भारुड म्हटल की आपल्याला एकनाथ महाराज प्रथम आठवतात. अगदी दिसेल त्या प्राणिमात्राचा किंवा पात्राचा दाखला घेत नाथमहाराजांनी विंचू, एडका, वटवाघूळ पासून ते भटीण, महारीण अशी अनेक भारुडे रचली..
पण समर्थ रामदासांचीही अनेक भारुडे आहेत. त्यापैकी हे एक म्हणजे उंदराचे भारुड..
देवा तुझी पागा थोर देते दगा ।
धान्ये वस्त्रे की गा नाशियेली ॥१॥
नाशियेली घरे पाडिली विवरे ।
घरांत उकीर ढीग केले ॥२॥
ढीग केले घरी रानी ते पर्वती ।
मोकाट हिंडती चहूंकडे ॥३॥
चहूंकडे तयां व्यर्थ बाळगिसी ।
तूंही लवंडसी क्षणक्षणा ॥४॥
क्षणक्षणा देवा रागाही येतोसी ।
दास म्हणे ऐसी नीति नव्हे ॥५॥
वरवर पाहता डोळ्यासमोर अन्न, धान्य, वस्त्रे यांची नासाडी करणारे उंदीर येतात. पण भारुड लिहिले असते ते एका वेगळ्या सखोल अर्थासाठी. हे केवळ पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला घेऊन रचायची म्हणून केलेली काव्यरचना नव्हे, तर यामागे त्यावेळची परिस्थिती विषद करून त्यावेळच्या झोपी गेलेल्या माणसाच्या मनात एक अंगार फुलवायचे काम या भारुडानी केले. नावात दास असला, आणि अकरा दासमारुती स्थापन केले असले तरी हरेक गावात आखाडे उभारले होते समर्थांनी. तसेच सांकेतिक भाषेत निरोप देवाण घेवाण करण्यासाठी गोसावी दल ही होते.
समर्थ, आणि त्यांच्या मंदिरातील, आखड्यातील त्यांचा गोसावी शिष्यसमुदाय हा अश्या समर्थरचीत भारूडामधून जनजागृती करीत असे.
त्यावेळी सगळीकडे फिरत असणारे उंदीर म्हणजे यवन सरदार.
देवाची पागा दगा देते म्हणजे त्यावेळचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचे मराठी सरदार हे मुघल किंवा शाहदरबारी चाकरी करण्यात धन्यता मानत...हाच तो पागेने दिलेला दगा असावा..यामुळे यवन सरदारांनी कधीही यावे, धान्यच नव्हे तर आयाबहिणींच्या अंगावरची वस्त्रे सुद्धा काढून न्यावीत , त्यांना नासावे अशी ती वेळ ..
कधीही कुणीही कसाही येऊन घर पोखरुन जातो, तोच हा यवनउंदीर..ही लुटलेले धन यवनांच्या डेऱ्यात ढीग रचून ओतून ठेवले असले तरी त्यातून एक सुई काढून नेण्याची हिम्मत कुणात नव्हती. काही मराठा सरदारांच्या मर्जीतही यवन सुभेदार, सैनिक असावेत, जे निर्भीडपणे मनमानी करत असावेत, म्हणून चहूकडे त्याना बाळगीशी, आणि तू व्यर्थ लवंडीशी...हे असे चालले असता त्या शिवजन्माआधीच्या राज्यकर्त्या शासकाना ही ती नीती नव्हे, सांगणारे समर्थच !
बरं, हे भारुड म्हणताना कुणी पकडले, तर सांगायचे "अहो उंदीर फार झालेत"...
अशी ही कायम काही छुपा गहन अर्थ असलेली भारुडे संतांनी लिहिली म्हणूनच महाराष्ट्र तरला .......
Mast Tejas..asech lihit raha..anek shubhechcha!
ReplyDeleteKhupach chhan Tejas
ReplyDelete