तिच्या कडू चवीचा तो हसी मजाक करत होता
कॉफी होती अबोल, काही न बोलता शांतच होती
चिडवण्याचा तिच्यावर काडीचा फरक पडला नव्हता
चिडवून चिडवून दमला चहा, स्वतःच थोडा चिडला होता
अंगावरच्या साईच्या खाली राग आपला दडवत होता
कॉफी मात्र तेव्हा गालात हळूच खुदकन हसली होती
अलगद तिला सुखावणारा साखरेचा कण विरघळत होता
कुणीच त्यांना पिणारे नव्हते, दोघे थंडगार झाले होते
परत गरम होण्याची व्यथा आठवत बेजार झाले होते
एवढ्यात आले कुणी, त्याने उचलले दोन्ही प्याले
गार चहाला मोरीत ओतले, कॉफीला फ्रीजमध्ये नेले
हुडहुडी भरून कॉफीचा कण अन कण आकसून गेला
बर्फाच्या त्या सहवासाने अंग थंडीने जाळुन गेला
मोरीमध्ये चहाला तेव्हा धडा नवीनच मिळाला होता
कॉफीचे आईस्क्रीम पाहून तो स्वतःवर पुन्हा चिडला होता
चिडवले जेव्हा मी तिला, तेव्हा ती शांतच होती
साखरेसंगे खेळत खेळत जीवनाची मजा लुटत होती
संकट आले जरी तिच्यावरी, फ्रीजलाही तिने टोचले नाही
स्वतः परिस्थिती प्रमाणे बदलून, आनंद सर्वांना देत होती
Waaa
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete