इसवी सनातल्या २०५० सालच्या आसपासची ही गोष्ट.
प्रणाली आपल्या कामात गर्क असताना तिचा फोन वाजला. अनोळखी क्रमांक असल्याने तिने दुर्लक्ष केले. काहीच क्षणात तिला एक मेसेज आला की एक अतिशय महत्वाचे काम आहे, आणि परत कॉल करण्याची विनंती केली गेली. थोड्याश्या रागातच तिने फोन लावला. पलीकडून एक मंजुळ आवाज आला, "नमस्कार, सुकोष गर्भशीतगृहाच्या फोन सेवेचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद". प्रणाली चमकली. तिला काही सुचेना. झटकन तिने फोन कट केला आणि तिला भूतकाळ आठवला.
प्रणाली आणि प्रतीक, दोघे अत्यंत यशस्वी संगणक तंत्रज्ञ. दोघांनी आपापली नावे अगदी सार्थ केली होती. प्रणाली नावाप्रमाणेच एक सर्वोत्तम संगणक-प्रणाली (सॉफ्टवेअर) तंत्रज्ञ. प्रतीकने आपल्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रामधील स्वयंचलित यांत्रिक करामतीनी सर्व देशासमोर आदर्श ठेवला होता. पाचेक वर्षांपूर्वी एका कुठल्याश्या कार्यक्रमात त्यांची पहिली भेट झाली, मनं जुळली आणि पुढे त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतर सहा आठ महिन्यातच प्रतीकच्या आईने, प्रज्ञाने प्रणालीकडे “पुढं काय ठरवलंय?” असा तगादा चालू केला.
प्रतीक आणि प्रणाली दोघानीही आपापल्या करीअरसाठी खूप विचाराने आणि तेवढ्याच प्रयत्नांनी काही ठरवले होते. प्रणालीतर आता इतक्यात मुलेबाळे नकोत या विचारावर अत्यंत ठाम होती. खूप कष्ट करून शिक्षण घेतले होते तिने, आणि आता पुढील काही वर्षांत आपल्या क्षेत्रात काही करून नांव कमवायचे हे तिचे ध्येय होते. आपण अभियांत्रिकी पदवी घेतली आहे तर संसाराच्या इतक्यात अकडायचे नाही हा तिचा निर्णय एकदम ठाम होता. खरतर ती लग्नासाठीही तयार नव्हती, पण प्रतीक हा आपल्यासाठी एकदम सुयोग्य आहे हे कळल्यावर तिने लग्नाला होकार दिला होता. प्रतीकही तिच्या भावनांचा आदर करत होता,आणि इतक्यात मुल नको या विचारांशी तो सहमतही होता. पण प्रज्ञाताईची नातवासाठी ओढ बघून तिला दुखवू नये म्हणून ते दोघे वरकरणी त्यांना विरोध करत नसत. पण दोघांनी मिळून हा निर्णय मात्र घेतला होता की आत्ता मुल नको. त्यादृष्टीने जी काळजी घ्यावी ती ते घेतही होते.
पण काही गोष्टी आपण कितीही ठरवल्या तर त्या तश्याच होतील याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, आणि झालंही तसंच. प्रणालीला दिवस राहीले. या बातमीच्या आनंदापेक्षा तिला वाईटच जास्त वाटलं. आपलं गणित चुकलं कसं? गर्भपात करून घेण्यासाठी ती हॉस्पिटल मध्ये गेली.
डॉ. सदावर्ते एक नावाजलेल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ. त्यांच्याकडे प्रणाली गेली असताना आपला नंबर येण्याची वाट बघत ती रिसेप्शनमध्ये बसून काही मासिके चाळत होती. एका जाहिरातीने तिचे लक्ष वेधून घेतले. "गर्भपात करू नका! आपला गर्भ आमच्याकडे सुरक्षीत ठेवा!....सुकोष गर्भशीतगृह"
डॉ.ना प्रणालीने या नवीन तंत्रज्ञानाविषयी विचारले. डॉ. ना प्रणालीचे एकंदर व्यक्तिमत्व, विचारसरणी वगैरे माहीत होतीच. आत्ता गर्भपात करून आणि काही वर्षांनी परत प्रयत्न करावा म्हटलं तर परत वाढत्या वयानुसार अडचणी येऊ शकतात, या सर्व बाबींवर चर्चा करून आपला गर्भपाताचा निर्णय थोडा पुढे ढकलून प्रणाली घरी आली.
प्रतीक आणि प्रणालीने त्या नवीन तंत्रज्ञानाविषयी आणखी माहिती घेतली. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला नको असताना गर्भधारणा झाली असेल तर “सुकोष गर्भशीतगृह” आपला गर्भ एका विशिष्ट शल्यचिकित्सेने सुखरूप आपल्या गर्भाशयातून काढून त्यांच्याकडील एका विशिष्ट शीतगृहात जतन करून ठेवण्याची “सुविधा” पुरवीत होते. प्रणाली आणि प्रतीकने त्या सुविधेचा लाभ घेऊन त्यांच्या जीवांचा तो अंश तीन वर्षासाठी अडीच लाख रुपये भरून जतन करून ठेवला, आणि ते दोघे आपापल्या करीअर वर लक्ष केंद्रित करून अहोरात्र मेहनत करू लागले.
कामाच्या व्यापात प्रणालीतर हे विसरून गेली होती की त्यांची तीन वर्षांची मुदत पुढच्या महिन्यात संपत होती, आणि म्हणूनच त्या गर्भशीतगृहाच्या वतीने तिला हा रिमाइंडर कॉल आला होता.
प्रणाली घरी आली, प्रतीक तिच्या आधीच घरी पोचला होता. तिचा पडलेला चेहरा पाहून त्याने शांतपणे तिच्या आवडीचा ग्रीन टी करून तिला दिला, आणि विचारले , “आज काही टेन्शनची गोष्ट झाली का ऑफिसमध्ये?”. प्रणालीने त्याला आलेल्या कॉल विषयी सांगितले, आणि दोघे खूप वेळ एकमेकांचा हात हातात घेऊन नुसतेच बसून राहिले. शेवटी प्रतीकने विचारलं, “तुझं मत काय? काय करूया आपण? आणखी एक वर्ष सबस्क्रिपशन रिन्यू करू का? दोन सेकंदात होईल त्यांच्या ऍप वरून?”. प्रणाली म्हणाली, “अरे, त्यासाठी त्यांचे चार्जेस बघितलेस का? चौथ्या वर्षांपासून वर्षाला दीड लाख आहेत. त्यापेक्षा आपण त्या गर्भाला जन्म दिला तर?” प्रतीकच्या चेहऱ्यावर झटकन एक खुशीची लहर उमटली. त्यालाही बाळ हवं होतंच, पण प्रणाली काय विचार करत आहे, हे त्याला जाणून घ्यायचं होतं, आणि प्रणालीच्या आत्ताच्या निर्णयाने तोही खुश होता.
पण त्याची ही खुशी एका क्षणात अचंब्यात बदलली. प्रणाली म्हणाली. “मला माझ्या पोटात याला पुढचे काही महिने सांभाळून, त्याला जन्म देऊन, त्यासाठी बाळंतपणाची रजा काढून माझ्या करीअर मध्ये ब्रेक घेणं आत्तातरी शक्य नाहीये. पण माझ्याकडे एक मार्ग आहे.” आता यावर काय मार्ग असणार याचा विचार प्रतीक करत होता, आणि त्याचा तो प्रश्नार्थक चेहरा बघून प्रणाली पुढे म्हणाली, “अरे, माझ्या ऑफिस मधली प्रेरणा आठवतीये का? दोन वर्षांपूर्वी तिला दिवस गेले होते. बाळ होणार म्हणून किती आनंदात होती. पण नशीबच फुटकं तीचं. तिच्या पोटात काही गर्भ टिकला नाही, आणि नंतर तिच्या मिस्टरांचं पण अपघातात निधन झालं. आईपणाची खूप आस होती तिला. आपण तो गर्भ तिच्या पोटी वाढवू. या गर्भशीतगृहात आपण रिन्यूअल केलं असतं दोन वर्षांचं, तर त्याचा जो तीन लाख खर्च आला असता, तो आपण तिला देऊ. तिलापण मदत आणि आपलपण काम झालं”. “अगं, पण ती तयार होईल का?” हे विचारल्यावर प्रणाली म्हणाली, “ते तू माझ्यावर सोड”.
दुसऱ्या दिवशी प्रणाली ऑफिसमध्ये पोचली. आपली नेहमीची ई-मेल चेक करणे, महत्वाच्या ई-मेल ना रेस्पॉन्ड करणे, इतर टीम मिटींग्स वगैरे झाल्यावर तिने प्रेरणाला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. “मे आय कम इन मॅडम”, प्रेरणेने दारावर नॉक करून विचारलं. “यस प्रेरणा, प्लीज कम”. “मॅडम, माझा प्रोजेक्ट ट्रॅक वर आहे, काहीही रिस्क नाही. ग्रीन आहे.” प्रेरणाने न विचारताच प्रोजेक्ट अपडेट देऊन टाकला. आज मॅडमने आपल्याला एकटीला असं का बोलावलं याच विवंचनेत होती ती. आपलं काही चुकलं आहे का याचाही विचार करत होती, आणि त्यामुळे तिच्या कपाळावर घाम दिसत होता. “अगं, बस ना, काही नाही, सहज गप्पाना बोलावलं. मला पण आज थोडा वेळ होता, आणि तुझ्याशी वन-ऑन-वन खूप दिवस बोलले नव्हते” असं म्हणून प्रणालीने थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, तिला कामात किंवा इतर काही प्रॉब्लेम नाही ना ते विचारून घेतलं आणि शेवटी म्हणाली, “प्रेरणा, या वीकएंड ला काय प्लॅन आहे? जर तू फ्री असशील तर डिनर ला माझ्या घरी येशील का? तुझ्याशी मला काही बोलायचं आहे. तसं पर्सनल आहे, आणि मला माझ मन मोकळं करायचं आहे, प्लीज! ” प्रेरणाला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता.
ठरल्याप्रमाणे प्रेरणा शनिवारी रात्री जेवायला प्रणालीच्या घरी आली. डायनिंग टेबल वर प्रतीकला बघून ती चमकली. मॅडमला पर्सनल बोलायचं होतं, आणि सर तर घरीच आहेत. तिची घालमेल ओळखून प्रेरणा म्हणाली, “डोन्ट वरी प्रेरणा, प्रतीकला विषय माहित आहे आणि खरं तर आम्हा दोघाना तुझी मदत हवी आहे” असं म्हणून प्रणालीने मूळ मुद्दयाला हात घातला. तीन वर्षांपूर्वी काय आलं होतं इथपासून ते काळ आलेल्या रिमाइंडर आणि त्यांनी बाळाला जन्म देण्याच्या निर्णयाबद्दल सांगून तिने पॉज घेतला. “अभिनंदन मॅडम आणि सर, खूप छान निर्णय घेतला तुम्ही. मॅडम, तुम्ही ऑफिसची काही काळजी करू नका. आम्ही सांभाळू सगळं”. एवढं बोलून होतंय तोच प्रणाली म्हणाली, “प्रेरणा, या बाळाला तू जन्म द्यावास असं आम्हाला वाटतंय. जरा शांतपणे ऐकून घे. हे बघ, या बाळाला जन्म देणं मला शक्य नाही. मला माझ्या करीअर मध्ये असा ब्रेक घेणं परवडणारं नाहीये. तुला काही काळजी करायची गरज नाही. या काळातली तुझी सगळी जबाबदारी आमची. आणि त्यासाठी तुला आम्ही तीन लाख रुपये देणार आहोत, आणि पुढच्या वर्षी तुझं सिनिअर पोस्ट ला प्रमोशनपण”.
“ते सगळं ठीक आहे मॅडम, पण विधवेच पोट बघून माणसं काय म्हणतील?” - प्रेरणा
हा विचार तर प्रणाली आणि प्रतीकने केलाच नव्हता. दोन पाच मिनिट अशीच नि:शब्द गेली, आणि प्रतीक म्हणाला, “प्रेरणा, तू इथेच रहा. इथून काम कर. कुणाच्या नजरेलाही पडणार नाहीस. पण नाही म्हणू नकोस”.
प्रेरणाला काय करावं सुचत नव्हतं; पण प्रणालीने तिला याआधी खूप मदत केली होती. ती आज स्वतःच्या पायावर उभी होती ते प्रणालीमुळेच. प्रणालीला नाही म्हणणं तिला शक्य झालं नाही, आणि ही ऑफर तिने स्वीकारली.
पुढच्याच आठवड्यात डॉ. सदावर्ते यांच्या हॉस्पिटल मध्ये एका शस्त्रक्रियेने तो गर्भ प्रेरणाच्या गर्भाशयात ठेवला गेला. दर पंधरा दिवसांनी चेकिंग होत होतं, बाळ छान वाढत होतं, आणि अखेर त्या बाळाने एका परीच्या रूपात जन्म घेतला. तीच नाव “प्रतीक्षा” ठेवलं गेलं. गर्भधारणेनंतर जवळपास साडेतीन वर्षांनी जन्म घेतला, म्हणून “प्रतीक्षा”.
बाळाचा जन्म होण्याआधी काही दिवस “सुकोष गर्भशीतगृहाचा” प्रतिनिधी प्रणाली आणि प्रतीकला भेटून गेला होता. त्याने आणखी एक नवीन आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती त्याना दिली होती, आणि ते तंत्रज्ञान बाळ झाल्यावर बाळाचं संगोपन करताना आई-वडिलांचा वेळ कसा वाचवतं हे त्यांच्या डोक्यात पेरलं होतं. साहजिकच त्या दोघांनी त्या तंत्रज्ञानाला वापरायचं नक्की केलं होतं. ते तंत्रज्ञान होतं “ह्यू-चीप”. मानवाला वैद्यकीय पॅरामीटर्स मध्ये कायम रहायला मदत करण्यासाठी, उद्याच्या निरोगी आणि सुदृढ पिढीसाठी, अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून संशोधीत केलेली हीच ती ह्यू-चीप, ह्यूमन मधील मन काढून नुसता ह्यू ठेवलं होतं तिच्या नावात.
जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्या तान्ह्या प्रतीक्षाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं, आणि तिच्या मानेतून एका इंजेक्शनने एक केसासारखी “चीप” आत सरकवून एक रक्तवाहिनी आणि एक मज्जातंतू यांच्याशी त्या चीपला जोडलं गेलं. हीच टी ह्यू-चीप. अर्धा तास सुद्धा लागला नाही या ऑपरेशनला. प्रणाली आणि प्रतीकला एक ऍप दिलं गेलं. प्रतीक्षाच ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, कोलेस्टेरॉल एवढंच नव्हे तर तिचं लसीकरणाच्या तारखा, तिला इतर काही इन्फेक्शन झालं तर त्याचे इंडिकेटर्स वगैरे सगळं त्या ऍप मध्ये येणार होतं. जणू प्रतीक्षाचा लाईव्ह मॉनिटर.
आठवडाभरात सगळे आपापल्या घरी आले. आपण जन्म दिलेल्या बाळापासून दूर व्हायचे आहे, तर तो बाळाला आपला लळा लागण्याच्या आधी योग्य, या विचाराने प्रेरणाही तिच्याच घरी गेली. प्रणाली, प्रतीक, प्रज्ञाताई आणि प्रतीक्षा या चौकडीचा नवीन आयुष्यात नवीन डाव चालू झाला.
ती चीप स्वतः बाळाला अंघोळ घालणे, कपडे बदलणे वगैरे करू शकत नव्हती. पण प्रज्ञाताई होत्या की, अगदी मायेने आपल्या नातीची त्या काळजी घेत. आणि प्रज्ञाताई असल्याने प्रणाली आणि प्रतीकचीही चांगली "सोय" झाली होती. असेच एकदा प्रज्ञाताई देवपूजेत मग्न होत्या, आणि प्रतीक्षा रडू लागली. प्रेरणाने लगेच ऍप मध्ये पाहण्यास सुरुवात केली. ताप नाहीये, बाकी सगळे पॅरामीटर्स उत्तम. बॉडी कॅलरी काऊंट पण जास्त आहे, म्हणजे भूक नाही. ती अजून मोबाईलमध्ये पाहतच होती, तेवढ्यात रडण्याचा आवाज थांबला. प्रेरणाने बघितले तर प्रज्ञाताई प्रतीक्षाला उचलून घेऊन थोपटत होत्या. प्रतीक खोलीच्या दरवाज्यातून हर पहात होता. प्रतीक्षाला आईच्या मायेची थोडी प्रतीक्षाच करावी लागणार होती बहुधा.
काही दिवस गेले आणि प्रतीक एक मोठा बॉक्स घेऊन घरी आला, आणि त्याने सगळ्यांना एकत्र बोलावले. बॉक्स उघडला आणि स्वतः तयार केलेला एक रोबोटीक आर्म त्याने बाहेर काढला. माणसाच्या खांदा, छाती आणि हात यांसारख्या आकाराच्या त्या कृत्रिम हातावर बाळाला ठेवण्यासाठी एक जागा होती. तिथे बाळाला ठेऊन, सेफ्टी बेल्ट लावून आर्म ऑन केला की तो हळू हळू बाळाला थोपटायचा. प्रतीक्षाला त्यावर ठेवून प्रात्यक्षिक पण झालं, आणि प्रतीक्षाही त्या नवीन खेळण्यात मस्त झोपी गेली. प्रतीकने विजयी मुद्रेत दोघींकडे बघितले, प्रणालीच्या डोळ्यात कौतुक होते, आणि प्रज्ञाताईच्या डोळ्यात मात्र दोन अश्रू होते. प्रतीकला समजलंच नव्हतं त्या अश्रूंच खरं कारण.
पुढे प्रतीक्षाच्या वर्षाच्या वाढदिवसाला प्रणालीच्या फोन वर एक नोटिफिकेशन आलं. चीप मधलं सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठीच्या सुचना त्यावर होत्या. त्याप्रमाणे आपल्या फोन वर प्रणालीने नवीन अपडेट डाउनलोड केला, आणि ब्लुटूथ चालू करून चीप मधलं सॉफ्टवेअर अपडेट केलं. ते करत असताना मात्र संगणक तज्ञ असलेल्या प्रणालीच्या मनात अनेक शंका उत्पन्न झाल्या. म्हणजे चीप मधलं ब्लुटूथ कायम चालू असतं तर, मग कुणी हॅक केलं तर? आणि त्या चीप ला पॉवर कशी मिळत असेल? शरीरातील ऊर्जा वापरत असणार ती चीप. आज पहिल्यांदा प्रणाली आपल्या या निर्णयावर थोडी शंका घेत होती. तिने ह्यू-चीप च्या टीमला एक ई-मेल लिहून आपल्या शंका विचारल्या. दुसऱ्याच दिवशी तिला त्याचे टिपिकल उत्तरही मिळाले. "आमचे तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. इंडस्ट्री मधील नामवंत सेक्युरिटी एक्सपर्टसनी हे तपासले आहे. तसेच याची नामवंत कंपनीकडून टेस्टिंग पण झाली आहे, आणि त्याचा सारांश स्वरूपातील रिपोर्ट सोबत जोडत आहोत. कृपया काही शंका असल्यास आपल्याला नक्की कुठे प्रॉब्लेम दिसला ते सांगावे, आम्ही तत्पर सेवा देण्यास बांधील आहोत". प्रणालीला या फक्त शंकाच होत्या. आणि दुसऱ्याच दिवशी आलेले हे उत्तर वाचून तिचे पूर्ण समाधान झाले नसले, तरी तिला स्वतःला काही प्रॉब्लेम सापडला नव्हताच. त्यामुळे या जर तर च्या गोष्टी सोडून तिने ह्यू-चीप तंत्रावर विश्वास ठेवायचे ठरवले.
या अपडेट मुळे चीप असलेल्या व्यक्तीच्या मनात ज्या भावना असतात, त्याच्याशी साधर्म्य असलेली ईमोजी मोबाईल ऍप वर दिसत असे. आपल्या मनातील भावनांप्रमाणे आपल्या हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान, स्नायूंमधील कंप, ब्लड प्रेशर, पल्स रेट आणि इतर पॅरामीटर मध्ये होणारे बदल मापून त्याप्रमाणे काय भावना असेल ती दाखवली जात होती.
अपडेट इन्स्टॉल झाल्यावर तिने गम्मत म्हणून ऍप बघितलं तर तिला एक निर्विकार चेहरा असलेली ईमोजी दिसली. ती प्रतीक्षाच्या खोलीत गेली, आणि त्या निर्विकार चेहऱ्यावर एक भीतीचा भाव दिसला. तिला काही समजलंच नाही. ती परत बाहेर आली. थोड्या वेळाने ती ईमोजी आनंदी झाली, आणि तिने सहज पाहिलं तर प्रज्ञाताई प्रतीक्षाजवळ होत्या. आज पहिल्यांदा प्रणालीला जाणवलं की आपण आई म्हणून कमी पडतोय.
दिवसामागून दिवस जात राहिले, आणि प्रतीक्षा आता दोन वर्षांची झाली. तिच्यासाठी एक स्वतंत्र बेबी रूम केली होती.एके रात्री अचानक तिला ताप चढू लागला. चीपने आपलं काम योग्य केलं आणि प्रणालीच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात केली, पण दुर्दैवाने प्रणालीने फोन सायलेंट वर ठेवला होता, आणि ती गाढ झोपी गेली होती. सकाळी प्रज्ञाताई प्रतीक्षाला उठवायला गेल्या, त्यावेळी त्यांना समजलं. 104 पर्यंत ताप होता.लगेच त्यानी प्रणालीला उठवलं आणि दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टर म्हणाले, "अजून थोडा वेळ केला असतात, तर मेंदूत ताप गेला असता, पण आता काळजीचं काही कारण नाही". औषध घेऊन सगळे घरी आले.
थोडाच वेळ झाला आणि बेल वाजली. प्रणालीने दार उघडलं, तर प्रेरणा आली होती. ती म्हणाली, "काल रात्रीपासून मला बेचैन होत होतं. रात्रभर झोप लागली नाही. पहाटे कधीतरी डोळा लागला, आणि स्वप्नात प्रतीक्षा तापाने फणफणलेली दिसली. सारखं आई, आई म्हणून हाक मारत होती. तुम्ही कुठंही जवळपास नव्हता. प्रतीक्षा चालत चालत लांब जाताना दिसली, आणि मला जाग आली. तुम्हाला फोन लावत होते खुशाली घेण्यासाठी, पण तुम्ही फोन उचलत नव्हता. मला राहवलं नाही, आणि मी तडक निघून आले"
तिचं हे बोलणं अखंड चालू होतं, आणि प्रणालीच्या डोळ्यात कधी नाही ते अश्रू आले होते. तिला जाणवलं की प्रेरणाच खऱ्या आईची माया देऊ शकते. तिने प्रेरणाला प्रतीक्षाजवळ बसायला सांगून प्रतीक आणि प्रज्ञाताईंना आतल्या खोलीत बोलावून घेतलं, आणि आपलं मन मोकळं केलं.
प्रणाली प्रतीक्षाच्या खोलीत आली, आणि प्रेरणाला म्हणाली, "प्रतीक्षा तुझीच मुलगी आहे. आमच्याकडे दोन वर्षे ही परी पाहुणी होती. आज मला कळलं की नुसतं बीज आपलं असणं पुरेस नसतं, तर माया पण आपणच द्यावी लागते. निर्णय तू घे. प्रतीक्षा तुझीच आहे, आणि तू तिला तुझ्याकडे घेऊन जाऊ शकतेस, कायमची. आम्हाला ती नकोय असं अजीबात नाही, पण तिला माया तूच देऊ शकतेस. पाच महिने का असेना, वाढवलं आहेस तुझ्या उदरात तिला. आम्ही कायदेशीररित्या दत्तक विधान करून देऊ."
आता अखंड बोलणं प्रणालीचं चालू होतं, आणि प्रेरणाच्या डोळ्यात महापूर आला होता. तिचा एक अश्रू तिच्या मांडीवरच्या प्रतीक्षाच्या गालावर पडला, आणि ती खुदकन हसली, जणू तिला गुदगुल्याच झाल्या होत्या. प्रणालीच्या ऍप वर एक मस्त स्मायली आली होती.
अर्थातच प्रेरणाला प्रतीक्षा हवीच होती. प्रणालीने मात्र डॉ. शी बोलून ती चीप डी-ऍक्टिवेट करून घेतली. तिला कळलं होतं की प्रेरणाकडे आता प्रतीक्षाला त्या चीप ची गरज नाहीये.
प्रतीक्षाची “आईच्या मायेची प्रतीक्षाही” आता संपली होती.
(या कथेतील गर्भशीतगृह आणि ह्यू-चीप या संकल्पना "सध्यातरी" काल्पनिक आहेत. येणारा भविष्यकाळ सांगेल की त्या प्रत्यक्षात येतील का ते.)
Comments
Post a Comment