी यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादातून श्री. अरविंद लिमये काका, डॉ. अरुण जोशी, सौ. विजयाताई जोशी, सौ. शोभाताई पांडे, सौ. स्मिता लिमये आणि इतर सहकारी यांच्या अथक परिश्रमातुन या गुलमोहर हस्तलिखित मासिकाची सुरुवात झाली. वृंदावन वाचनालयानेही या उपक्रमाला पाठींबा व सहकार्य दिले. सुमारे पन्नासहून अधिक अंक हस्तलिखित स्वरूपात प्रकाशित झाले.
सर्वजण आपापले लिखाण श्री. लिमयेकाकांकडे आणून देत, व श्री. लिमयेकाका त्या लेखांना व्यवस्थित फाईलमध्ये लावून, झेरॉक्स काढून, बाइंडिंग करून अंक तयार करीत. हा अंक सहभागी सभासद मंडळी आळीपाळीने वाचून त्याचा आनंद घेत असत. जरी जेष्ठ नागरिकांनी केलेला उपक्रम असला तरी अगदी ९ वर्षाच्या मुलामुलींपासून ते ९० वर्षाच्या "तरुण तरुणींचे" लेख यात समाविष्ट केले जात. वयाचं बंधन या अंकाला कधीच नव्हतं. बंधन एकाच गोष्टीचं होतं कि अंकात राजकीय मतमतांतरे किंवा धार्मिकतेचे अवडंबर असलेले लेखन नको, बाकी सर्व काही चालेल.
आपल्या मित्रमंडळींनी स्वहस्ते लिहिलेले लेख आपण वाचतो त्यावेळी ही मित्र मंडळी अजून "लिहिती" आहेत याचाच जास्त आनंद त्या लेखांच्या साहित्यिक मूल्यापेक्षा मला मोठा वाटतो.
तर असा हा गुलमोहर बहरात असताना त्याला मराठी साहित्य परिषदेकडून सुद्धा मानपत्र मिळालं. सर्व काही आलबेल चालू असताना कोरोनारूपी संकट आलं, आणि हस्तलिखितांचं प्रकाशन थोडं थांबलं. हाती लिहिलेल्या लेखांचे कागद एकत्र करणे, ते हाताळणे, बाहेर जाऊन झेरॉक्स वगैरे काढणे आणि त्यापेक्षा तयार झालेला अंक सर्वांमध्ये आळीपाळीने वाचनासाठी देणे हे कोरोनाने थांबवलं. मुळात कार्यकारिणी समिती ही जेष्ठ नागरिकांची असल्याने या सर्व गोष्टींवर आपोआप मर्यादा आल्या होत्या.
पण इच्छा तेथे मार्ग याप्रमाणे गुलमोहराचे PDF स्वरूपात संकलन करून त्याचे इ-बुक तयार करता येईल व या डिजिटल स्वरूपात हा अंक प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाना इ-मेल किंवा व्हाट्सअप वर पाठवता येईल अशी कल्पना सुचली. मार्च, एप्रिल-मे जोडअंक, आणि काल प्रसिद्ध झालेला जून-जुलै जोडअंक याचे डिजिटल संकलन करून त्याची PDF तयार करून देण्याचे काम मला करता आले हे मी माझेच भाग्य समजतो.
यावेळच्या अंकात आम्ही काही लेख हे ऑडिओ / विडिओ स्वरूपात तू-नळी (you-tube) वर ठेवून त्यांचे दुवे (लिंक्स) आणि QR कोड (डिसले गुरुजींनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे) हे ईबुक मधील लेखात ठेवले आहेत. त्यामुळे ही PDF वाचताना दुव्यावरुन आपल्याला आपल्या मित्रांचे विडिओ सुद्धा पाहता आणि ऐकता येतात. यामुळे आम्ही म्हणतो की आता "गुलमोहर बोलू लागला"
या अंकाचे मागील तीन इ-बुक / PDF स्वरूपातील अंक या पोस्ट मध्ये ठेवत आहे. या लिंक वर क्लीक करून अंक जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
छान उपक्रम! स्तुत्य आणि अनुकरणीय!
ReplyDelete