माझा लेखनप्रवास


तसा काही मी हातात लेखणी ( किंवा कीबोर्ड) वगैरे घेऊन जन्माला आलेलो नाहीये. तोंडात सोन्याचा चमचापण नव्हता. असं सांगतात कि माझ्या बारश्याच्या वेळी एका आत्याने माझ्यासमोर पेन, पैसे, रंगाचा ब्रश वगैरे वस्तू धरल्या होत्या, आणि मी जी वस्तू उचलेन त्या क्षेत्रात मी उन्नती करेन असा त्या बिचारीचा कयास होता. पण मी कुठलिही वस्तू न घेता एक मस्त आळोखा-पिळोखा दिला आणि तोंडाने नुसता ट्याSSहा असा कर्कश्श आवाज केला होता. “हे कार्ट निस्त बडबड करत राहणार असं दिसतंय” असं शेजारच्या आजीने हळू आवाजात तिच्या सुनेला सांगितलेलं मला त्यावेळी ऐकल्याचं अंधुकसं आठवतंय. 

हे पाळण्यात दाखवलेले गुणविशेष मी अगदी दीडेक वर्षांपर्यंत प्राणपणाने जपले होते. मात्र एक दिवस असा आला कि माझ्या या गुणांना बासनात बांधून मी लेखणी (कीबोर्ड) उचलला आणि माझा लेखनप्रवास चालू झाला. त्याचं असं झालं कि घरात काही पाहुणे आले होते, आणि मी माझी गुणसुमने उधळत बडबड बडबड करून त्यांचे मनोरंजन करत होतो. पाहुणे सासुरवाडीकडचे असावेत बहुतेक, त्यामुळे त्यांनाही “बस करा की आता” म्हणणं जाड जात असणार. ते बापुडे आपल्या पेंगुळलेल्या नजरेने जांभया थोपवीत माझे शब्दभांडार आपल्या कानावर झेलत होते. विषय थोडा विनोदी असावा. वाक्यागणिक अगतिकतेने का होईना ते सगळे हसत होते. काहींचे लक्ष बोलण्यात नव्हते. ते आपले समोर ठेवलेली बिस्किटे चहात बुडवून त्यांचा आस्वाद घेत होते, आणि मैफिलीत गवईबुवानी तान घेऊन झाल्यावर कसे त्यांचे तंबोऱ्यावरचे शिष्य सूर लावून धरतात, तसे ते इतरांच्या हसण्यात वाक्यावाक्याला आपले हसणे मिसळत होते. मी आता विषय बदलला होता, आणि नुकत्याच यमसदनी गेलेल्या एका नातेवाईकांची आठवण काढली होती. वातावरण थोडं गंभीर झालं होतं, आणि तेवढ्यात बिस्कीट संपवून एक काका “हा हा हा हा” असं जोरात हसले. विषय बदललेला त्यांना कळलाच नव्हता. बाकीचे सगळे एकदम त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून राहिले होते, आणि ही माझ्याकडे. 

पाहुणे गेल्यावर मुलुखमैदान तोफ कडाडायला लागली. “कसलं ते मेलं तुमचं बडबडणं. अहो तुमच्या त्या हाफिसात हाताखालच्या लोकांना पर्याय नसतो म्हणून ते तुमची मुक्ताफळे ऐकून टाळ्या देत असतात. पण तुम्हाला काही सोसच नाही. आलं कुणी की झाले चालू. परवा शेजारच्या घरी सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून घ्यायला गेलात आणि त्या यजमानांना सत्यनारायण कथेतल्या वाण्याची गोष्ट सांगून त्यांना तुमचा धंदा बुडाला तर आणखी एक पूजा नक्की घाला असं सांगितलंत. दुसरे दिवशी त्यांची बायको आली होती डोकेदुखीवर गोळी मागायला. मी काय म्हणते, कशाला ते बडबड करत राहायचं? जरा शांत राहून दाखवा कि आम्हाला. उपकार होतील” असं म्हणून तिने अगदी कोपरापासून हात जोडले. मला अगदी कसचंच झालं, आणि ठरवलं “आता बोलणे नाही!”

मौनव्रत धरलं मी अगदी. पण मौन म्हणजे फक्त न बोलणे नव्हे, तर विचारांचं पण मौन पाहिजे. ते कुठलं आलंय जमायला? विचारांची गर्दी इतकी होत होती डोक्यात, पण न बोलण्याचा अट्टहास होताच. त्याचा त्रास व्हायला लागला, आणि ठरवलं.. बस्स, आता या विचारांचा निचरा बोलून नाही, तर लिहून करायचा. या निर्णयाने माझा लेखनप्रवास चालू झाला. 

तयारी कशी साग्रसंगीत हवी. दुकानातून शंभर कागद आणले, एक फाउंटन पेन आणि शाईची बाटली आणली. त्यातले पंच्याण्णव कागद अजून शिल्लक आहेत, आणि शाईची बाटलीही. कारण लिहिणे कागदावर नाही तर स्क्रीनवर होऊ लागले. हा लेख सुद्धा आधी कागदावर लिहायचा म्हणून एक ताव काढला आहे शेजारी, तो बिचारा ताव तसाच कोरा पडून आहे. 

सुरुवातीला थोडे वैचारिक, सामाजिक असे लेख लिहिले. कवितेच्या वाटेलापण गेलो नव्हतो. मी लिहितोय हे कळल्यावर माझ्या एका लंगोटीमित्राने बजावले होते, “तेजा, कविता बिविता लिहिशील तर याद राख !”. आमच्याच मित्रांपैकी दुसरा एक कवीमित्र याला त्याची प्रत्येक कविता पहिल्यांदा वाचून दाखवतो. त्याला या शिक्षेत वाढ नको असावी, असो. त्यामुळे त्या मैत्रीखातर का होईना मी कवितांच्या वाटेला गेलो नव्हतो. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट करायची नाही म्हणजे नाही असं तुम्ही ठरवून बसलात तर ती गोष्ट देव मुद्दामून तुम्हाला करायला लावतो. पहिली कविता अशीच लिहिली गेली असावी. कुणाच्यातरी गझल वर छान टिपण्णी  केली, तर एक मेसेज आला. “तुम्हाला गझल कळते का?”... आता आली का पंचाईत? “नाही” हे उत्तर जरी खरं असलं तरी ते देण्याचं डेअरिंग झालं नाही. सरळ उत्तर न देता असं ठरवलं, आपण गजाली मारतोच, आता गझल करून पहावी. पहिली गझल लिहिली आणि परत एक प्रश्न आला “ही कुठल्या वृत्तात आहे?”.. झालं.. परत पंचाईत.. मला कुठे माहित होती वृत्त बित्तं काही. पण आपली टिमकी तर वाजवतच राहिली पाहिजे ना ( आत्त्ताही तेच करतोय ! ).  मग दररोज एका वृत्तात एक अश्या वीसभर गझल लिहिल्या. ज्या मला आवडल्या त्या फारश्या कुणाला आवडल्या नाहीत, आणि ज्या वाचून डिलीट कराव्या वाटल्या त्यावर खूप साऱ्या आवडी आल्या. 

हे गोष्ट एका प्रतिथयश लेखकाबरोबर बोलत असताना “तुम्हाला वाचकांची नाडी पकडता आली नसावी” हा सल्ला मिळाला. आता कुणाच्या नाड्या कश्या पकडायच्या, त्या कश्या ओढायच्या हे काही मला कुणी शिकवलं नव्हतं. या नाड्याबद्दल तिसऱ्या एकाशी बोलत असताना “अहो, हल्लीच्या वाचकांना नाड्या नसतात. इलॅस्टिक असते. ताणायचे आणि सोडायचे”.. हा सल्ला कदाचित दीर्घ कथामालिकाकारांचा होता. आता इलॅस्टिकचा मुद्दा घेऊन मी चौथ्याकडे गेलों नाही. न जाणो “हुक(ऑर क्रूक)” चा सल्ला मिळाला असता, आणि माझे अनेक बहुमूल्य क्षण मी हुक-वले असते. 

अश्या या वळणावळणाच्या घाटरस्त्यावरून माझा लेखनप्रवास चालू आहे. पण आता हळूहळू हे समजायला लागलंय 

लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे 
वाचणाऱ्याने वाचून वाचून, लिहिणाऱ्याला आशीर्वाद द्यावे

Comments

  1. खूपचं सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणे खुमासदार लेखन..!

    ReplyDelete

Post a Comment