आज संध्याकाळी एक सुंदर मैफल अनुभवली.
कल्याण थाटातील रागांचे विविध प्रकार असे स्वरूप होते.
माझ्याबरोबर ती मैफल ऐकायला एक अत्यंत जवळची व्यक्ती त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा असल्या मैफिलीला आली होती.
भेंडीबझार घराण्यातील पं. सुहासिनी कोरटकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली असे स्वरूप होते. गायिका म्हणून पं. सुहासिनी कोरटकर यांच्या शिष्या, पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्नुषा, आणि भेंडीबझार घराण्याचा वारसा चालवणे हे कर्तव्य असे म्हणणाऱ्या सौ. किशोरी जानोरीकर, आणि पुण्यातील ज्येष्ठ तबलावादक पं. विनायकजी पाठक यांच्या कन्या डॉ. रेवा नातू या दोघी होत्या. दस्तुरखुद्द पं. विनायक पाठक यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला. तसेच पं. सुहासिनी कोरटकर यांचे गुरुबंधू पं. शरद करमरकर हेही आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी पं. सुहासिनी कोरटकर यांच्याविषयी माहिती सांगितली. खुद्द अमान अली खांसाहेब, आणि नंतर जानोरीकर गुरुजींकडून तालीम घेतलेल्या पं. सुहासिनीताईनी ऑल इंडिया रेडिओ वर प्रोग्रॅम डिरेक्टर पदावर असताना त्यानी केलेले कार्य, नंतर केवळ घराण्याच्या समृद्धीसाठी केलेले अथक प्रयत्न. ही मैफल जिथे झाली, त्याच स्टेज वर त्या स्वतः एका मैफिलीत गात असताना प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मध्येच सोडावी लागलेली ती एक भूतकाळातली मैफल,नंतर दुर्धर आजारामुळे होणारा त्रास सहन करून शेवटच्या क्षणापर्यंत संगीतसाधनेत आणि मार्गदर्शनात झोकून दिलेलं ते व्यक्तिमत्व असे त्यांचे अनुभवकथन आम्हा श्रोत्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आणून गेलं.
मैफिलीत खेम कल्याण, धनकोनी ( ध नको नि घ्या, असे म्हणून ध वर्ज्य आणि नि घेऊन केलेला राग), शुद्ध कल्याण, श्याम कल्याण इत्यादी रागांची माहिती निवेदन स्वरूपात संवादिनीवादक श्री. लीलाधर चक्रदेव करून देत होते. तबल्यावर श्री. प्रणव गुरव यांनी तेवढ्याच ताकदीने साथ दिली. गाण्याला पूरक आणि साजेसं अस दोघांच वादन झालं. अनन्या जोगळेकर आणि मंजिरी पिंपळकर यांनी तानपुरा साथ केली. जवळपास पावणेदोन तास जणू अगदी एक दोन क्षणात संपल्यासारखे वाटले, इतकी मस्त मैफल रंगली होती. वेळेच्या बंधनामुळे शेवटी रागविस्ताराला थोडी मूडप घालून बंदिशी आणि पं. सुहासिनीताईंनी रचलेले तराणे सादर झाले.
अश्या या सुंदर मैफिलीची सांगता कल्याण-पंचकाच्या सुंदर आविष्काराने झाली. हमीर, गौडसारंग, कामोद,छायानट आणि केदार या पंचकातील तीनताल, आडाचौताल, एकताल अश्या वेगवेगळ्या तालातील या रचना ऐकून वातावरण आणि मन भरून गेलं.
आजचा रविवार आयुष्यातला एक सुंदर रविवार ठरला. माझ्याबरोबर नेलेल्या, पहिली मैफल ऐकणाऱ्या त्या श्रोत्याची दाद तर मला त्यापेक्षा मोठं समाधान देऊन गेली, एक नवीन कानसेन तयार करू घातल्याचं समाधान.
"बाबा, मला खूप आवडली मैफल. पुढची कधी आहे?".
बस, आणि काय पाहिजे आयुष्यात?
Comments
Post a Comment