सासुशी गट्टी : भाग २ : 4G सासु



काही वर्षांपूर्वीची एक घटना. एका ओळखीच्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष घडलेली.


आशय तोच ठेऊन, पात्र बदलून सांगतो.....


एक होती आजी
फोन तिचा 3जी
बघताना तू-नळी ( you tube)
येई वाटोळी वळी (buffering)..

आजीला  धरवेना धीर
स्पीडला होती अधीर
वेट करून करून तिचा
मेंदू झाला बधीर

एक आला कॉल
आजी माझ्याशी बोल
मी आहे फोनवाला
देतो 4जी तुला

आजी म्हणे, ए बाळा
4जी हा काय चाळा?
तो म्हणे आजीला
दसपट स्पीड देतो तुला

पाठवतो तुला एक मेसेज
कॉपी पेस्ट कर, आणि यावर भेज
हा नंबर कंपनीचा
धोका नाही कशाचा

पाठवशील जेव्हा याला
दोनच तास थांबायचं तुला
रेंज जाईल तुझी दोन घटका
मग स्पीड वापर टकाटका

हे आहे  फुकट तुला
पैसे नको मुळी मला
आला लांब मेसेज आजीला
तिने तो पुढे ढकलला

आजीची मग गेली रेंज
सगळे सिम झाले चेंज
चार तास निघून गेले
आजीला लँडलाईनवर फोन आले

काय तुला झाले बरे?
आहेस ना बरी म्हातारे?
सोडलं का हॉस्पिटल  मधून तुला?
मी आताच फंड ट्रान्सफर केला...

पलिकडून बोले तिचा पुतण्या
सांगे पैसे पाठवल्याच्या कहाण्या
आजीला काही उमगेना
पुतण्याचे बोलणे समजेना

पंधरा वीस जण फसले
आजीसाठी धावले
एकुण चाळीस हजाराचे
पैसे गमावून बसले


काय झालं इथे नक्की? 🤔🤔🤔

4G सिम वेगळं असतं हे त्या म्हातारीला माहीत नव्हतं, आणि याचा फायदा चोरांनी घेतला. त्यांनी त्यांचाकडे असलेल्या एका SIM चा नंबर (फोन नंबर नव्हे तर 20 आकडी SIM नंबर) आजीला sms केला, आणि तो टेलिफोन कंपनीला पाठवायला लावला.

टेलिफोन कंपनीला आजीच्या रजिस्टर्ड मोबाईल वरून आलेल्या सिम चेंज मेसेज मुळे तिचे स्वतःकडे असलेले SIM deactivate झाले, व चोराकडे असलेल्या सिम ला तिचा नंबर attach झाला. म्हणजे आता तो नंबर चोराचा झाला, आणि आजीचे कॉन्टॅक्टस पण त्याला मिळाले.

त्याने पटकन तिच्या कॉन्टॅक्टस ला मेस्सेज टाकला...

"नमस्कार, मी ....., हॉस्पिटल मधून बोलतोय.. आजी ऍडमिट आहेत, त्यांना चक्कर आली होती, आणि मार लागलाय...आता काही धोका नाही, पण मी माझ्या रिक्षातून त्यांना इथे सोडलंय...डिस्चार्ज घेऊन घरी सोडेन, पण आता माझ्याकडे पैसे माहीत, म्हणून या आजीच्या फोन वरून तिच्या कॉन्टॅक्ट मधील तुम्हाला मेसेज केला.. xxxxx या अकाऊंट ला 5 हजार ताबडतोब भरा..."

ज्यानी हा मेसेज वाचला त्यापैकी काहींनी अजिबात काही चौकशी न करता पैसे पाठवले......

हल्ली आधार कार्ड वगैरे सक्तीचे केले आहे त्यामुळे अश्या प्रकारांना थोडा आळा बसेल. पण आता 5G येईल. त्याच्या ऍक्टिवेशन साठी काही नवीन क्लुप्त्या येतील.फक्त एवढंच लक्षात ठेवा की फोन करून कोणी आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून त्याने दिलेला मेसेज कंपनीला पाठवायला सांगितला तर असे मेसेज स्वतःच्या मोबाईलवरून पाठवू नका.
५G हवं असेल तर घरबसल्या मिळत नाही. स्वतः मोबाईल कंपनीच्या दुकानात जाऊन घ्यावं लागत हे ध्यानात ठेवा.
या सिम चेंज अटॅक मुळे आपले कॉल, मेसेजेस, OTP दुसऱ्याकडे जातात. आपल्या बँक अकाउंट चा पासवर्ड किंवा कार्ड नंबरही त्यांच्याकडे असतातच ( कसे ते नंतर सांगेन), आणि या परिस्थितीत आपल्या अकाऊंट वरील पैसे गुल होऊ शकतात.....

घाबरू नका, सतर्क राहा....
काही शंका आल्यास झटकन react होऊ नका....


पुढील भागात एक वेगळा किस्सा घेऊन येईन....
प्रतिक्रिया जरूर कळवा.....
आणि हो, तुमच्या माहितीतल्या लोकांनाही हे शेअर करायला विसरू नका....(क्रमशः)

Comments

  1. खुप छान माहिती आहे तेजस...

    ReplyDelete

Post a Comment