काच आणि मन

काच जेव्हा एकदम नितळ असते, त्यावेळी त्यावर पडणारा प्रकाश व्यवस्थित आरपार जातो. अलीकडच्याला पलीकडचं आणि पलीकडच्याला अलीकडच अगदी स्वच्छ दिसत. तसेच असे मन असलेली माणसं सर्वांना हवीहवीशी असतात. किंबहुना त्यांच्याशी संभाषण करताना काहीही संकोच असत नाही. अत्यंत विश्वासाने त्यांच्याशी नाती जमवली जातात. अशी माणसे इतरांचे निरपेक्ष वृत्तीने ऐकून घेतात, आणि त्यांना जे जे सांगतात ते ही एकदम स्पष्ट...

काचेवर मात्र कधीतरी एकदा एक ओरखडा उठतो, किंवा डाग पडतात. काचेला फक्त प्रकाश आरपार नेता येत असतो, पण कुणीतरी त्यावर दुसऱ्या वास्तूचा प्रयोग करत. तसच काचेसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाचा जेव्हा विश्वासघात होतो, किंवा त्यांना अप्रिय अस काही केलं जातं, त्यावेळी त्यांच्या मनावर असे ओरखडे उठतात. त्यानंतर ती  माणसं  आधीसारखी मोकळी ढाकळी वागत नाहीत. त्यांना कुणाशी कसं वागायचं याचा विचार करावा लागतो. 

काचेला एका बाजूने पारा लावला आणि दुसऱ्या बाजूने चांगली घासली की जसा तिचा आरसा बनतो, तशीच काही माणसं मग मनाच्या एका बाजूला अलिप्तपणाचा पारा लावतात, आणि आरश्याप्रमाणे दुसऱ्यांना त्याची छबी दाखवत जगतात. आपल्या मनातील विचारांना आतच दाबून ठेवतात.

कधीतरी मात्र काचेवर आफत येते आणि इतका मोठा प्रहार होतो की तिचे तुकडे पडतात. मनाच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटनाच मन उध्वस्त करायला कारणीभूत होते. ती गोष्ट झाल्यावर त्यांचे कशातही मन लागत नाही. आयुष्य निरसवाणे वाटू लागते. 

पण यात चांगली गोष्ट अशी की, काच एकदा तडकली की तिला पूर्ववत कधीच करता येत नाही. तुटलेल्या मनालाही अगदी पूर्ववत करणं सहज सोप्प नसल, तरी अशक्य नाही. हे नक्की की प्रयत्न खूप करावे लागतात. मग ते कुठल्या ध्यान साधनेचे असो वा इतर काही उपाय असो. 

थोडक्यात काय, काचेला जस कधी माहीत नसत की आपल्यावर प्रकाश पडणार आहे की दगड येऊन आपटणार आहे, तद्वत आपण आपल्याशी कोण कसे वागेल हे ठरवू शकत नाही. आपल्या मनाला आपणच सांभाळायला पाहिजे. 

Comments

  1. अनुभव हाच श्रेष्ठ गुरू !!

    ReplyDelete
  2. Farach surekh tuzya swabhavala anusarun pardàrshi lihile aahes.

    ReplyDelete
  3. मन अन् काच .दोन्ही सांभाळणं ~~~

    ReplyDelete
  4. अनुभवाने शहाणपण येतेच असे नाही.या जगात पुढे जात राहायचं अन् शिक्षण घेत राहायचं.

    ReplyDelete

Post a Comment