सासुशी गट्टी : भाग १० : सासुची दुकानदारी


नमस्कार मंडळी!

आजच्या भागात आपण एका दुकानदाराची व्यथा बघणार आहोत.

शालिनीताई रिटायर झाल्या आणि वेळ सदुपयोगी घालवण्यासाठी त्यांनी आपल्या रस्त्यालगतच्या एका खोलीतच छोटेखानी दुकान चालू केलं.  दुकानात त्या घरगुती लोणची, पूजेचे सामान वगैरे छोट्या-मोठ्या वस्तू ठेवत असत.  

डिजिटल युगातली त्यांच्याकडची बरीचशी गिऱ्हाईके "सुट्टे पैसे नाहीत,  तुम्ही भीम किंवा पेटीएम का ठेवत नाही आजी?" असं त्यांना विचारू लागले.  शेवटी शालिनीताईनी एक युपीआय पद्धतीने पैसे रिसिव्ह करणार ऍप  घेऊन त्याचा  क्यू आर कोड दर्शनी भागावर लावला. त्यांना ही पद्धत आवडू लागली होती.  कॅश हाताळणं नाही,  लगेच पैसे  अकाऊंटमध्ये यायचे.

एक दिवस  एक मुलगी काहीतरी घ्यायला आली. चार- पाच प्रकारची लोणची, उत्तम प्रकारचा भीमसेनी कापूर,  अत्तराच्या बाटल्या अशी सुमारे हजार बाराशे रुपयेची खरेदी केली. मध्येच  आजींना बोलता बोलता  नाव विचारलं ते त्यांनी सांगितलं.  "शालिनी चव्हाण". "पैसे ऑनलाईन देते हं आजी",  असे म्हणून तिने क्यू आर कोड स्कॅन केला आणि स्वतःच्या मोबाईलवर सक्सेसफुल पेमेंट असलेली स्क्रीन दाखवली. शालिनीताईंनी नाव वगैरे सगळं बरोबर असल्याची खातरजमा करून घेतली आणि ती मुलगी निघून गेली. ह्या पेमेंटचा मेसेज काही आलाच नाही ताईंना.  त्यांनी थोडा वेळ वाट बघितली पण मेसेज काही आलाच नाही.

दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन पासबुक भरून आणलं तिथे देखील इंट्री नव्हती. मग बँकेत चौकशी केली तिथे असं समजलं की असं काही ट्रांजेक्शन झालंच नाहीये. ती मुलगीही परत त्यांना दिसलीच नाही कधी.

हे असं कसं झालं?

हल्ली हे फसवे लोक स्वतः अशी पेमेंट ॲप्स सारखी दिसणारी ऍप तयार करून घेतात.  बोलता-बोलता आपलं नाव विचारून घेतलं जातं आणि क्यू आर कोड स्कॅन केल्याचे भासवून,  अमाऊंट त्याच ऍप मध्ये टाईप करून,न नेक्स्ट बटन दाबल्यावर पेटीएम, फोन पे किंवा गूगल पे  सारखी दिसणारी एक हिरवी स्क्रीन , आणि त्यात आपल नाव किंवा ज्या नावे आपण UPI अकाउंट तयार केलं आहे तेही दिसत. "शालिनी चव्हाण, सासूचे दुकान" वगैरे. अश्या फेक स्क्रीन जनरेट करून देणारी ॲप्स सुद्धा काही हॅकर्स किंवा फसवणूक करणाऱ्या लोकांनी तयार करून विकली आहेत. खालील screenshot बघा.


इथे transaction कुठलं झालेलं नसतं.  आपल्याला दाखवली जाते त्यांच्याच ऍप ची स्क्रीन, पेमेंट आलं म्हणून आणि आपण  विश्वास ठेवतो.

आता अशा प्रकारच्या धोक्यातून वाचायचं असेल तर काय करावं? एक म्हणजे दुकानात जर पेटीएम किंवा इतर काही यूपीआय वापरत असाल तर शक्यतो त्याच्याशी संलग्न असलेला मोबाईल स्वतःजवळ ठेवावा आणि पेमेंट आल्याची खात्री करूनच घ्यावी. हे यूपीआय वगैरेची पेमेंट रियल टाइम असतात, म्हणजेच ज्या वेळी देणाऱ्याचा अकाउंट मधून पैसे जातील त्याचवेळी घेणाऱ्याचा अकाउंटमध्ये पैसे आलले असतात. काही कारणास्तव आपला फोन जवळ नसेल तर पेमेंट करताना ग्राहकाकडून त्यांच्याकडील ॲप हे गुगलपे फोनपे पेटीएम वगैरे आहे, इतर कुठलंही फसव ऍप नाही ना ते स्वतः पाहून खात्री करून घ्यावी.

मी तर असं म्हणेन की स्वतःचा फोन जवळ नसताना अशा मोड मध्ये अनोळखी (किंवा untracable) माणसांकडून पेमेंट न स्वीकारलेच बरे.

काही दिवसांपूर्वी याच पद्धतीने fraud केलेला एक विडिओ viral झाला होता. तो विडिओ खरा आहे की नाही माहीत नाही, पण तंत्र हेच आहे.

https://www.freepressjournal.in/viral/watch-customer-cheats-shopkeepers-using-a-proxy-app-that-creates-a-lookalike-paytm-payment-screen-video-goes-viral

******

सावध राहा सुखी राहा !

Comments