"मला काही समजत नाही, हेच मला समजले",
आमच्या मिठबावच्या घरी बाळूआजोबांच्या झोपळ्यासमोरच्या लाकडी वाश्यावर कुणीतरी खडूने लिहिलेलं हे वाक्य. कुणी लिहिलं होतं माहीत नाही, पण अगदी लहानपणी वाचलेलं. खाली "सॉक्रेटिस" असं लिहिलेलं. सॉक्रेटिस कोण हे सुद्धा माहीत नव्हतं. पण ते वाक्य मनात कोरलं गेलं होतं, आणि अजूनही आहे.
या वाक्यावर बरच चिंतन केलं होतं त्या वयात. हा जो कोण सॉक्रेटिस असेल तो खरं बोलतोय की खोटं? या प्रश्नाने मी स्वतःला आणि इतरांनाही भंडावून सोडलं होतं.
नंतर आयुष्यात बरेच प्रसंग आले, घटना घडल्या, खूप निर्णय घ्यायला लागले. खूपदा काहीही निर्णय न घेणे हा ही एक निर्णय असतो, हे ही जाणवलं. आणि ज्या ज्या वेळी निर्णय घेता येत नसे त्यावेळी माझ्यातला मी बुद्धिवादी स्वतःवर चिडत असे. पण त्या वेळी एक दाढीवाला शुभ्र कपड्यातला म्हातारा आपल्या कानात हेच वाक्य परत सांगतोय, असा भास होत असे.
हल्लीच काही महिन्यांपूर्वी "आता नवीन काय बरं करायचं राहिलंय?" हा विचार करताना बकेट लिस्ट करायचा विचार आला. ती यादी तर मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी असेल असाही एक अंदाज आला. कोण कुठले आपण? आणि हे ही करायचंय, आणि ते ही करायचंय असंच म्हणत राहिलो तर काहीतरी राहणारच की. बरं, याचा अर्थ काहीच ठरवू नये असाही होतो का? कार्यालयात urgent important matrix, time management, goal setting वगैरे मॅनेजमेंट फंडे देणारा मी, आयुष्यातल्या गोल्स बद्दल इतका आळशी का? परत कानात आवाज घुमला, "तुला काही समजत नाहीये,हेच तुला समजलंय".
त्यावेळी मात्र रात्रीतून जागा झाल्यासारखं वाटलं. जणू एक नवीन पहाट उगवली होती, आणि काहीच न समजणाऱ्या मला काहीतरी उमजायला लागलं होतं. वर्तमानात जगायचं. काल झालं ते झालं, उद्या होईल ते होईल. आपण आजमध्ये जगायचं. लहानासारखं वागायचं तर कधी मोठ्यासारखं. आता या क्षणी जे करावं वाटतय ते करायचं. लिहावं वाटलं तर लिहायचं, नाही वाटलं तर नाही.
चला, आता झोपावंस वाटतय 😴
Comments
Post a Comment