आज बऱ्याच दिवसांनी ध्यान केले. तेजानंद महाराज दिसले. माझी एकंदर अध्यात्मिक प्रगती, तिच्यात येणारे संसाररुपी मृगजळातले परिस्थिती स्वरूपातील अडथळे, ओॲसिस प्रमाणे कधीतरी येणारी वैराग्याची आस, आणि त्यानंतर सांसारिक कर्तव्यांमुळे पदरी पडणारी घोर निराशा, यामुळे व्यथित होऊन महाराजांना "त्राही माम!", म्हणालो.
ही स्वागत सुमने झाल्यावर, मी महाराजांना सरळ प्रश्न केला.
"महाराज, कर्माचे सिद्धांत हा ग्रंथ म्हणजे आध्यात्मिक साहित्याच्या भवसागरतील एक सुवर्णशिंपला आहे, हे मान्य. पण त्यातील काही संदर्भ समजले नाहीयेत. ते कृपया मला समजावून उपकृत कराल का"
"हम्म्म!!!" - महाराज
"त्यात लेखक म्हणतात की कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे तीन मार्ग आहेत. त्यापैकी मी कोणता मार्ग निवडावा?"
"कौनसा तुम्हे आसान दिखता, वोईच पकडणेका" - महाराज
"पण पुढे लेखक म्हणतात, मी भगवंताचा हा कर्ममार्ग,
भगवंत माझा हा भक्तिमार्ग, आणि आम्ही दोघे एकच हा ज्ञानमार्ग. महाराज, तुम्हीच माझे भगवान आहात. आता यापैकी कुठला मार्ग मी निवडू ते आपणच सांगा बरे."
मी हा प्रश्न विचारला आणि महाराज मौनात गेले. मी अजूनही उत्तराची वाट बघतोय. या प्रश्नातली मेख माझ्या नंतर लक्षात आली, आणि महाराज गप्प का बसले ते ही कळले. नंतर मीच या प्रश्नाचं उत्तर शोधायला चालू केलं. ज्या ग्रंथाने हा प्रश्न पाडला होता, तो विकत आणला. (प्रश्न पडला त्यावेळी तो फक्त चाळत होतो, फुकट मध्ये) आणि त्याचे अध्ययन चालू केले.
खूप सुंदर उदाहरणे देऊन श्री. हिराभाई ठक्कर यांनी या ग्रंथात अत्यंत सोप्या सहज भाषेत कर्म सिद्धांत समजावला आहे.
त्यातील एक मजेशीर उदाहरण म्हणजे, "लग्न झाल्यावर नवीन नवरी नवरा सांगेल तस वागते त्यावेळी ती कर्ममार्गी असते. ती म्हणत असते, "मी नवऱ्याची". पुढे काही दिवस झाले की ती एकदम भक्तिमार्ग धरते, आणि नवऱ्यालाच सगळी कामे लावते, म्हणते "नवरा माझा". पुढे म्हातारपणी "हे आणि मी काय वेगळे आहोत??" असे म्हणत ती ज्ञानमार्ग धरते..."
त्यामुळे, कुठला मार्ग निवडावा यावर जास्त विचार न करता, कुठलाही निवडावा हेच योग्य, हा विचार करून आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज झालो, आणि काखेत दळणाचा डबा धरून संसाररुपी कर्माचे जोंधळे अध्यात्माच्या गिरणीत दळून आणायला निघालो....
मी सुद्धा वाचलंय ते पुस्तक. आणि मला जे हवे ते घेतले त्यातून. नित्य कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म यातून सुटकेचा मार्ग सापडला.
ReplyDeleteथोडक्यात पण उत्तम शेअरिंग.
ज्ञान मार्गांचा अभ्यास करून पत्नी रुपी ईश्वराचा भक्तिमार्ग धरावा आणि मुकाट्याने संसारातील तू म्हणशील तसे हा कर्म मार्ग पकडावा म्हणजे ऐहिकातून सहजगत्या मुक्ती मिळते आणि ईश्वराला असेच का असे बालिश प्रश्न विचारू नयेत .
ReplyDelete