मैफिलीनंतरचे गाणे


खांसाहेबांची मैफल नुकतीच संपली होती. जवळपास चारेक तास त्यांनी शेकडो श्रोत्यांना आपल्या मधुर सुरांच्या वर्षावात न्हाऊ घातलं होतं. केदार राग निवडला होता त्यांनी. प्रभूपदास नमितदास या पुण्यप्रभाव नाटकातल्या नांदीने त्यांनी मैफल सुरू केली. नंतर एक बडा ख्याल, ठुमरी, टप्पा वगैरे प्रकारात केदार आळवून शेवटी "सत्यम शिवम सुंदरा" ने सांगताही झाली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. खांसाहेबांनी सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून अभिवादन केले. पण त्यांच्या मनात कुठेतरी एक अतृप्तता राहिली होती. संपूर्ण मैफलभर त्यांचे डोळे अश्या एका श्रोत्याचा शोध घेत होते जो आज त्यांना सापडलाच नव्हता. टाळ्या वाजवणारे भरपूर होते, बहोत खूब अनेक वेळा ऐकू आलं होतं, पण त्यांच स्वतःच मन काही तृप्त झालं नव्हतं. खरंतर त्यांच्या आवडीचा हा राग. कृष्णालाही हा राग अत्यंत प्रिय होता म्हणतात. गंभीर प्रवृत्तीचा हा राग कृष्ण आपल्या मुरलीवर राधेच्या आठवणीत वाजवत असे त्यावेळी त्या कृष्णाच्या मनाची अवस्था राधेच्या नसण्यामुळे जशी होत असेल, तशीच काहीशी अवस्था आज खांसाहेबांची त्या एका श्रोत्याच्या नसण्यामुळे झाली होती.

तो श्रोता म्हणजे कुणी एकच माणूस नव्हता, तर तो वेगवेगळ्या चेहऱ्याने त्यांना प्रत्येक महफिलीत भेटत असे. त्याची दादही दिखाव्याची नसे, तर त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरची ती समरसता पाहिली की खांसाहेब समाधानी होत असत.

असेच थोडेसे उदास होऊन ते घरी परत यायला निघाले. संयोजकांनी गाडीची व्यवस्था केली होती, पण ती नाकारून ते चालतच घरी जायला निघाले. वाटेतल्या एका कृष्णाच्या देवळाबाहेर त्यांना केदारचे सूर ऐकू आले. क्षणभर थबकले आणि इकडेतिकडे पाहता त्यांना समोरच्या वडाच्या पारावर एक अंध वयस्क भिकारी, दाढीमिश्यांचे जंजाळ झालेले, अंघोळ कित्येक दिवसात केली नसावी, असा तो जख्ख म्हातारा ते सूर आळवताना दिसला. त्याच्या नकळत हळूच ते त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले, आणि एक दोन मिनिटात तो गायचे थांबला. पुढची दोन तीन मिनिटं निशब्द शांततेत गेली. अचानक तो म्हातारा म्हणाला, "बेटा, तुम नही गाओगे?". खांसाहेब चपापले. आपण आलेलं त्यांना कळलंय तर, असं जाणून त्यांनी प्रथम त्या म्हाताऱ्याला नमस्कार केला, आणि त्याच्या समोर बसून ते गाऊ लागले. आपण इथे बसून का गातोय, कुणासाठी गातोय हे प्रश्नच त्यांना पडले नाहीत. पंधरा एक मिनिटं ते गात होते. रात्रीच्या त्या वेळी तो म्हातारा भिकारी आणि जवळपासची दोन चार भटकी कुत्री सोडून दुसरं कुणीही नव्हतं. त्या पंधरा मिनिटात खासाहेबांनी आपले डोळे एकदाही उघडले नव्हते त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला. म्हाताऱ्यानेही एका शब्दाचीही दाद दिली नव्हती. मात्र आपलं गायन संपल्यावर खांसाहेब उठले ते अत्यंत समाधानाने, आणि काहीही न बोलता ते उठून चालायला लागले त्या समाधानाच्या धुंदीत. पंधरावीस पावलं चालल्यावर ते थबकून थांबले. भानावर आले जणू. आपण त्या म्हातारबाला निघाल्याच सांगितलं नसलं तरी आपण उठल्याचं त्याला नक्की कळलं असणार, आपण आलेलो जस कळलं तसं. तरीही काहीही न बोलता कस जायचं? विचारपूस तरी केली पाहिजे. का यांना सरळ घरी घेऊन जाऊ, अश्या विचाराने ते मागे वळले. पाहतात तर काय? तिथे म्हातारा नव्हता, आणि त्याचा तिथे असण्याचीही काही निशाणी नव्हती. अचंबित होऊन खासाहेब घरी आले आणि त्या म्हाताऱ्याचा विचार करता करता कधी डोळा लागला ते समजलंच नाही. त्या रात्री त्यांच्या स्वप्नांत कृष्णाच्या बासरीचे स्वर आले. कृष्णाची आकृती धूसर होती, पण त्यांना जाणवलं की कृष्णाने डोळे मिटले होते, आणि त्या आकृतीलाही म्हाताऱ्यासारखीच पांढरी दाढी होती. खाडकन जागे होऊन खांसाहेबानी हात जोडले. त्यांच्या संगीतावरच्या निस्सीम भक्तीला आज कृष्णाने श्रोतेपणाचा आशीर्वाद दिला होता.

त्या दिवसापासून पुढे सगळ्या मैफिली खासाहेबांनी डोळे मिटुनच सादर केल्या, आपल्या मनातल्या कृष्णश्रोत्याला साक्षी मानून....त्यांच्या संगीतमय जीवनाच्या वटवृक्षाला नवी पालवीच फुटली होती जणू.


Comments

  1. कलावंत कलेशी तन्मय झाला की , ' तो ' ही कलास्वाद घेतो . तन्मयता ही भक्ती बनते .

    ReplyDelete

Post a Comment