सासुशी गट्टी : भाग ४ : सासुच्या परमिशन्स



नमस्कार मंडळी,

कालच्या भागात आपण पासवर्ड्स कसे ठेवावेत याविषयी थोडी जुजबी माहिती घेतली. आजच्या भागात आपण एका थोड्याश्या दुर्लक्षित विषयाकडे पाहणार आहोत, त्या म्हणजे आपल्या फोन वर वेगवेगळ्या ऍपना आपण दिलेल्या परमिशन्स...

आजचा हा भाग स्मार्ट फोन वापरणाऱ्यांसाठी लिहिला आहे. हे अँड्रॉइड आणि iOS दोघांनाही लागू होतं, पण काही उदाहरणे अँड्रॉइड स्पेसिफिक देईन. आयफोन वाल्याना काही शंका असल्यास पेड consult करेन ☺️...मज्जा करतोय, कधीही विचारा..इथे मात्र लेख सुटसुटीत ठेवण्यासाठी अँड्रॉइड.

तर मग करूया चालू?

सागर अमेरिकेत काही वर्षे नोकरी करून भारतात परतला. तिकडे त्याने बऱ्यापैकी डॉलरची बचत केली होती. ते त्याच्या अमेरिकेतल्या बँकांमध्ये होते. डॉलर आणि रुपयामधील दरात दररोज चढउतार होत असल्याने तो दररोज त्या दरांवर लक्ष ठेऊन असे. गूगल सर्च वर कायम तो USD to INR सर्च करीत असे. त्यामुळे त्याला करन्सी कनवर्टर ऍप च्या जाहिराती येत असतं. त्याने त्यातील एक ऍप google प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घेतले. इन्स्टॉल करताना त्या ऍप ने काही  परमिशन्स विचारल्या. नेहमीच्या सवयीने accept करून त्याने ते ऍप इन्स्टॉल करून घेतले. ऍप वापरून पाहिले. त्याला ते ऍप आवडले. एका वेळी ते वेगवेगळ्या देशातील करन्सी रेट दाखवत होते. तसेच तो त्यामध्ये एक ठरावीक सेटिंग करून रेट एका लिमिटच्या वर गेला की नोटिफिकेशन सेट करू शकत होता. त्याचे काम सोपे झाले..

असेच काही दिवस गेले आणि त्याला शंका यायला लागली की त्याचा डेटा पॅक लवकर संपू लागलाय. त्याने ऍप लिस्ट मध्ये पाहताच त्याला कळून चुकले की त्याच्या फोन वर malware इन्स्टॉल झाले आहे, आणि ते malware त्याच्या फोन वरची माहिती, त्याचे कॉन्टॅक्टस, मेसेजेस, फोटो कुठंतरी पाठवत आहे. वैयक्तिक माहिती चोरणारे malware ऍप इन्स्टॉल झाले होते त्याच्या फोन वर. ते त्याने स्वतः इन्स्टॉल केलेच नव्हते , मग असे कसे झाले असावे याचा तो विचार करू लागला...

काय बरं झालं असावं?

ज्यावेळी आपण कोणतेही ऍप playstore वरून इन्स्टॉल करून घेतो, त्यावेळी त्या ऍप ला आपल्या फोन वर चालण्यासाठी काही परमिशन्स द्याव्या लागतात..ऍप कोणत्या परमिशन्स घेणार आहे ते आपल्याला प्ले स्टोअर वर दिसते.

१) प्ले स्टोअर वर हवे ते ऍप शोधले की ते इन्स्टॉल करण्याआधी, त्या ऍपची माहीती "About this app" मध्ये जाऊन पहा.


२) "About this app" च्या खाली "Data Safely" section मध्ये जाऊन , "see details" भागामध्ये जावे





३) या उदाहरणात "No Data shared with Third Party" आणि "No Data Collected" असे दिसत आहे, म्हणजे हे ॲप तुमच्या फोन वरील पर्सनल डाटा वाचत नाहीये, व ते कुणाबरोबर शेअर करत नाहीये. उत्तम...



४) काही ॲप  कोणता तरी डाटा वाचून शेअर करत असतील, तर खाली दाखवल्याप्रमाणे दिसेल..




आता या अश्या जास्तीच्या परमिशन घेऊन समजा मी एक ऍप बनवले, मग ते गेम असेल वा आणि कोणतेही, तर नंतर त्या ऍप मधून मी डेटा वाचू शकेन,  बाहेर पाठवू शकेन. अश्या गोष्टीना आम्ही vulnerabilities म्हणतो, की ज्या आपली सायबर रिस्क वाढवतात..

म्हणून कुठलेही ऍप इन्स्टॉल करताना त्याच्या परमिशन नीट वाचा.

याआधी इन्स्टॉल केलेल्या ऍपच काय? असा प्रश्न येणे साहजिक आहे.

आपण setting - app management मध्ये जाऊन कुठली ऍप कुठली परमिशन्स वापरत आहेत ते पाहू शकतो, आणि काही sensitive किंवा नको वाटत असलेल्या परमिशन्स disable करू शकतो.

उदाहरणार्थ मी परमिशन मॅनेजर मधून प्रथम सर्व परमिशन ची सूची दाखवून त्यातील कॅमेरा परमिशन कोणते ॲप वापरत आहे ते दाखवले आहे. ही ॲप्स फोनचा कॅमेरा वापरू शकतात. 





काही "well known and legitimates" ॲप्स, जसे की अमेझॉन, gpay वगैरे QR code scan करण्यासाठी कॅमेरा वापरत असतील त्यांच्याविषयी चिंता नको. पण या लिस्ट मध्ये कुठलं अस ॲप आहे का की ज्याने कॅमेरा का वापरावा अशी शंका असल्यास ती परमिशन आपण काढून घेऊ शकतो..

तुम्हीही तुमच्या फोन वर उगाच नको त्या परमिशन्स नाहीत ना ते जरूर पहा...सतर्क रहा....

आपल्या कथेतील सागरच्या ऍपला "Allow install from unknown source" परमिशन होती. त्या ऍप ने काही दिवसानंतर आपलेआपण एक malware डाउनलोड केले. अश्या ऍप ना StrandHogg म्हटले जाते, जी वरवर निरुपद्रवी वाटतात , पण छुपेरुस्तम असतात..

टीप:

1) हा विषय थोडा अवघड वाटेल. आणि काही लोकांना भीतीही वाटेल. माझा उद्देश कुणाला घाबरवण्याचा नाही आहे. तुम्ही जी ऍप गेले कित्येक महिने वापरत आहात, त्यामुळे तुम्हाला काही त्रास नसेल, तर ती योग्य ऍप असतीलच..परंतु भविष्यात कुठलेही ऍप इन्स्टॉल करताना आता तुम्हाला काय आणि कुठे बघायचं हे कळलं तरी मी या लेखनाचे सार्थक झाल्याचे समजेन..

2) काही शंका असल्यास कंमेंट किंवा मेसेज करायलाहरकत नाही. मी माझ्या सवडीने का होईना पण प्रत्येकाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन..

पुढच्या भागात आणि एक उदाहरण घेऊन उद्या येईन..

(क्रमशः)


Comments

  1. खूप छान माहिती तेजस.

    ReplyDelete
  2. खूपच छान माहिती दिली, असा problem माझ्या PC बाबत आहे, काही वेळा अचानक net data संपतो, त्याला काही solution.....

    ReplyDelete
  3. उपयुक माहिती 🤘🤘

    ReplyDelete

Post a Comment