नमस्कार मंडळी,
कालच्या भागात आपण voice phishing (vishing) ची तोंड ओळख करून घेतली. आज आपण एका नवीन प्रकारच्या हॅकची ओळख करून घेणार आहोत.
मनोहररावांना त्यांच्या मुलाने एक स्मार्टफोन भेट दिला. आतापर्यंत ते साधा फोन वापरत होते. (ज्याला फीचर फोन म्हणतात, किंवा हल्ली डब्बा / डबडा असही म्हटल जातं) . हिरवं बटन कॉल घ्यायला आणि लाल बंद करायला, एवढीच त्या फोन ची त्यांना माहिती होती, आणि तेवढीच त्यांची गरजही होती.
पण त्यांच्या कुटुंबाच्या "फॅमिली कट्टा" नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर "मनोहर आजोबा का नाहीत?", असा प्रश्न त्या कट्ट्यावरील एका चिमुरडीने तिच्या डॅडु ला विचारला, आणि मग काय? आपल्या चिमुरडीचा हट्ट पुरवण्यासाठी त्याने आपल्या वडिलांना स्मार्ट फोन घेऊन दिला, आणि दहा मिनिटात तो कसा वापरायचा याचा क्रॅश कोर्स देऊन तो त्यांना व्हाट्सऍप इन्स्टॉल करून देऊन मोकळा झाला.
मनोहर पंत व्हाट्सऍप ला जॉईन झाले. त्यांनी आपल्या काही इतर मित्रांना पण सांगितले की त्यांनी व्हाट्सअप्प वर एन्ट्री केली आहे. काही दिवसांनी त्यांना कुणीतरी फेसबुकवर आहात का ? असं विचारलं , आणि त्यांनी कुणाच्यातरी मदतीने फेसबुक इन्स्टॉल करून घेतलं...
असेच काही दिवस गेले, आणि त्यांना स्वतःला एक नवीन ग्रुप तयार कसा करायचा हा प्रश्न पडला. आतापर्यंत त्यांना हे कळलं होतं की काही येत नसेल तर गूगल सर्च करावे. आणि त्यांनी ते केलेही. त्यांना एक वेबसाईट दिसली ज्यावर "मोबाईल वापरताना कुठलीही अडचण आल्यास तुमचा नंबर इथं टाईप करा, आम्ही कॉल करून विनामूल्य मदत करू. आमचा एक तंत्रज्ञ लोकांचा ग्रुप असून आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भावनेने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत". असा एक दुवा दिसला. मनोमन त्या तंत्रज्ञांना दुवे देऊन त्यांनी आपला नंबर तिथे टाईप केला.
काही वेळात त्यांना एक कॉल आला. "मी तंत्रज्ञ ग्रुप मधून बोलतोय. आपल्याला काय मदत करू शकतो?". मनोहररावांनी त्याला त्यांचा प्रॉब्लेम सांगितला.
एवढंच ना? तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम चं version सांगा दोन मिनिटात काम होईल...इति मदतनीस.
आता आली का पंचाईत? ही version ची काय भानगड आहे ते पंतांना कुठे माहीत होतं? त्यांनी तसं मदतनीसाला सांगितलं...
मदतनीस म्हणाला,
"आजोबा, मी तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप्प वर एक मेसेज पाठवतो, त्यात एक लिंक असेल, त्यावर क्लिक करून teamviewer नावाचे एक ऍप असेल, तिथे इन्स्टॉल वर क्लिक करा. यामुळे मला तुमच्या फोन ची स्क्रीन दिसेल , आणि मी कंट्रोल घेऊन तुमचे काम करून देईन"
मनोहरपंतांना एक मेसेज आला, त्यांनी teamviewer इंस्टॉल केलं , आणि मदतनीसाच्या पुढील सूचना पाळत आपल्या फोन चा कंट्रोल त्याला दिला.
मदतनीस पुढे म्हणाला, "आजोबा, आता मी काही टेस्ट रन करत आहे तुमच्या फोन वर, थोडा वेळ तुमचा फोन ब्लॅक होईल",
असे म्हणून त्याने मनोहरपंतांच्या स्क्रीन चा कॉन्ट्रास्ट खूप वाढवला, आणि पुढील एकदोन मिनिटात तो पूर्ववत करून पुढे म्हणाला,
"झाल्या करून सगळ्या टेस्ट,
तुमचा फोन आहे सगळ्यात बेस्ट.."
त्याने कॉन्ट्रास्ट पूर्ववत केला आणि पुढील तीनचार मिनिटात मनोहरपंतांना व्हाट्सअप्प group कसा तयार करायचा हे छान शिकवले.
मनोहरराव खुश झाले. पुढे काय वाढून ठेवलं होतं त्यांना काहीच कल्पना नव्हती...
त्या मदतनीसाने कंट्रोल घेऊन स्वतःचं एक ऍप मनोहररावांच्या फोन वर इन्स्टॉल केलं होतं , आणि त्यांचा icon होम स्क्रीन वरून काढून टाकला होता. मनोहररावाना कळलंच नाही की आणखी एक ऍप आलंय आपल्या फोन वर.
हे ऍप मनोहररावांचे सारे sms वाचू शकत होत, मेसेज चा कन्टेन्ट एका सर्वर वर अपडेट करू शकत होत...आता विचार करा काय काय होऊ शकेल....
त्यांना कुठलाही OTP वगैरे आला की तो लगेच त्या fraudsters च्या सर्व्हर वर पाठवला जात होता.
मनोहररावना नक्की काय प्रॉब्लेम नंतर आले हा आपल्या कथेचा विषय नाही. आतापर्यंतचे भाग वाचले असतील तर तुम्हाला नक्की समजलं असेल काय होऊ शकत ते..
आपण काय धडा घ्यायचा?
रिमोट कंट्रोल घेऊन कुणी मदत करत असेल , आणि आपली screen ब्लॅक वगैरे होईल असं सांगितलं तर ती मदत घेणं तिथंच थांबवायचं. शक्यतो अशी मदत ओळखीच्या माणसाकडूनच घ्यायची.
सावध तो सुखी !!!
सोप्या सरळ भाषेत एक कठीण विषय पोहोवलास. मस्त.
ReplyDeleteसोप्या सरळ भाषेत एक कठीण विषय पोहोचवला. धन्यवाद.
ReplyDelete