नमस्कार मंडळी,
केदारला नवीन मोबाईल्सच प्रचंड वेड होतं. बाजारात कुठला नवीन फोन आला की लागले महाराज त्याची डिटेल्स काढायला. त्यात मेमरी किती? प्रोसेसर कुठला? कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे? किंमत किती? सगळी माहिती काढायचा तो. मोबाईलचा जणू इनसायक्लोपेडिया होता तो. त्यामुळेच बऱ्याच मोबाईलविषयीच्या साईट्स ला त्याने subscribe केलं होतं.
एक दिवस त्याला एक कॉल आला. एक रेकॉर्डिंग वाजलं.
तुम्हाला आयफोन फक्त 1 रुपयामध्ये मिळण्याची संधी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तीन प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर फक्त 1 रुपयाचं ऑनलाइन पेमेंट करायचं, आणि आयफोन तुमचा..अधिक माहितीसाठी 1 दाबा
केदारने क्षणभर विचार केला की ही फसवणूक असू शकते. पण लगेच असाही विचार केला की जाऊन जाऊन 1 रुपया जाईल ना...बघुयात करून....
केदारने 1 दाबलं....
टेप चालू झाली ...
आजकाल ऑनलाइन फसवणूक खूप होते. कोणीही तुम्हाला फोन करतं, आणि तुम्हाला लुबाडतं. इथे कुठलाही माणूस तुमच्याशी बोलणार नाही. ही एक IVR (interactive voice response) सिस्टीम आहे. तुम्हाला एकामागून एक तीन प्रश्न ऐकवले जातील व त्यांचे ऑप्शन्स सांगितले जातील. तिन्ही उत्तरे बरोबर आली तर 1 रुपयाचे पेमेंट कसे करावे याची माहिती सांगितली जाईल, आणि ते झाल्यावर आयफोन तुमचा.....
आता हे ऐकल्यावर त्याच्या मनातली फसवणुकीची शंका दूर झाली.
टेप वाजतच होती...
आयफोन जिंकण्यापासून तुम्ही फक्त तीन प्रश्न दूर आहात. पहिला प्रश्न ऐकण्यासाठी 1 दाबा...
केदारने 1 दाबलं....
पहिला प्रश्न, भारताची राजधानी काय आहे? दिल्लीसाठी 1 , आणि मुंबईसाठी 2 दाबा
केदारने 1 दाबलं
अभिनंदन , दुसरा प्रश्न....आयफोन कुठल्या कंपनीने तयार केला? Apple साठी 1 दाबा, व्होडाफोन साठी 2 दाबा
केदारने 1 दाबलं
अभिनंदन, शेवटचा प्रश्न...आयफोन सुरक्षित आहे का? हो साठी 1 दाबा, नाही साठी 2 दाबा...
केदारला खरं उत्तर माहीत नव्हतं ,पण तो स्कॉलर होता...त्याने विचार केला, आयफोनच मार्केटिंग किंवा प्रमोशन असेल तर नाही का म्हणा? ..आपल्याला 1 रुपयात मिळतोय ना...
केदारने 1 दाबलं....
अभिनंदन, तुमची सगळी उत्तर बरोबर आहेत. 1 रुपयाचं पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड ने करणार असाल तर 1 दाबा, डेबिट कार्ड असेल तर 2 दाबा....
केदारने झटकन 1 दाबलं.... ( आतापर्यंत तो 1 च दाबत आला होता)
तुमचा 16 आकडी क्रेडिट कार्ड नंबर दाबा....
केदारने त्याचा क्रेडिट कार्ड नंबर टाईप केला.
धन्यवाद, तुमचा क्रेडिट कार्ड नंबर ************** हा आहे. बरोबर असल्यास 1 दाबा, पुन्हा क्रेडीट कार्ड नंबर टाईप करण्यास 2 दाबा
केदारने 1 दाबलं....
धन्यवाद, क्रेडिट कार्ड expiry च्या महिन्याचे दोन आकडे, आणि वर्षाचे दोन आकडे टाईप करा
केदारने ते चार आकडे दाबले
कार्डच्या पाठीमागील CVV नंबर दाबा...
केदारने तीन आकडी CVV नंबर दाबला...
पुढचे तीस सेकंद त्याला होल्ड tune ऐकू आली....
धन्यवाद, तुमचा आयफोन तुम्हाला सात दिवसात पोचेल.....
असे सांगून तो फोन कट झाला...
आणखी दोन दिवसांनी त्याला एक मेसेज आला,
तुमचा आयफोन परदेशातून पाठवला आहे. कस्टम duty चे चार्जेस 15725 रुपये सध्या तुमच्या अकाऊंट वरून कापले जातील. त्याचा तुम्हाला sms येईल. आमच्या भारतातील ऑफिस मध्ये फोन आला की तुम्हाला आम्ही फोन करून तुमच्या बँक चा IFSC आणि अकाउंट नंबर विचारून 15725 रीफन्ड करू....
काही मिनिटांनी केदारला क्रेडिट कार्ड वरून बरोबर 15725 रुपयाच transaction झाल्याचा मेसेज आला.
आणखी काही मिनिटांनी परत एक मेसेज आला...
धन्यवाद, कस्टम duty भरली गेली आहे. अंदाजे चार दिवसांनी आमच्या ऑफिस मध्ये आयफोन येईल. नंतर आम्ही तुम्हाला फोन करू...
या गोष्टीला आठवडा झाला तरी त्याला पुढचा काहीच मेसेज आला नाही. त्याने परत एकदा आधीच्या नंबर वर कॉल केला त्यावेळी त्याला ऐकायला मिळालं "हा नंबर अस्तित्वात नाही"....
आतापर्यंतचे भाग वाचून तुम्हाला नक्की काय झालं असेल याचा अंदाज आला असणारच...
यातून काय धडा घ्यायचा??
- १ रुपयात कधी आयफोन मिळत नाही. स्टीव्ह जॉब्स ने १ रुपयात कुणालाही देण्यासाठी तो तयारच केला नाहीये.
- आपला क्रेडिट कार्ड नंबर आणि असे डिटेल्स कधीही कुणाला असे द्यायचे नाहीत....
- जर फोन त्याच्या ऑफिस ऍड्रेस ला डिलिव्हर होणार असेल तर custom duty तुम्हाला कशी लागेल? ( त्या फुकटात काही मिळण्याच्या धुंदीत आपण हे विसरून जातो)
अरेच्चा, विशिंग म्हणजे नक्की काय ते सांगायच राहिलच की. अहो, विशिंग म्हणजे voice phishing...
यापूर्वीच्या phishing च्या भागात आपण ई-मेल पाठवून केले जाणारे फिशिंग बघितले. Fraudster ने ई-मेल पाठवले की ते कधी वाचले जाईल याची शाश्वती नसते. हल्ली बरेच ई-मेल सर्वर अश्या ई-मेल ना आपोआप स्पॅम फोल्डर मध्ये टाकतात. म्हणून हल्ली पटकन result मिळवण्यासाठी विशिंग करतात. आपल्याला एक फोन येतो, आपण तो उचलतो, आमिषाला किंवा कधीकधी भीतीला बळी पडतो ( हे कॉल कधी कधी income tax डिपार्टमेंट कडून आल्याचे सांगितले जाते आणि आपल्याला टॅक्स आकारणी संबंधी रकमेची भीती घालतात), आणि सरतेशेवटी आपली पर्सनल डिटेल्स (कार्ड नंबरची डिटेल्स, जन्मतारीख इत्यादी) माहीत करून घेतली जाते. एकदा ती डिटेल्स हाती आली, की त्यांचे फावते आणि आपण फसतो...
त्यामुळेच , सावध रहा....सतर्क रहा 💐
Comments
Post a Comment