सुवर्णवेधी भाला आणि मला दिसणारे भविष्य


खरंच, कालचा दिवस अगदी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला आहे नीरजने. त्याची सुवर्णपदकाचीच नाही, तर भारताच्या जवळपास सगळ्या म्याचेस यावेळी पाहिल्या. नीरजची स्पर्धा चालू होतानाच त्याच्या एकंदर देहबोलीतून आत्मविश्वास भरभरून दिसत होता. जावलीन (भाला) ची सेंटर ऑफ ग्राव्हिटी गेल्या काही वर्षांत बदलल्याने हल्ली 100 मी च्या पुढे भाला फेकणे जवळपास अशक्यच आहे. म्हणून आत्ता 98.48 चा WR आहे. पण त्याआधी 104.8 चा WR करणारे जर्मनीचे Uwe Hohn नीरजचे प्रशिक्षक होते. त्यांनी खूप दिवसांपूर्वी भाकीत केले होते या सुवर्णपदकाबद्दल, आणि नीरजने आपले अथक परिश्रम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आधीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धातल्या सुवर्णपदकाची हवा लागू न देता olympic मध्ये सुवर्ण आणि फक्त सुवर्णाच्या ध्यासाने भारून ही कामगिरी केली. त्याचे कौतुक करावे ठेवढे थोडेच. ऑलम्पिकच्या तयारीसाठी जवळपास पंचवीसहून जास्त स्पर्धांच्या भार सरकारने उचलला. सेनादलाच्या नोकरीने त्याला थोडेसे स्थैर्य मिळाले असेलच. लिहावे तेवढे थोडेच आहे नीरज बद्दल.

इतर पदके मिळवलेल्या मीराबाई चानू, रवी, सिंधू, लवलीन,बजरंग आणि पुरुष हॉकी संघ यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच.

पण, थोडक्यात पदक हुकलेल्या काही जणांचे मला इथे विशेष कौतुक करावेसे वाटते. त्यांना पदक मिळलेल्यांइतकी प्रसिद्धी मिळत नाही, आणि बक्षीसही. त्यात सर्वात वर मी महिला हॉकी संघाचे नाव घेईन. आपल्या संघाचा फिटनेस अत्युच्च दर्जाचा होता. खेळही सुंदर झाला. जिंकण्याची जिद्द होतीच. पुढच्या वेळी मिळवतीलही पदक. 

तसेच अदिती अशोक, गोल्फ. चार राऊंड मधील कुठलातरी एका होल मध्ये केवळ एक कमी शॉट मध्ये चेंडू गेला असता तर अदितीला पदक मिळाले असते.

टेटे मध्ये मनीका सुंदर खेळली. आपल्या प्रशिक्षकाला कोर्ट वर प्रवेश नसताना तिसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली तिने. 

भवानी देवी ने फेंसिंग मध्ये आपली कमाल दाखवली. 

मेरी कोम च्या बाउट बद्दल थोडा गदारोळ झाला, पण शेवटी हा खेळ आहे. 

प्रियांका गोस्वामी, जिचे नावही कमी लोकांना माहीत असेल. 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत तिने स्पर्धा पूर्ण केलीच, आणि फायनल मधील 58 मध्ये ती 17वी आली.

4*400 रिले मध्ये भारताच्या संघातील अमोज, नागनाथन, निर्मल आणि मोहम्मद अनास यांनी आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित केला. 

दीपिका, अतानु आणि आपल्या महाराष्ट्राचा प्रवीण जाधव यांनीही सुंदर खेळ केला. 

आणखी अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. हा भाग घेण्यासाठी पात्र होणे यातच त्यांना शाबासकी.

या वर्षीचा आपला चमू, त्यांची जिद्द आणि भाग घेतलेल्या खेळातील व्हरायटी पाहून मी पुढील ऑलम्पिक मध्ये यापेक्षा दुप्पट पदके मिळण्याबद्दल खूप आशावादी आहे..

जय हिंद 🙏

Comments

Post a Comment