मनाच्या अंधारात असे शब्द ऐकले की अण्णांचे हे शब्द, आणि चितळकर मास्तरांची (सी. रामचंद्र) चाल, आणि आशाताईंच्या अलौकिक आवाजातील हे गाणं मनात रुंजी घालू लागत, आणि मनातील नैराश्याचा अंधार कधी लुप्त होतो कळात नाही.
श्री. संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटात असलेले हे गीत. हे गीत खरतर प्रत्यक्ष माउलींनी रचलेले नाही, तर गदिमांनी ही रचना केली आहे. या गाण्याचे शब्द असे काही लिहिले आहेत की जणू बाराव्या शतकात माउलींनी ही रचना केली असावी असेच वाटत रहाते. उकारांत शब्दाने होणारा शेवट (प्रकाशु, दिनेशु वगैरे) माऊलींच्या अवचितां परिमळू, सोनियाचा दिनु, सकळमतीप्रकाशु अश्या परिचित असलेल्या शब्दांच्या भक्तीभावाप्रमाणे सुंदर अश्या पहाटेच्या शांत वातावरणाची निर्मिती करतोच. त्याहीपेक्षा पुढे मनाला एक वेगळी चेतना आणि उभारी देऊन मनातही एक वेगळी पहाट जागवतो. कृष्णाची बासरी जशी आपल्याला कृष्णे वाजवावे अशी प्रार्थना करत असते, तशीच गदिमांची लेखणीही त्यांनी आपल्याला आता परत उचलून घ्यावे अशी प्रार्थना करीत असेल.
हीच गोष्ट सी. रामचंद्र यांच्या संगीताची. नागपुरात शंकरराव सप्रे मास्तरांनी भरपूर रत्ने घडवली, त्यातले आपल्याला माहीत असलेले वसंतराव, आणि त्याच शाळेतले हे चितळकर मास्टर. हिंदी मध्ये इना मीना डीका, भोली सुरत दिलं के खोटे, शाम ढले खिडकी के तले अशी उडती गाणी देणारेच हे सी. रामचंद्र. मराठीमध्ये अनेक भक्तिगीते त्यांनी संगीतसाजाने नटवली, आणि त्यातले हे एक अजरामर गीत. आणि आशाताईंचा मधाळ आवाज.
मनाचा अंधार.. काहींनी त्याला नैराश्याचा अंधार म्हटल आहे. माझ्या मते तो अज्ञानाचा अंधार आहे. नैराश्य हे अज्ञान असल्याने येते. कितीही वाईट झाल तरी काळ कधी कुणासाठी थांबत नाही. आपण त्या दुःखाकडे क्षणभर पाहून परत आपले कार्य करत राहायचे, हे ज्ञान नसेल तर "माझ्याच नशिबी हे का?" असे प्रश्न मनात अंधार करू लागतात. काळाचा महिमा जाणण्याचा मार्ग ज्ञानियाचा आहे. विठ्ठल पंतांनी आपल्या मुलांची नावे सुद्धा किती समर्पक ठेवली आहेत. चित्त निवृत्ती नंतर ज्ञान प्राप्त करून घेतले की आपल्याला एक सोपान (जिना) मिळतो, आणि तो आपल्याला मोक्ष मुक्ती प्राप्त करून देतो. अश्या या ज्ञान मार्गाने आपल्या आयुष्यातील फक्त नैराश्याचा नाही, तर अज्ञान, अहंकार, लोभ वगैरे अवगुणानी निर्माण केलेला अंधार दूर होण्यास मदत होते.
हास्यचिये विलसे ओठी अद्भुतची झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु||
अनुभूती म्हणजे विशेष असे अनुभव. ज्ञानप्राप्ती होणे सुरु झाले की आपल्याला बऱ्याच गोष्टीचे पुन्हा नव्याने आकलन होते. आणि ज्ञान नसताना त्या गोष्टी बद्दल आपण काय काय विचार करत होतो, तो कसा अल्लड होता हे समजते, आणि आपलेच आपल्याला जणू हसू येते.
पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतूनी जागा झाला राऊळी रमेशु||
जसजसे आपले ज्ञान वाढत जाते, तसे तसे आशेचा किरण दिसू लागतो. ही आशा कशाची बरे? भौतिक सुख दुःख यांचा फोलपणा कळू लागला, की आशा फक्त एकच गोष्टीची उरते ती म्हणजे मोक्ष. रमापती वैकुंठनायक शेष शय्येवर पहुडलेला असा आपण कायम बघतो. इतका निवांत देव दुसरा कोणता वाटत नाही. ब्रह्मदेव आणि भोलेनाथ समाधीत असतात ते निर्मिती आणि पूर्तता (विनाश नव्हे) यांच्या तयारीत. वैकुंठ नायक मात्र आपल्या निद्रेतून लोकांना हेच जणू सुचवत असावेत, की मी झोपलेला दिसत असलो तरी झोपलेला नाहीये. तुम्ही कर्ममार्ग, भक्तिमार्ग अश्या कुठल्याही ज्ञानमार्ग वाटेने माझ्यापर्यंत पोचू शकता. जे जे या मार्गाने येतील त्यांना मी खचित मोक्ष देईन. अश्या या रमापती भगवंताला हळूच जाग येईल ज्यावेळी ज्ञानमार्ग चोखाळत आपण त्याच्यापर्यंत पोहोचू.
जेवढे चिंतन मनन करावे या गीतावर तेवढा सखोल अर्थ लक्षात येतो. आणि अजून विचार करण्यासारखे भरपूर आहे या जाणिवेने मनाला आलेला कंटाळा रुपी अंधार पण नष्ट होतो..
इति लेखनसीमा
Comments
Post a Comment