पतंग



असच एक दिवस मुन्नाने मला विकत घेतल. लहान बाळांना कसं नाक कान टोचतात, त्याच प्रेमाने मला खालीवर टोचल एका काडीने, आणि त्यात दोरा ओवून, बरोबर माप काढून मला "सूत्रबद्ध" केलं. मला मध्येच वाकवून स्वतःच्या डोक्यावरून एक दोनदा घासल, आणि माझी एक बाजू बहुतेक त्याला थोडी हलकी वाटली, म्हणून त्याने त्या बाजूला एक कागद भिकबाळीसारखा लावला. सुंदर गुलाबी रंगाची वीत दोन वीत शेपूट लावली, आणि मला वावडी केलं.

शेजारी रिंगी अगदी लाजून माझ्याकडे बघत होती. तिच्यावरचा मांजा आणि माझं सूत्र यांची गाठ मारून त्याने आमचं लग्न लावून दिलं, आणि एका मित्राकडे मला देऊन लांब जायला सांगितलं.

रिंगी दुसऱ्याच्या हातात आली होती, आणि लाजेने चुर होऊन स्वतःभोवती गरगर फिरत होती. जणू तिचा पदर कुणी ओढत होत. मला पकडलेल्या पोराने स्वतःच्या खाली घसरलेल्या चड्डीची तमा न बाळगता मलाच घट्ट पकडून ठेवलं होतं. आणि मुन्नाच्या एका इशाऱ्यासरशी त्याने मला उंच उडवलं.

मुन्ना मांज्याला टिचक्या मारत होता, आणि गुदगुल्या मला होत होत्या. वाऱ्याने माझ्या अंगावर जोरात फुंकर मारली, आणि मी वर वर उडू लागलो. रिंगी अजून लाजलीच होती, गिरक्या घेत होती. तिच्या गिरक्या आणि लाजण, कानात भरलेलं वारं, आणि मुन्नाच्या टिचक्यांच्या गुदगुल्या यामुळे बेभान होऊन मी आणखी उंच उंच जाऊ लागलो. मुन्नाही आनंदाने मला डोलवत होता.

एवढ्यात एक माझ्यापेक्षा मोठा काळा पतंग माझ्याशी लगट करू लागला. मुन्नाने खूप प्रयत्न केला मला वाचवण्याचा, पण त्या काळ्याच्या काळरूपी विळख्यात मी पुरता अडकलो होतो. बारीक साखळीचा त्याचा मांजा माझ्या मांज्याला ओरबाडत होता, आणि अखेर जे व्हायचं तेच झालं. "ये काटाsssss", असा काळ्याच्या मालकाचा कल्ला कानी आला, आणि माझ्या रिंगीने गिरक्या घेणं थांबवलं. मी कापला गेलो होतो. अन त्याचवेळी वाराही उदास झाला.

त्यावेळी,

दिशाहीन वाऱ्याची सोबत मागू पाहतो,
अनोळखी वाटेवरून आता चालू पाहतो,
सोबतीस कुणीही नसे आता माझ्या,
माझेच सर्वस्व मी आता कुणाला देऊ पाहतो!

असे गुणगुणत माझे अध:पतन चालू झाले..😢


Comments