सासुशी गट्टी : भाग ३ : सासुचा पासवर्ड

 


नमस्कार मंडळी,

याआधील भागात आपण फोन कंपनीतून बोलत आहे असे भासवून आपला फोन नंबर स्वतःकडील सिम ला कसा जोडून घेतात, आणि आपल्याला कसे फसवतात ते पाहिले...

आता आज एक अत्यंत कळीचा मुद्दा......पासवर्ड
------------------------------------------------

रमेशला इंटरनेट ब्राउजिंग खूप आवडत असे. इंटरनेटचा उत्तम वापर तो आपल्या अभ्यासासाठी आणि करमणुकीसाठी करत असे. ऑनलाइन गेमही खेळत असे तो, पण थोडाच वेळ. तसा तो खूप सेन्सिबल मुलगा होता. कशाचाही अतिरेक करत नसे.

एक दिवस एकदा त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि त्याने त्याला विचारले, "अश्या घाणेरड्या ई-मेल का करतोस रमेश तू?".

रमेशला काही कळेना, त्याने तर काहीच केले नव्हते. त्याच्या मित्राने त्याला "सेंट" मधील ई-मेल पाहण्यास सांगितले, आणि रमेशचे डोळेच पांढरे झाले..

त्याच्या सेंट आयटम मध्ये त्याच्या सगळ्या कॉन्टॅक्टस ना एक ई-मेल गेले होते, त्यात एका अश्लील वेबसाईटचे प्रमोशन केले होते,जणू रमेशच सर्वांना ही साईट बघण्यास  सांगत आहे. ती ई-मेल त्याचे मित्र, मैत्रेणी सर्वांना गेली होती.

त्याला कळलं काय झालं ते. झटकन त्याने पासवर्ड बदलला, सगळ्यांना परत ई-मेल करून परिस्थितीची कल्पना दिली, पण  त्याला आणि इतरांना झालेला मनस्ताप कुणीच भरून काढू शकल नाही..

कसं बरं झालं असं?

सरळ साध्या रमेशचा पासवर्ड सुद्धा सरळ साधा, Ramesh@0912.

एक कॅपिटल लेटर, एक स्पेशल कॅरॅक्टर आणि काही आकडे असल्याने त्यांच्या पासवर्डची strength त्याला खूप छान वाटत होती.

पण, नऊ डिसेंबर हा त्याचा वाढदिवस...फेसबुक वर त्याची जन्मतारीख जगजाहीर होती. असले पासवर्ड crack करायला हल्ली काही मिनिटे पुरेशी असतात.

पासवर्ड हे काळाप्रमाणे वीक होत जातात. आमच्या क्षेत्रात आम्ही असं म्हणतो की एक पासवर्ड जर 2000 साली crack करायचा असला , आणि त्यावेळी जर 3 वर्षे लागत असती, तर आज 2021 मध्ये तो काही मिनिटात crack होईल. संगणकाची क्षमता, कॉमन पासवर्ड DB किंवा patterns हे कित्येक पटीने वाढले असल्याने असे ब्रूट फोर्स, हॅश म्याच वगैरे पद्धतीने पासवर्ड हॅक करणे जलद होते..

मग आपण काय करावे?

अगदी सोप्या टिप्स सांगतो.

१) आपले ब्यांक / ई-मेल यासारख्या महत्वाच्या गोष्टीचे पासवर्ड आणि इतर साईट्सचे पासवर्ड हे वेगळे ठेवा. खरं तर प्रत्येक साईट चा पासवर्ड वेगळा असावा.

२) पासवर्ड मध्ये स्वतःचा वाढदिवस, गाडीचा नंबर, जन्मसाल , आपले नाव वगैरे ठेवू नये

३) पासवर्ड किमान तीन महिन्यातून एकदा बदलावाच

४) कठीण पासवर्ड ठेवायची युक्ती
(खाली जे मी सांगितले आहे ते आहे असं follow नका करू, ही एक कल्पना आहे, तुम्ही त्यात तुमच्या विचाराने बदल करा....मला विचारू नका, की *********** हा पासवर्ड कसा आहे ☺️, खाली उदाहरणादाखल पासवर्ड कसे तयार करावे हे सांगितले आहे. तेच पासवर्ड म्हणून वापरू नका)

कुठल्याही तीन सामान्यनामे निवडा , उदाहरणार्थ , गाव,फळ,रंग ....आता कुठलेही random गाव, फळ, रंग निवडा....उदा, ,sangli, lemon, green ...आता प्रत्येकाची पहिली तीन अक्षरे घ्या sanlemgre (आता हा डिक्सशनरी वर्ड नाही, guess करायला अवघड)...333 ऐवजी 243, 443 असे काहीही घेऊ शकता. आता स्पेशल chars .. a ला @, s ला $ , i ला ! वगैरे एक दोन अक्षरे रिप्लेस करा....म्हणजे s@nlemgre होईल....पुढे तुमच्या मूळ नावातील अक्षरांची बेरीज (sangli - 6, lemon - 5, green - 5 , म्हणजे 16) , म्हणजे पासवर्ड झाला s@nlemgre16

असा तयार केलेला पासवर्ड अवघड वाटतो, पण लक्षात ठेवायला सोपा. गाव,फळ, रंग एवढं लक्षात ठेवायचं...पुढच्या वेळी बदलताना नदी,नटी,नाते असे करून ganm@dunc17 असा होईल....

पासवर्ड अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याला लक्षात ठेवायला सोपे, पण आपली पर्सनल इन्फो नको, आणि इतरांना guess करायला अवघड असा ठेवा, एवढच ☺️☺️

(ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जागरूकता वाढवण्यासाठी जरुर शेअर करा....) 

(क्रमशः)


Comments

Post a Comment