नमस्कार मंडळी,
आजच्या भागात आपण आपली एखादी जुनी इन्शुरन्स पॉलिसी आहे असे सांगून आपली कशी फसवणूक केली जाऊ शकते ते सांगितले आहे.
अश्याच एका दुपारी रजनीताईंचा फोन खणाणला. फोनवरील व्यक्तीने ती व्यक्ती एका इन्शुरन्स कंपनीतून बोलत असून, राजेशरावांनी पाच वर्षांपूर्वी एक पॉलीसी रजनीताईंच्या नावावर घेतल्याचे सांगितले, आणि गेली तीन वर्षे त्या पॉलिसीचे हफ्ते न भरल्याने ती पॉलिसी पुढील काही दिवसात लॅप्स होईल असे सांगितले.
आतापर्यंत राजेशरावांनी एकूण दोन लाख रुपये भरले असून, एकूण पाच वर्षे प्रतिवर्ष एक लाख प्रमाणे हफ्ते भरले असते, तर पुढील वर्षी त्यांना एकूण नऊ लाख रुपये मिळाले असते असे असे सांगितले.
रजनीताईनी राजेशराव दोन वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्यामुळे त्यानंतर हफ्ते भरले गेले नसावेत असे उत्तर देऊन पुढे काय करता येईल याची माहिती विचारली. त्या माणसाने त्यांच्या सिनियर चा नंबर दिला व तुम्ही यांच्याशी बोलून घ्या, ते पुढे काय करायचे याचे सुयोग्य मार्गदर्शन करतील असे सांगितले.
रजनीताईंनी दिलेल्या नंबरवर फोन केला, त्यावेळी पलीकडील व्यक्तीने ते आत्ता एका मीटिंग मध्ये असून नंतर काही वेळानी फोन करतील असे सांगितले.
काही वेळानी रजनीताईंना फोन आला. पलीकडील व्यक्तीने राजेशरावांच्या निधनाबद्दल प्रथम शोक व्यक्त केला, व नंतर ती पॉलिसी रिव्हाइव्ह करण्यासाठी दोन पर्यांय सुचवले.
१) आत्ता तीन लाख रुपये व त्यावरील व्याज असे एकंदर सव्वातीन लाख रुपये भरले , तर पॉलिसी चालू राहील व पुढील महिन्यात पूर्ण नऊ लाख मिळतील , किंवा
२) आत्ता एक लाख रुपये भरून नवीन पॉलिसीचे घेतली, तर आधीच्या पॉलिसीमध्ये भरलेले दोन लाख व त्यावरील व्याज, बोनस इत्यादी असे एकूण पावणेपाच लाख रुपये पुढील महिन्यात मिळतील, व नवीन घेतलेली पॉलिसी चालू राहील
आत्ता एकदम सव्वातीन लाख भरण्यापेक्षा तुम्ही दुसरा पर्याय निवडा, त्यामुळे मलाही माझ्या नावावर एक पॉलिसी विकली असे दाखवता येईल, व मलाही टार्गेट प्राप्त करण्यास मदत होईल अशी विनंती केली.
आपणहून फोन करून आठवण करून दिली, व योग्य पद्धतीने पर्याय सांगून विनंतीही केली, त्यामुळे रजनीताईंनी दुसरा पर्याय निवडत असल्याचे सांगोतले. त्या व्यक्तीने काही वेळात तुम्हाला एक मेसेज येईल, त्यावर पेमेंट लिंक असेल, ती वापरून एक लाख रुपये भरा, व लगेच तुम्हाला पॉलिसीची कॉपी इमेल मध्ये येईल व पोस्टाने पॉलीसी पाचेक दिवसात घर येईल, असेही सांगितले .
काही वेळाने पेमेंट लिंक आली. रजनीताईंनी एक लाख रुपये ऑनलाईन भरले, एक मेसेजही आला. त्यानंतर पोस्टाने काही पॉलिसी आलीच नाही. काही दिवसांनी अजून कशी पॉलिसी आली नाही, म्हणून रजनीताईंनी त्या नंबर वर परत फोन केला, तर अजूनही त्यांना तो नॉट रिचेबल येतोय.
त्यावेळी शंका आली म्हणून रजनीताई इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात गेल्या. चौकशीअंती समजले के राजेशरावांनी अशी कोणतीही पॉलिसी घेतलीच नव्हती, व एक लाखाचीही नवीन पॉलिसी रजनीताईंच्या नावावर नव्हती. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले.
हल्ली असे कॉल येत आहेत. मलाही आला आहे. या वेळी काय काळजी घ्यायला हवी ते सांगतो.
१) कुणी आपली आधीची पॉलिसी आहे असे फोन वर सांगून हफ्ता भरण्यास सांगितले, तर ती पॉलिसी खरेच आहे ना, याची प्रत्यक्ष खातरजमा करून घ्यावी. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची वेबसाईट किंवा अँप असते, त्यावर आपले अकाउंट असेल तर तिथे जुन्या पॉलिसी दिसतातच. अन्यथा कंपनीच्या शाखेत भेट देऊन किंवा आपल्या ओळखीच्या एजन्टला सांगून याची पडताळणी करावी.
२) प्रिमियम पेमेंट ऑनलाईन करायचे असल्यास कुणी इन्शुरन्स कंपनीच्या साईट वर जाऊन किंवा आपल्या UPI अँप मध्ये पॉलिसी नंबर टाकून तिथून पैसे पाठवावे. कुणी पाठवलेल्या मेसेज मधील लिंक ओपन करून पेमेंट करूच नये.
३) रजनीताईंच्या या किश्श्यात आपण पाहीले असेलच, कि त्या पहिल्या व्यक्तीने त्याच्या सिनियर चा नंबर दिला व रजनीताईंना स्वतः त्या नंबर वर फोन करायला सांगितला. तिथे त्याने प्रथमदर्शनी विश्वास संपादन केला. नंतर त्या दुसऱ्या व्यक्तीने प्रथम मी बिझी आहे असे सांगून नंतर फोन केला, त्यावेळी विश्वास थोडा वाढला. आणि शेवटी दोन पर्याय सांगून कमी किमतीचा पर्याय देऊन त्या व्यक्तीने रजनीताईंना असे भासवले कि तोच योग्य पर्याय आहे, आणि स्वतःचे टार्गेट सांगून विनंतीरूपी भुलावणी केली.
तात्पर्य काय?
सावध रहा, पडताळणी करा.
रिस्पॉन्स द्या, रिऍक्ट होऊ नका
( या सदरात याआधीचे लेख लिहून झाल्यावर असे वाटले होते कि फसवणून करणाऱ्यांचे जवळपास सर्व मार्ग सांगून झाले असतील. पण ते आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. नवीन मार्ग शोधून काढतील.
नवीन वाचकांनी याआधीचे भाग जरुर वाचा. अवेअरनेस निर्माण करणे हाच माझ्यासाठी प्राथमिक उद्देश !)
Comments
Post a Comment