एक काच होती. तुटलेल्या बांगडीची. काहीच महिन्यांपूर्वी तिला चुड्याच्या रुपात एका नववधूच्या हातात चढवलं होत. शेजारच्या बांगडीवर हलकेच आपटली की एक मधुर किणकिण होत असे. ती किणकिण ऐकून त्या सौभाग्यकांक्षिणीचे मन पुढील स्वप्नात रंगून जात असे.
लग्नानंतर तिचा नवरा देशाप्रती आपले कर्तव्य बजावताना सीमेवर शहीद झाला, आणि तिच्या हातातल्या बांगड्या फोडल्या गेल्या. त्यातलीच ती, एक काच. आपल आयुष्य संपलं, या दुःखापेक्षा 'नुकतेच संसाराला सुरुवात करून लगेच तो मोडलेला पाहताना त्या मुलीला काय यातनांतून जावे लागणार आहे?', याच कल्पनेने ती काच अस्वस्थ होती.
कुणीतरी तिला आणि इतर तुकड्यांना एकत्र करून बाहेर टाकून दिलं. तिच्या मनातून अजून त्या मुलीचा विचार जातच नव्हता. काही दिवस ती शहराच्या कचऱ्यात हाच विचार करून खंगत होती.
इतक्यात तिला एका कचऱ्यात भंगार शोधणाऱ्या मुलाने उचललं, आणि हलकेच आपल्या खिशात ठेवून दिलं.
इकडे ती मुलगीही सैन्यात भरती झाली, आपल्या नवऱ्याच अपूर्ण कार्य पूर्ण करायला.
त्या मुलाने अश्याच आणि काही काचा गोळा केल्या, आणि घरी येऊन त्याने आपल्या छोट्या बहिणीसाठी एक खेळणं तयार केलं.
सैन्यदलात संदेश वहन (सिग्नल्स) विभागात काम करताना घुसखोरांचे संदेश तिने टिपले, आणि देश एका मोठ्या संकटातून वाचला.
इकडे या मुलाने जे खेळण तयार केलं होत, तो होता एक कॅलिडोस्कोप. त्याच्या बहिणीला तो खूप आवडला होता. सारखं त्या खेळण्याला फिरवून ती वेगवेगळया आकृत्या बघून आनंदी होत असे. काचेच्या तुकड्यालाही थोड बर वाटत होत, आपल्यामुळे कुणीतरी आनंदी होत असेल म्हणून. तरीही त्या काचेच्या मनातून जिच्या हातातल्या चुड्याच्या रूपातून आपल अस्तित्व हरवलं होत, त्या मुलीचा विचार काही जातच नव्हता.
काही दिवसांनी या गरीब मुलांच्या घरी एक लष्करी गणवेशातील स्त्री आली. आणि तिने या गरीब मुलांसाठी वह्या, पुस्तके, खुप खाऊ आणि दप्तर आणले होते. ती स्त्री म्हणाली, "आजपासून कचऱ्यात भंगार विकायला जायचं नाही, शाळेत जायचं. तुमच्या सगळ्या शिक्षणाची आणि राहण्या जेवणाची सोय सैन्यदलातर्फे एका आश्रमशाळेत असेल."
कॅलिडोस्कोपवाल्या लहान मुलीला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने आपला कॅलिडोस्कोप त्या गणवेशात असलेल्या स्त्रीला भेट दिला. आणि ही प्रेमाची भेट ती नाकारू शकली नाही.
घरी आल्यावर त्या सैन्यदलातील स्त्रीने कुतूहलाने तो कॅलिडोस्कोप डोळ्याला लावला.
एक हिरवी काच आपल्या अंगावरील सोनेरी ठिपका घेऊन जणू नाचत बागडत होती. आणि तिच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मितहास्य उमटलं.
जणू दोघींनी एकमेकींना ओळखलच होतं..
अप्रतिम
ReplyDeleteकिती सुंदर आहे रे कथा,एकदम वेगळा विषय
ReplyDeleteKhup Chan kalpna!!
ReplyDeleteखूपच छान आहे.
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete